Home > रिपोर्ट > युगस्त्री राजमाता जिजाऊ

युगस्त्री राजमाता जिजाऊ

युगस्त्री राजमाता जिजाऊ
X

आज युगस्त्री राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी. शहाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी जिजाऊंनी वयाच्या ४२व्या वर्षी व १२ वर्षांच्या शिवरायांना घेऊन पुण्याला आल्या. जगदेव मुरारने उद्ध्वस्त केलेलं पुणे त्यांनी पुन्हा वसवलं. अत्यंत असुरक्षित वातावरण, शहाजी महाराज आठशे मैल दूर, कडवं पण मोजकं सैन्य.. या सर्व परिस्थितीत जिजाऊ मात्र डगमगल्या नाहीत. अढळ निर्धार, अफाट प्रज्ञा, अपूर्व धाडस, आणि विजीगिषू वृतीने सर्व संकटांवर मात केली. शिवरायांच्या हातून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण केलं. या वाटचालीत किती संकटं झेलली, किती वेळा शहाजी महाराज, शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी आपले प्राण संकटात घातले याची गणती करता येणार नाही. अफजल भेटीच्या वेळी, शाहिस्तेखानावरील छापाप्रसंगी, पन्हाळगडावर वेढ्यात अडकले तेव्हा, पन्हाळगडावर निसटून जातांना, आग्र्याला अटकेत असताना, दक्षिण दिग्विजय काळात, सूरत स्वारी, बर्हाणपूर स्वारी अशा असंख्य प्रसंगी शिवरायांनी प्राण संकटात टाकले. अशा कोणत्याही प्रसंगी अटकाव न करता या वीर मातेने आपल्या पुत्राला लढण्याची प्रेरणा दिली, बळ दिले, स्फुर्ती दिले. आग्र्याला जातांना शिवरायांना सोबत अवघ्या आठ वर्षांच्या शंभूबाळाला न्यावे लागले. तिथे ते अटकेत पडले. पण जिजाऊंनी स्वराज्याची घडी यत्किंचितही बिघडू दिली नाही. तरूण पुत्राच्या, शंभूराजांच्या रणांगणावर झालेल्या मृत्युनंतर, शहाजी महाराजांच्या अकाली निधनानंतरही त्यांचे तोंड पाहायला मिळू नये हे जिजाऊंसाठी किती वेदनादायी असेल याचा विचार करू शकतो. सगळी संकटं झेलून, दु:खं पचवून त्या दु:खांवर पाय रोवून जिजाऊ उभ्या राहिल्या ते स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी, वर्धनासाठी! चूल आणि मूल हेच स्त्रीचं कार्यक्षेत्र समजलं जाण्याच्या काळात जिजाऊंनी जे कर्तुत्व दाखवलं ते अजोड आहे.

मानवाच्या आजवरच्या इतिहासात जिजाऊंच्या तोडीची दुसरी कोणतीही स्त्री आढळत नाही. जिजाऊंच्या कर्तृत्वाचे असंख्य पैलू उजेडात आले आणि येत आहेत. मातृतीर्थ शिंदखेडराजाला लाखोंच्या संख्येने जमणारी जनता जिजाऊंचं जनमानसात काय स्थान आहे तेच दर्शवते. युगपुरुष अनेक होऊन गेलेत. पण युगस्त्री फक्त जिजाऊ... जिजाऊंच्या चरणी आदरांजली वाहून जिजाऊंच्या स्वप्नातला, जाती-धर्म-निरपेक्ष, स्री-पुरूष समतेवर आधारित नवसमाज निर्मितीसाठी कटीबद्ध होऊ या !

Updated : 17 Jun 2019 10:52 AM GMT
Next Story
Share it
Top