महिला व बालविकास कल्याणासाठी खाजगी उद्योग क्षेत्राचं सहाय्य – यशोमती ठाकूर
X
महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खासगी उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्राने सहयोग देण्याचे जाहीर अभिवचन शासनाला दिले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्मा, कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या इंडियन वुमन नेटवर्कच्या (सीआयआय-आयडब्ल्यूएन) अध्यक्षा श्रीमती अनिता मधोक, वरिष्ठ पत्रकार तथा सिटीजन अगेन्स्ट मालन्युट्रीशन या संस्थेच्या नीरजा चौधरी यांच्यासह कार्पोरेट क्षेत्रातील 30 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
"सर्वच क्षेत्रात सक्षमतेने काम करत असताना सकारात्मक विचारांचे मुक्तपणे स्वागत केले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांची अंमलबजावणी करत असतानाच त्यांच्या संरक्षणाकडेही सरकारचे लक्ष आहे. प्रत्येक विभागीय आयुक्तालय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.
यशोमती ठाकूर यांना ‘सीआयआयच्या’ सुमारे 30 प्रतिनिधींनी बालके, महिला तसेच किशोरवयीन मुलींमधील कुपोषणनिर्मुलनसाठी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिला यांच्या विकासासाठी सहभाग देण्यास इच्छुक असल्याचे लेखी अभिवचन दिले. बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच पुनर्वसन आदींसाठी राज्यशासनाने स्थापन केलेल्या ‘बाल न्याय निधी’ मध्येही या संस्था योगदान देणार आहेत.