शिवसेनेत प्रियंकाची उपनेतेपदी नियुक्ती
X
काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची पक्षात उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच प्रियंका यांनी काँग्रेसमध्ये अपमानास्पद वागणूक मिळतेय तसेच पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आणि रक्त आटवणाऱ्यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, गुंडांना मात्र मान मिळतो, अशा आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल, असेही ते म्हणाले. मुंबई ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून लहानपणापासूनच आपल्याला शिवसेनेविषयी आत्मीयता आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. महिलांच्या हक्कांसाठी आपल्याला माध्यमातून काम करावयाचे असून त्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्यावेळी म्हटलं होत.