Home > रिपोर्ट > हिंस्र टोळधाडीसमोर पाय घट्ट रोवून उभ्या राहिल्या मुग्धा कर्णिक !!!

हिंस्र टोळधाडीसमोर पाय घट्ट रोवून उभ्या राहिल्या मुग्धा कर्णिक !!!

हिंस्र टोळधाडीसमोर पाय घट्ट रोवून उभ्या राहिल्या मुग्धा कर्णिक !!!
X

सत्तेच्या विरोधात बोलायला भले भले कचरतात. त्यात जर तुम्ही महिला असाल तर कठीणच. महिलांनी साड्यांवर, रेसिपीवर, नटण्यामुरडण्यावर बोलावं, ही सर्वसाधारण अपेक्षा. पण महिला राजकारणावर बोलू लागल्या की सत्ता हादरते आणि मग सुरू होते महिलांची कुचंबणा. चारित्र्यहनन मोहिमेपासून गलिच्छ ट्रोलिंग. पण काही महिला यालाही पुरून उरतात, बरखा दत्त, राणा आयुब, गुरमेहर कौर ते अलिकडची आतिशी मार्लेना अशी ही मोठी यादी आहे. त्यातलंच एक नाव मुग्धा कर्णिक. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या प्रमुख राहिलेल्या मुग्धा कर्णिक टोळधाडीविरोधात उभ्या ठाकलेल्या विविध क्षेत्रातल्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, अशा भावना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज असरोंडकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुग्धा कर्णिक यांची माझी प्रत्यक्षातली वैयक्तिक ओळख नाही. नाशिकला नास्तिक मेळाव्यात ओझरतं भेटलो होतो. समाजमाध्यमातली ओळख मात्र घट्ट आहे. मागे पुण्यात मोहसीनची हत्या झाली, तेव्हा पहिल्यांदा बोलणंही झालं होतं. खूप अस्वस्थ होत्या त्या. फेसबुकवरच्या आमच्या नियमित संपर्कातल्या मोहसीन एस चं तर काही झालं नाही ना? आम्ही सगळेच धास्तावलो होतो. मोहसीन संपर्कात आला नि जीव भांड्यात पडला. प्रत्यक्षातलं कुठलं नातंगोतं नसतानाही एकमेकांची काळजी करणारी आपुलकी आहे, भारतीयत्वाची...ज्याला धक्के मारण्याचं काम चहुबाजूंनी सुरू आहे. समोर बलाढ्य सेना, प्रचंड साधनसामग्री, सगळ्या यंत्रणा खाली मान घालून निमूट राबताहेत. अशा स्थितीत आपलं म्हणणं आग्रहाने सातत्याने मांडत राहणं सोपं नव्हतं. पण मुग्धा कर्णिकांसारख्या अनेकांनी ते देशहिताच्या भावनेने केलं. सुनियोजित षडयंत्रानुसार, आम्ही फुरोगामी ठरलो, टुकडे टुकडे गॅंगवाले ठरलो. देशद्रोही ठरलो. हिंदुंचे शत्रू ठरलो. त्यात मुग्धा कर्णिक एक महिला. मग त्यांना नामोहरम करणं सोपं जातं. अपमानकारक अरेतुरेवरून ते धंदा करणारी बाईपर्यंत त्यांचा उल्लेख झाला. पोराटारांच्या वयाच्या अकाऊंटवरून " माझ्याकडे पाठवा " अशी आव्हानं झाली. अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन त्यांना मनस्ताप देण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. महिलेला ट्रोल केलं की ती सोशल नेटवर्कींग सोडून पळून जाईल आणि स्वत:ला घरात कोंडून घेईल, असा या सडेल मनोवृत्तीच्या ट्रोलगॅंगचा कयास होता. तो ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर अनेक महिलांनी मोडीत काढला.

आपल्याला फक्त समोरचं एक अकाऊंट दिसतं. पण ते जिवंत हाडामांसाचं माणूस असतं. त्याला कुटुंब असतं, गणगोत असतो, मित्रपरिवार असतो. तो चहुबाजूंनी नाना प्रकारे दबाव आणत असतो. अक्कल काढतात. वाद घालतात. नाती तोडतात. विचारांची लढाई अशी आत आणि बाहेर सुरू असते. ही पार्श्वभूमी महिलांना व्यक्त होण्यासाठी प्रतिकूलच. पण कित्येक महिला हिंस्र टोळधाडीसमोर पाय घट्ट रोवून उभ्या राहिल्या. त्यातलं एक महत्त्वाचं नाव, मुग्धा कर्णिक !!! आपण जे मांडतो, व्यक्त होतो, त्यांची पाठराखण करणारी मोजकी मंडळी जरी सोबत उभी राहिली, तरी लिहिण्याला, व्यक्त होण्याला बळ मिळतं. समाजमाध्यमात अशी परिचित, अपरिचित, भेटलेली, न भेटलेली कितीतरी माणसं आहेत, जी लिहितं ठेवायला कारणीभूत ठरलीत. त्यातलं मुग्धा कर्णिक हे माझ्यासाठी महत्वाचं नाव आहे.

- राज असरोंडकर

Updated : 4 Jun 2019 10:09 AM IST
Next Story
Share it
Top