Home > रिपोर्ट > सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा संभाव्य महिला उमेदवार आढावा

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा संभाव्य महिला उमेदवार आढावा

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा संभाव्य महिला उमेदवार आढावा
X

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथले सारे राजकारण पाण्याभोवतीच फिरत असते. जिल्ह्यात विधानसभेचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. विधानसभेचा आजवर विचार करता आ. प्रणिती शिंदे यांच्याशिवाय एखादा अपवाद वगळता कोणत्याही महिला उमेदवाराला फारसे यश मिळालेले नाही. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून महिला आपले स्थान बळकट करु लागल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार करता २०१९ च्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवू इच्छणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. आपआपल्या मतदारसंघात या साऱ्या महिला जोरदार काम करताना दिसून येत आहे.

राजकारणात घट्ट पाय रोवत या महिला विरोधकांना कडवे आव्हान देत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य मतदारसंघ)

२००९ साली आपला राजकीय प्रवास सुरू केलेल्या आ. प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचारमंचाच्या माध्यमातून शहरात आपली एक विशिष्ठ प्रतिमा निर्माण केली आहे. या विचारमंचाच्या माध्यमातून मोठे समाजकार्य करत आजवर तीनदा आ. शिंदे यांनी आपला विजयरथ खेचून आणला आहे.

यावर्षीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळातच या मतदारसंघात कॉम्रेड नरसय्या आडम यांना मानणारा विडी कामगार वर्ग मोठा आहे. त्याचबरोबर दलित आणि तेलगु भाषिक समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मुस्लिम मतदारांची संख्याही लाखाच्या वर आहे. यावेळी मुस्लिम समाजाने आ. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीच्या विरोधात बंड पुकारले असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीत एमआयएमच्या वतीने तौफिक शेख यांच्या विरोधात आ. शिंदे यांना कडवी झुंज द्यावी लागली होती. यावेळी मात्र शेख हे खुनाच्या खटल्याच्या आरोपाखाली जेरबंद असल्याने आणि वंचित आणि एमआयएम यांच्यामधील युतीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आ.‍ शिंदे यांच्या मार्गातील एक संकट कमी झाले आहे. असे असले तरी सोलापूर शहरात मुस्लिम समाजात काम करणारे इम्तियाज पिरजादे हे वंचितमधून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

मागच्यावेळी भाजपाकडून मोहीनी पत्की तर शिवसेनेकडून महेश कोठे यांनी आ. शिंदे यांच्या विरोधात निवडणुक लढवली होती. यावेळी शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष महेश कोठे, माजी नगरसेविका, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, दिलीप माने इच्छुक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. यापैकी ज्याला तिकीट मिळेल त्यांना आ. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सर्व शक्ती पणाला लावून काम करावे लागेल.

राज्यातील एकुणच वातावरण पहाता आमदार प्रणिती शिंदे यांना यावेळी जोरदार टक्कर द्यायला विरोधक भक्कम असणार आहे. त्यामुळे सोलापूर मध्य मतदारसंघात यावेळी निवडणुकीत चांगलीच रंगतदार होणार आहे.

रश्मी बागल (करमाळा मतदारसंघ)

एकेकाळी राष्ट्रवादीचा निष्ठावंत मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा मतदारसंघातील चित्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे दिसणार आहे. त्याचे कारणही तसेच महत्वाचे आहे. काही दिवसापूर्वी रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करुन २०१४ च्या निवडणुकीत थोडक्यात निसटलेला विजयरथ खेचून आण्ण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. याचसाठी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढून शिवसेनेचा झेंडा हातात धरला आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वीपासूनच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. गावोगावी प्रचार दौरे, संवाद यात्रा काढून मतदारांशी संपर्क साधताना त्या दिसत आहेत. आपल्यामागे कार्यकर्त्याची फौज उभी करुन बागल सध्या मोर्चे बांधणी करत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या विरोधात उभारणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. शिंदे हे शरद पवारांच्या मर्जीतले महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे रश्मी बागल यांना आपल्या सर्व शक्तीनिशी लढावे लागणार आहे.

शैला गोडसे (मंगळवेढा –पंढरपूर मतदारसंघ)

मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील महत्वाचे महिला नेतृत्व म्हणून शैला गोडसे यांना ओळखले जाते. सध्या त्या कुरूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गोडसे या सातत्याने झटत आहेत. त्यासाठी अनेकवेळेला त्यांनी आंदोलनेही केली आहेत. शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देणे हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असल्याचे त्या सांगतात. पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या मागे मी उभी असल्याचे त्या आजवर सांगत आल्या आहेत. मागच्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून मंगळवेढा–पंढरपूर विधानसभेच्या मतदार संघातील उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामास सुरूवात केली.

साधना भोसले (मंगळवेढा-पंढरपूर मतदारासंघ)

थेट जनतेमधून नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या उच्चशिक्षित साधना भोसले या विधानसभेच्या मंगळवेढा -पंढरपूर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात साधना भोसले यांनी शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी काढून जवळपास ५०० कोटींची विकास कामे केली. यांच्या कार्यकाळातच पंढरपूर नगरपरिषदेला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.

परिचारक गटातील उमेदवार हे भाजपाचे स्ट्राँग उमेदवार असले तरी आ. प्रशांत परिचारक यांच्या विरोधात एक गट कार्यरत असल्याने भाजपकडून साधना भोसले यांना उमेदवारी दिली जाईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे झाले तर पंढरपूरच्या इतिहासात प्रथम एक महिला आमदार असणार आहे. भारत भालके हे शिवसेनेत की भाजपमध्ये हा गोंधळ अजून चालू आहे. विरोधक कोण हा संभ्रम येथे आहेच. येत्या काही दिवसातच हे सारे चित्र स्पष्ट होईल.

इंदुमती अलगोंड – पाटील (सोलापूर दक्षिण)

सोलापूर शहरात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंड–पाटील या सोलापूर दक्षिण मतदारसंघात विधानसभेच्या काँग्रेसच उमेदवार म्हणून चर्चेतले एक प्रमुख नाव आहे. सोलापूर बाजार समितीच्या सभापती त्यांनी काही काळ काम केले. विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी केलेले महिला संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या शिवसेना प्रवेशानंतर या मतदारसंघात अलगोंड- पाटील यांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहीले जात आहे.

अस्मिता गायकवाड (सोलापूर मध्य)

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड या शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. माजी नगरसेविका असलेल्या गायकवाड यांनी पक्ष संघटनेत विविध पदे प्रभावीपणे सांभाळली आहेत. शहरातील अनेक प्रश्नांवर सातत्याने आक्रमकपणे आंदोलने करुन राजकीय वर्तुळात त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांचे नाव विधानसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत असले तरी अस्मिता गायकवाड या ही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पक्ष आता कोणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सुवर्णा मलगोंडा (अक्कलकोट मतदारसंघ)

राज्यात सर्वत्र काँग्रेस पिछाडीवर दिसत असले तरी सोलापूर जिल्ह्यात विविध पदावर काम केलेल्या महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. अक्कलकोट नगरपालिकेच्या दोन टर्म नगरसेविका नंतर नगराध्यक्षा म्हणून काम केलेल्या सुवर्णा मलगोंडा यांनी चांगले काम केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकोट मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सध्या त्यांचे नाव चर्चेत आहेत. विद्यमान आमदार सिध्दराम म्हेत्रे यांच्या संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मलगोंडा या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहेत.

-वर्षा कुलकर्णी

Updated : 20 Sep 2019 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top