Home > रिपोर्ट > ती आणि दुष्काळ

ती आणि दुष्काळ

ती आणि दुष्काळ
X

"आला रे आला... दुष्काळ आला

जीवन जगण्याचा मार्ग अधिक कठीण झाला...

पोटाची खळगी भरण्यासाठी सुरु झालेली वणवण

आता घोटभर पाण्यासाठी होऊ लागली..."

राज्याला सतत दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायेत. दुष्काळाची सर्वत्र वाच्यता होते... या दुष्काळामुळे खचलेला बळीराजा आपल्या प्रकर्षाने दिसून येतो. कधी माध्यमांतून तर कधी आजू-बाजूचा परिसर पाहिल्यावर. मात्र दुष्काळात शेती, जनावरे, कोरड्या जमीनी, चारा छावण्या, शेतकरी आत्महत्या या सर्वांच्या पलीकडे सर्व काही शक्य आहे, सगळ ठीक होईल अशी आशा बाळगत सतत प्रयत्नशील असणारी प्रत्येक घरातली स्त्री तिच्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. खरंतर दुष्काळ, पाणी आणि महिला यांचे एक विशिष्ट नातं आहे. कारण महिलांसाठी पाणी एक महत्त्वपूर्ण साधण आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे महिला पाण्यासाठी वणवण करत आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक नळ, विहिरी, टँकर, पाणवठे, या ठिकाणी एक हंडाभर पाणी मिळावे म्हणून महिला धडपड करताना दिसतात. त्याच्या सोबत घरातील छोटी मुलीमुलेही पाणी भरताना, विहिरीतून पाणी उपसताना आढळतात. पाणी भरायचे असते म्हणून अनेक मुला-मुलींना आपले शिक्षण सोडवे लागले. तर एकल महिलांना हंडाभर पाणी आणण्यासाठी दिवसांची मजुरी बुडवावी लागते..

गावातील महिलांना पाण्याच्या शोधात शेत, राने, जंगल आणि निर्मनुष्य रस्त्यातून जावे लागते. घरी येईपर्यंत मनामध्ये सदैव धाकधूक असते. स्वतःच्या जीवाची परवा न करत या महिला अंगात त्राण नसताना देखील सतत कामं करत राहतात. सकाळी उठल्यावर घरातला स्वयंपाक, धुणी भांडी करुन शेतातली मोल-मजुरी करण्यासाठी जायचे आणि कुटुंब चालवायचे. मात्र त्यात पडलेल्या दुष्काळामुळे घरात पिण्यासाठी पाणी नाही. याकरिता सर्व कामं बाजूला सारून पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालत जायचे. मग कितीची उन्हाच्या झळा, चटके बसले तरी चालेल. घोटभर पाण्यासाठी शरीराची परवा न करता एकावरएक हंडे घेऊन पायपीट करणाऱ्या अनेक स्त्रियांची ही कहाणी....

एकंदरित आपण राज्यात अनेकदा दुष्काळ पडताना पाहिलेला आहे. या दुष्काळाचे खूप विपरित परिणाम शेती, जनावरे, रोजगार एकूण ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर होत असतो. अशातच बळीराजा कर्जाला कंटाळून, नापिकीला कंटाळून आत्महत्या करतो मात्र कधी ऐकलं आहे का हो... दुष्काळासमोर, संकटाच्या परिस्थिती समोर महिलेने आत्महत्या केली किंवा ती खचली. नाही ना हीच त्या अनेक स्त्रियांची शक्ती आहे जी न खचता परिस्थितीला सामोरं जात आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असते. आपल्याकडे शेतीचा शोध जरी महिलेने लावला असला तरी तिला त्याचा मालकी हक्क अद्यापही मिळालेला नाही. आजही आपल्याकडे दुष्काळ पडला तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर उभं राहतं तो बळीराजा आणि त्याची संकटं... मात्र स्त्रिया किती कामं करुन संकंटाना सामोरं जात असल्या तरीही आजही दुलर्क्षित आहे या सगळ्यापासून..

प्रियंका आव्हाड

Updated : 15 May 2019 11:36 AM GMT
Next Story
Share it
Top