हा सण म्हणजे सावित्री सण- अनुत्तरा शहा
X
३ जानेवारी १८३१ला जन्म घेतलेल्या सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. ब्रिटिशांच्या काळात आपल्या पतीच्या (जोतीबा फुले) खंबीर साथीने त्यांनी महिलांचे अधिकार व महिला शिक्षण या क्षेत्रात फार मोलाची कामगिरी बजावली. १८४८मध्ये भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा स्थापन केली. आपल्या पतीच्या साथीने १८४०मध्ये एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरवात केली.
ज्या काळात स्त्रीशिक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता नव्हती, ज्या काळात स्री शिकली तर धर्म बाटेल अशा समजूतीची लोकं होती, त्या काळात एका स्रीने स्त्रियांच्या उध्दारासाठी झुंज देणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. स्रियांच्या उध्दारासाठीच्या लढ्यात त्यांना समाजाची प्रचंड अवहेलना सहन करावी लागली. चिखलफेक, दगड, शेण यांना सामोरं जात आणि समाजातील उच्चवर्णीयांकडून झालेला आत्यंतिक छळ हे सगळं सहन करत सावित्रीबाई आपलं काम अविरतपणे करत राहिल्या.
आपण आज कितीही सामाजिक कार्य केले तरीहि त्या कार्याला सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची सर येऊ शकत नाही. पण आपण त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया. जसा आपण दसरा, दिवाळी सण साजरा करतो तसाच ३ जानेवारी हा सण आपण सावित्री सण म्हणून साजरा करुया.
-अनुत्तरा शहा






