दगडांना बोलतं करणारी ऋतिका
X
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव येथील ऋतिका विजय पालकर. शिक्षण बीएससी आयटी असलं तरी तिला आवड व्हीडिओ/फोटो एडिटिंगची. वडिलांच्या न्यूज एडिटिंग क्षेत्रात मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला. वडिलांकडून कलेची नजर लाभलेली ऋतिका दगडांमध्ये वेगवेगळे आकार निरखू लागली. वडील १९९८ पासून काष्ठशिल्प तयार करतात. त्यामुळे लहानपणापासून काष्ठशिल्प शोधण्यासाठी कोकणातील नदीकिनारी, समुद्रकिनारी, जंगलांमध्ये फेरफटका ठरलेलाच. त्यातूनच तिला एखाद्या टाकाऊ लाकडातही वेगवेगळे आकार शोधण्याची नजर मिळाली. वडील काष्ठशिल्प घडवत असताना, तिने नदीपात्रातील, समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतींचं माध्यम म्हणून निवडलं. लहान-मोठया, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृती खुणावू लागल्या. याच छंदातून बनवलेली तिची पहिली कलाकृती एका रसिक व्यक्तीने विकत घेतल्याने, या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचं ऋतिकाने ठरवलं.
घरच्या लोकांचा पाठिंबा आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत तिने विठ्ठल, गणपती, कृष्ण, कोकणी ग्रामीण जीवनावर आधारित व्यक्तिरेखा अशा कलाकृतींची निर्मिती केली. अनेक लहानमोठ्या दगडांपासून विशिष्ट रचनेतून शिवरायांची व्यक्तिरेखा, मेंढपाळ, प्रेमीयुगुल, पशू-पक्षी, फुले अशा अनेक कलाकृतींची निर्मिती तिने केली आहे.
[gallery type="rectangular" size="medium" ids="6923,6932,6931,6930,6929,6928,6927,6926,6925,6924,6933"]
ऋतिका आपली कलाकृती घडवताना दगडांना कोणताही आकार किंवा रंग देत नाही. निसर्गाने जे बनवलं आहे, ते जसंच्या तसं वापरून विशिष्ट प्रकारे मांडणी करून त्यातून विविध कलाकृती लोकांसमोर मांडते. तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. कारण निसर्गही एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल.
९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट ॲन्ड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनात ऋतिकाच्या नैसर्गिक दगडी कलाकृतींना न्याय मिळाला. स्टॅचू ऑफ युनिटीचे निर्माते राम सुतार यांच्याकडून तिच्या कलेचं कौतुक झालं. राम सुतार सरांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद हे खूप मोठे भाग्य असल्याचं ऋतिका सांगते. प्रदर्शनाचे उद्घाटक अर्थतज्ञ खासदार नरेंद्र जाधव यांनी ऋतिकाच्या 'आईने कडेवर घेतलेले मूल' या कलाकृतीचं कौतुक केलं. ती कलाकृती त्यांनी विकत घेऊन आपल्या अभ्यासिकेत तिला स्थान दिलं आहे.
सरावानेच दगडातील आकार लक्षात येतात व वेगवेगळ्या थीम सुचत जातात असा आपला अनुभव असल्याचं ऋतिका सांगते.
दिल्ली येथील प्रदर्शनानंतर ३-६ जानेवारी २०१९ मुंबई गोरेगाव येथे ग्लोबल कोकण महोत्सव २०१९ मध्ये तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर २७-२८ मार्च २०१९ ला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर कुलाबा मुंबई येथे प्रदर्शनासाठी तिला आमंत्रित करण्यात आले. तसेच २१-२७ एप्रिल २०१९ या कालावधीत ऋतिकाने वैयक्तिक पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित आर्ट गॅलरी "शाहू स्मारक भवन" येथे प्रदर्शन भरविले होते.
या कलेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग आणि संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ती सांगते.