Home > रिपोर्ट > ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय जनरेशन नेक्सट सुनेत्रा पवार

ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय जनरेशन नेक्सट सुनेत्रा पवार

ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय जनरेशन नेक्सट सुनेत्रा पवार
X

पुणे येथे टाइम्स ग्रुपने आयोजित केलेल्या दिमाखदार कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन विविध उपक्रमांद्वारे आरोग्य, पाणी, शिक्षण, पर्यावरण, रोजगार इत्यादी महत्वाच्या क्षेत्रातील कार्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांना ‘ई टी (इकोनॉमिक टाइम्स) जनरेशन नेक्स्ट आइकॉन्स 2020’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांना आपल्या सामाजिक कार्यासाठी हा पहिला पुरस्कार मिळाला नाही. यापुर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं आहे. प्रसिद्धीपासून कायम चार हात लांब राहत जनसामांन्यांसाठी काम करण्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कामाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

सौ. सुनेत्रा अजित पवार. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व. एका शेतकऱ्याची मुलगी. शरद पवार यांची सून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी, पार्थ आणि जय या दोन मुलांची आई. या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाचा आणि प्रसिद्धीचा गराडा त्यांच्याभोवती आहे. मात्र, यातुनही त्यांचं सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख आणि अढळ स्थान आहे. लोक आदराने त्यांना ‘वहिणी’ म्हणतात आणि अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान आहेत.

भारत ही खेड्यांची भूमी आहे आणि या खेड्यांमधूनच क्रांती घडू शकते या त्यांच्या दृढ विश्वासातूनच भारतात ‘इको विलेज’ ही विलक्षण संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी काटेवाडी गावाला मार्गदर्शन केलं. सुनेत्रा पवार यांनी निर्मल ग्राम अभियानाअंतर्गत स्वत: बचतगट चळवळीचं नेतृत्व केलं, या अभियानातून आरोग्य आणि स्वच्छता, समुदाय पशुधन व्यवस्थापन, ग्रीन ब्रीज तंत्राने सांडपाणी प्रक्रिया, ऊर्जा संवर्धन या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या लहानशा गावाचं रुपांतर एका प्रगत गावात केलं. त्तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देशातील पहिलं ‘इको विलेज’ म्हणून गावाला पुरस्कार मिळाला होता.

सुनेत्रा पवार यांनी ‘एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडीया’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली. या संस्थेच्या पथकासह त्यांनी वृक्षसंवर्धन, नामशेष होत असलेल्या वन्य प्रजाती आणि विशेषत: मेघदुत प्रकल्पाअंतर्गत पाणी वाचवण्याचं काम केलं. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिनी पारेख यांच्या सहकार्याने त्यांनी ५००० हून अधिक वयोवृद्धांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करवून दिली. आजही हे काम अविरतपणे चालले आहे.

त्यांच्या कामामुळे संस्थेस आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. सुनेत्रा पवार यांना पर्यावरण, जल सवंर्धन आणी आरोग्यविषयक कार्यासाठी जागतिक उद्योजकता मंचातर्फे (WEF), फ्रान्सला आमंत्रित करुन सन्मानीत करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात WEF या संस्थेचं अनावरण करण्यात आलं. जगभरातील मान्यवर या विलक्षण अध्यायाचे साक्षीदार होते आणि त्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

सुनेत्रा पवार बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क ली. या कंपनीची कमानही सांभाळत आहेत. या कंपनीमध्ये ७५०० हून अधिक ग्रामीण भागातील महिला नोकरी करतात. ग्रामीण महिलांच्या स्वयंरोजगारासाठी हा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे. ‘विद्या प्रतिष्ठान’ या अत्यंत नामांकित आणि स्वदेशी शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी त्या कार्यभार सांभाळत आहेत. शिक्षण संस्थेतील दैनंदिन कामकाज आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तसेच २५००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सामाजिक संगोपणासाठी आपला वेळ देतात. आजची पिढी हीच देशाचं उज्वल भविष्य आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन को.ऑप. फेडरेशन ली. संस्थेच्या संस्थापकही आहेत. यात अजून एक भर म्हणजे त्या वृद्धश्रमाच्या विश्वस्तपदीही आहेत.

Updated : 24 Feb 2020 5:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top