Home > रिपोर्ट > महाराष्ट्रातील ‘वहिणीराज’

महाराष्ट्रातील ‘वहिणीराज’

महाराष्ट्रातील ‘वहिणीराज’
X

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलल्याने मिसेस मुख्यमंत्रीही बदलल्या आहेत. गेल्या ५ वर्षांत या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या अनऑफिशल पदावरुन बराच वाद रंगलेला आपण सर्वांनीच पाहिला आहे.

हे पद भूषवणाऱ्या अमृता फडणवीस यांनी मिसेस मुख्यमंत्र्यांची जनमानसात असणारी प्रतिमाच बदलून टाकली होती. डोक्यावर पदर सावरत मुख्यमंत्र्याच्या हाताला हात लावत केवळ विठ्ठलाची पूजा करणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री सगळ्यांनी पाहिल्या होत्या. मात्र, आपल्या स्वतःची हौसमौस जपत आपली प्रतिमा जपणाऱ्या नव्या वहिणींची ओळख अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला करुन दिली.

याआधी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही महाराष्ट्राच्या जनतेनं वहिणी म्हणून पाहिलं आहे. या वहिणींना प्रसारमाध्यमांसमोर यायला फारसं आवडत नाही. अर्थात पडद्यामागची सगळी धूरा त्या लिलया पेलतात. कार्यकर्त्यांना या वहिणी आपल्याशा वाटतात.

केवळ याच निवडणुकीत नाही तर गेली अनेक वर्ष अजितदादांच्या प्रचाराची जबाबदारी सुनेत्रा पवारांवरच असते. दादांना भेटता नाही आलं तरी मी तुमच्यासाठी आहे, तुमचे प्रश्न मी नक्की पोहोचवेल हा संदेश सतत सुनेत्रावहिणी देत असतात. त्यामुळे कुठल्याही पदावर नसतांना जनतेच्या मनात आपुलकीचं स्थान त्यांना निर्माण केलंय.

ठाकरे कुटुंबीय हे राजकारणात सक्रिय घराण्यांपैकी एक. या घराण्यातील रश्मी ठाकरे आता महाराष्ट्राच्या अधिकृत वहिणी होणार आहेत. मूळच्या कोकणातील मात्र बालपण डोंबिवलीत घालवलेल्या रश्मी ठाकरे लग्नांनंतरच्या अनेक वर्षाने राजकारणात सक्रिय होतांना दिसतील. शिवसेनेच्या काही ठराविक सभांना त्यांची हजेरी असत. मात्र या निवडणुकीत त्यां शिवसेनसाठी प्रयत्न करताना दिसल्या.

सभांना हजेरी लावण्यापुरते त्यांनी आपलं काम मर्यादीत ठेवलं नाही. प्रचारासोबतच कार्यकर्त्यांशी त्या संवाद करत होत्या. राजकीय प्रक्रियेतही त्या सक्रीय होत्या. सत्ता संघर्षातच नाही तर त्या आधीही शिवसेनेत नक्की काय चाललंय यावर रश्मी ठाकरे यांची करडी नजर होती.

तळागाळातला शिवसैनिक त्यांनी आपलासा केला. त्याच्या मनात नक्की काय घालमेल सुरु आहे याचा अंदाज त्या सतत घेत असत. त्यामुळेच केवळ पक्षांतर्गतच नाहीतर पक्षाबाहेर चाललेल्या हालचाली शिवसैनिक त्यांच्याकडे मोकळ्या मनाने मांडतात.

शिवसेनेची रणनिती आखण्यात त्यांचा महत्वाचा वाटा असल्याचंही बोललं जातं. त्या तशा अजुनही पडद्याआडच आहेत. सामान्य शिवसैनिक त्यांनी आपलासा केला. त्याबरोबरच त्या निता अंबानी, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या पर्सनॅलीटीज सहज मिसळतांना दिसतात.

येत्या काही काळात हा वहिणी फॅक्टर राजकारणात किती व कसा प्रभाव टाकतो हे आपल्याला दिसेलच. याची दखल कोणाला महत्वाची वाटते, कोणाला नाही. महाराष्ट्राच्या या वहिणींनी आपली आपली छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर सोडली आहे हे मात्र नक्की.

Updated : 28 Nov 2019 9:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top