पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा
X
बंगळुरूमध्ये सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात सुरू असलेल्या एका सभेत एका तरुणीनं व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानं खळबळ उडाली आहे. याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तेव्हा एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin owaisi) हेसुद्धा उपस्थित होते.
तिच्या घोषणा ऐकताच ओवेसींनी पटकन पुढे जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या तरूणीचं नाव अमूल्या लियोना असं आहे. तिला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एमआयएमने गुरूवारी आयोजित केलेल्या सीएएविरोधी रॅलीमध्ये अमूल्या हिने आपल्या भाषणा दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या सगळ्यांचा आपण निषेध करत असल्याचं खासदार ओवेसी यांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेनंतर अमूल्या हिच्या घरावर काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचंही समजतंय.