कराटेपटू शीतल गायकवाड यांना माँसाहेब जिजाऊ पुरस्काराने गौरव
X
ताराराणी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी समाजातील कर्तृत्वान महिलांना माँसाहेब जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदाच्या वर्षी कराटे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट कराटेपटू तथा प्रशिक्षक शीतल गायकवाड यांना माँसाहेब जिजाऊ पुरस्कार देऊन आ.भरतशेठ गोगावले व वंदनाताई मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शीतल गायकवाड यांच्या कर्तृत्वान, धडाकेबाज व दैदिप्यंमान कामगिरीबद्दल आजवर अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
जिजाऊ पाचाड समाधीस्थळी सालाबादप्रमाणे गतवर्षी देखील ताराराणी ब्रिगेडच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासातील महत्वपुर्ण घटना व कर्तृत्वसंपन्न व्यक्तींच्या महान कार्याला आदरपुर्वक उजाळा देण्यासाठी सण व उत्सव साजरे करुन त्यामागील विचार व प्रेरणा समाजात रुजवून सामाजिक विकास क्रांती घडवून आणणे हा खरा उद्देश असल्याचे शिवमती मोरे म्हणाल्या. तर समाजातील विविध क्षेत्रात प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुरस्कार दिले जात असल्याचे शिवमती मोरे यांनी सांगितले.जानेवारी महिना हा माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,या महानायिकांच्या जन्माने उजाडला आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाउंच्या प्रेरणेने पवित्र झालेले मातृतिर्थ सिंदखेडराजा आणि जिजाउंच्या महान कार्याने प्रेरीत झालेली क्रांतीभुमी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड तसेच पाचाड येथील जिजाउ समाधी स्थळी दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. रायगड भूषण पुरस्काराची मानकरी ठरलेल्या शितल गायकवाड या कराटेपट्टू ने राज्यस्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे, ज्यूडो, बॉक्सिंग, कुंफु या स्पर्धेत राज्यस्तरीय 37 सुवर्णपदके, राष्ट्रीय स्तरावर 47 सुवर्णपदके, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 8 सुवर्णपदके व
तसेच दोन रौप्य पदके पटकावली आहेत. याबरोबरच कराटे क्षेत्रात फिफथ डिग्री ब्लॅकबेल्ट, ज्युदो मध्ये थर्ड डिग्री ब्लॅकबेल्ट, शावलिंग कुंफुमध्ये फिफथ डिग्री ब्लॅक बेल्ट या पदविका प्राप्त केल्या आहेत. शितलने कराटे क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीचे मूल्यमापन करूनच ताराराणी ब्रिगेडच्या वतीने तिला माँसाहेब जिजाऊ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष कविता खोपकर, खालापूर तालुकाध्यक्ष वर्षा मोरे, शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अंकुश हडप, मराठा आरक्षण समितीचे हिरोजी देशमुख आदींसह राज्य व देशभरातून विविध पुरोगामी, परिवर्तनवादी व सामाजिक संघटना, शिवप्रेमी यांच्यासमवेत बहुजन समाजातील महिला भगिनी, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(धम्मशिल सावंत)-रायगड