Home > Max Woman Blog > तिला नवी ऊर्जा मिळाली, पण बस्स.. त्याची जात विचारू नका !!

तिला नवी ऊर्जा मिळाली, पण बस्स.. त्याची जात विचारू नका !!

तिला नवी ऊर्जा मिळाली, पण बस्स.. त्याची जात विचारू नका !!
X

माझ्या मित्राची 22वर्षाची मुलगी गेले अनेक महिने आजारी आहे. मधे तर बरेच दिवस बेशुद्ध होती. ती फॅमिली अशी एकमेकांत गुंतलेली आहे ना की तिच्या आजारपणाचं सावट सगळ्या कुटूंबा वर आलं. सगळे जण असे खंगून गेले की त्याना बघून जीव गलबलायचा.

तर परवा त्या मुलीने क्षीण आवाजात बाबाला सांगितलं, "मला जरा खाली नेऊन बागेत फिरवून आण " हाडांचा सापळा झालेली ती मुलगी तिला हाताळताना सुद्धा आपला जीव पिळवटायचा. स्पजींग करतानाही ती चारदा कण्हायची, त्यात दहाव्या मजल्यावर घर... कसं नेणार तिला? हे खरं की त्यांच्या काॅलनीची बाग आणि एकुणच परीसर फार रमणीय आहे. पण तरी तिची विनंती मान्य करणं शक्य नव्हतं. हे सांगताना तो आमच्या जवळ रडला, असेच दोन दिवस गेले.

... आणि शिप्रा ची आई म्हणजे त्या मुलीची आजी नातीला बघायला आली. तिने ओला केली होती आणि तो ड्रायव्हर शिकला सवरलेला सुसंस्कृत होता. चर्नीरोड वरून त्या आजीला इथपर्यंत आणताना त्याने खूप गप्पा मारल्या. बोलण्या बोलण्या मधे त्याला मुलीच्या आजारपणा बद्दल कळलं. इमारतीशी पोहोचल्यावर सामान न्यायला कोणी खाली यावं म्हणून आजी फोन करत होती. तर हाच घाई घाई ने आजी ला आडवत म्हणाला "कशाला कुणाला बोलावता?मी येतो की सामान घेऊन, असं म्हणत तो आजी बरोबर दहाव्या मजल्यावर मित्राच्या घरी आला.

त्याचं एकूण व्यक्तीमत्व असं होतं की, मित्र म्हणाला त्याला बघून आपुलकी आपलेपणाच वाटावा. तो आला बसला,जरा वेगळं कोणी घरात आलं याचं प्रत्येकाला च जरा बरं वाटलं. चहा पाणी होता ना मित्र नकळत बोलून गेला "परवा पासून खाली बागेत नेण्याचा हट्ट करतेय, पण कसं नेणार? प्रकृती तोळामासा झाली आहे, चहाचा शेवटचा घोट घशा खाली उतरवत तो म्हणाला मी नेऊन आणतो की...

एक अवघडले पण वातावरणात पसरलं... साॅफिस्टिकेटेड लोकांचा हा मोठा प्राॅब्लेम आहे, ते लगेच अवघडतात. पण वातावरण मोकळं करत तो म्हणाला, अहो माझी आज्जी एकशे तीन वर्षांची आहे, शरीर म्हणजे अवघा पंचवीस तीस किलोंचा मामला... पण बाकी तरतरीत, अजून दोन घास का होईना पण तिला मटण खावसं वाटतं, बशी भरच चहा पिते पण तो गरमच लागतो. गुरुवारी दत्ताच्या तसबिरीला हार चढवल्या शिवाय आडवी पडलेली असताना ती स्वस्थ बसत नाही, आणि बसू देत नाही. तसच दोन दिवसांनी तिला बाहेर न्यावं लागतं.

मी ते मुटकुळं अलगद उचलून बाबुलनाथ च्या कठड्यावर जाऊन बसतो. मी तिला मांडीवर घेऊन बसतो हे बघून कोणी हसतं कोणी कौतुक मिश्रित नजरेनं बघतं... पण आम्हाला नाही फरक पडत,आम्ही अर्धा तास बसतो गप्पा मारतो खूप हसतो कधी दंगलीत नाहक मारल्या गेलेल्या माझ्या बाबांची आठवण काढून हुदके सुद्धा देतो. पण घरी येताना दोघं ही निवांत असतो. दर दहा दिवसांनी डाॅक्टर आजी ला बघायला घरी येतात. ते ही सांगतात तुम्ही नियमित त्यांना बाहेर नेता म्हणून त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्या अजून वीस वर्षे जगल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

हे सगळं ऐकल्यावर मित्रा ने त्याला आतल्या बेडरूममध्ये नेलं. तोळामासा झालेली ती तरूण मुलगी बघून त्याचा ही जीव कळवळला. त्याने आपली ओळख करून दिली. जरासं बोलून तो समजुतीच्या सुरात म्हणाला तुला खाली बागेत जायचं आहे ना?मी तुला नेणार आहे. मी तुझा दादाच आहे. त्यामुळे मी तुला उचलून घेतलं म्हणून संकोच करू नकोस आणि खाली गेल्यावर तू सांगशील तिथे आपण जाऊ पण बसताना मी तुला मांडीवर च घेऊन बसेन कारण पून्हा घरी येताना तुला उचलणं सोपं जाईल आणि तुला त्रास कमी होईल त्याचा स्वर असा उबदार आणि निस्वार्थी निर्मळ होता की ती तरूण मुलगी लगेच तयार झाली. त्याने मित्राला आणि त्याच्या बायकोला ही बरोबर यायला सांगितलं. आणि शेवरीच्या कापसाची उशी अलगद उचलावी तशी तिला उचलली.

मित्र म्हणाला मी बाप असून सुद्धा त्याचा हळुवार पणा माझ्या हालचालीत आला नसता. ते लिफ्ट मधून बाहेर आले आणि लाॅबीतून बाहेर आले आणि ती अशक्त झालेली मुलगी लहान मुली सारखी अत्यानंदाने हसायला लागली. माझ्या मित्राला आपल्या मुलीला असं आनंदाने हसताना बघून नक्की काय वाटलं असेल याची मला कल्पना आहे. हुंदका आडवणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे हे त्याला जाणवलं असेल. आपण लोकांना उगीच घाबरतो. कारण पर पुरूषाच्या कडेवर तिला बघूनही कोणी नाक मुरडलं नाही कोणी टाँट मारले नाहीत. मालिकां मधे जे चोमडे अगाऊ शेजारी दाखवतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका ते खरं नाही ते चांगलं ही नाही.सगळे त्या मुलीला भेटले, लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्या, बागेला फेरी मारून तिने दाखवलेल्या चाफ्याच्या झाडाखाली चौथर्या वर तो तिला मांडीवर घेऊन बसला.

खरच वातावरण खूप रमणीय होतं. तिला परत घरी आणली तेव्हा ती इतकी फ्रेश आणि तरतरीत दिसत होती की, माझ्या मित्राला जरा भितीच वाटली. पण नाही! हा प्रयोग एक दोनदा केल्यावर तिच्या प्रकृतीत खूप सुधारणा दिसायला लागली आणि डाॅक्टर म्हणतायत की आता खूप होप्स आहेत. त्या ड्रायव्हर चं नाव मी मुद्दाम सांगणार नाही, कारण मग लगेच त्याच्या मागे जात धर्म पंथ प्रांत चिकटेल आणि आता ज्या अवस्थेत आपण आहोत त्या वर परिणाम होईल.

- चंद्रशेखर गोखले

Updated : 21 March 2020 10:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top