Home > रिपोर्ट > शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा - प्रा. हरी नरके

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा - प्रा. हरी नरके

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा - प्रा. हरी नरके
X

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

सावित्रीबाईंच्या जन्मस्थळाची अतिशय दुरावस्था होती. त्याची मुळाबरहुकुम पुनरउभारणी करणे, या गावाचा संपुर्ण कायापालट घडवणे, गावात शिल्पसृष्टी उभारणे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यात नसलेल्या असंख्य गोष्टी या गावात उपलब्ध करून देणे यासाठी प्रस्तुत लेखकाची २० वर्षे सत्कर्मी लागली याचा मला अभिमान आहे.

पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्याचा समग्र विकास, दिल्लीच्या संसद भवनात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि पुणे विद्यापीठाचा नामविस्तार अशा बर्‍याच कामांमध्ये पुढाकार आणि यशप्राप्ती यांचा आनंद आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. फुलेवाडा व नायगावला श्री. छगन भुजबळ यांना २८ वर्षांपुर्वी सर्वप्रथम घेऊन जाणे, त्यांच्याकडे व शासनाकडे या व इतर असंख्य कामांसाठी आग्रही राहणे, पाठपुरावा करून स्वत: राबून ही कामे करवून घेणे यात आयुष्याचे सार्थक आहे असे मी मानतो.

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’

शिक्षण, स्त्रीपुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांची "सावित्री- जोती" यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्थरात विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

राज्य शासनाने प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ यांना प्रचंड मागणी आहे. प्रस्तुत लेखकाने लिहिलेले सावित्रीबाईंचे इंग्रजी चरित्र दिल्लीच्या एन.सी.ई.आर.टी. ने प्रकाशित केलेले असून त्याचा मराठी अनुवाद इस्लामपूरच्या नाग नालंदा प्रकाशनाने छापलेला आहे. या पुस्तकाचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत.

- प्रा. हरी नरके

Updated : 2 Jan 2020 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top