Home > Max Woman Blog > सिंदळकी करणाऱ्या महिलांना म्हणीतून नावं कशी ठेवली जातात?

सिंदळकी करणाऱ्या महिलांना म्हणीतून नावं कशी ठेवली जातात?

सिंदळकी करणाऱ्या महिलांना म्हणीतून नावं कशी ठेवली जातात?
X

महिलांना नावं ठेवताना ज्या (अर्थात लोक काय म्हणतील) म्हणी वापरल्या जातात. त्या कदाचित साहित्यिक भाषेत आढळणं तसं दुर्मिळ. या म्हणी मी माझ्या वस्तीत घरात ऐकत लहानाची मोठी झाले. माझ्या आजीच्या तोंडुन आमच्या शेजारी रहाणाऱ्या बाया त्यांच्या तोंडुन या म्हणी सतत कानावर पडत असत. यालाच ठिवणीतल्या किंवा दलित साहित्यातील शिव्या असं ही म्हणता येईल.

कोणत्या स्त्रियांवर कोणत्या म्हणी लागू होतात. याबाबतची ही कंसात माहीती देण्याचा हा प्रयत्न. एखादी महीला दुसऱ्या पुरुषाच्या (नवरा असताना) प्रेमात पार वेडी झालेली असेल तर आणि ती या प्रेमासाठी काही ही करायला तयार असते. तेव्हा तिला काय म्हणतात?

फिरली नार कोषा मार फिरली नार, भ्रतार मार

म्हणजेच नवरा किंवा भाऊ यांचा खून करणे (प्रियकराच्या मदतीने) ती तिच्या प्रेमाच्या आड जे येतात. त्यांना ती आपले दुश्मन समजत असते. आणि यात अशा महिलांना विरोध करणारे पुरूष म्हणजे एक तर भाऊ असतो किंवा नवरा असतो. यालाच नाकात वारं भरलेली बाई असं ही म्हणतात.

निनांदीला बाराबुधी अन फुटलयं कपाळ बांधली चिंधी

म्हणजे जी बाई नांदत नाही. तिची बूद्धी जास्त चालते. ती सारखी फिरत असते. ती मागचा म्होरचा कसलाच विचार न करणारी आपल्या न नांदण्यामूळे स्वतः वर लेकरांवर नवऱ्यावर काय परिणाम होतील? याचा जराही सारासार विचार न करणारी स्त्री या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागं

ही म्हण साधारणतः एखादी स्त्री एखाद्या अशा पुरुषाच्या प्रेमात पडत असते जो बाबू जेवला पतर पालथं अन झोकुन देलंय गावाच्या खाल्तं अशा वृत्तीचा असतो. जो एका स्त्री वर कधीच टिकुन रहात नाही. अनेक स्त्रियांना फसवण्यात तो तरबेज असतो. तरीही त्याच्या प्रेमात ही पार वेडी असते. तिला तिचं उध्वस्त आयुष्य होणार याची कल्पना असताना देखील.

शिकविन ते दुखविन अन झोपण तो मायबाप

म्हणजे म्हंजी एखादी बाई मुलगी वाईट वकटं वागायला लागली की,तिला घरातुन काही लोक असं करू नकू तसं करू नकु म्हणत इज्जत जाईल लोकं काय म्हणतेल? बाप भाऊ जीव देतेन, बहिणीचं लग्न होणार नाही, आपल्यात असं नसतं... तसं वागणाऱ्या बाया चांगल्या नसतात. असं पद्धतशीरपणे संस्कार (बंधने) शिकवले जातात. तर काही लोक तिला तिच्या प्रेमासाठी मदत करतात. मग यात प्रियकराची भेट घालून देणं, भेटण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं प्रियकराला भेटताना तिला सर्व मदत करणं. यामुळे अशा परिस्थितीत त्या स्त्रीला संस्कार शिकवणारे आवडत नसतात आणि मदत करणारे आवडत असतात.

मी गेले खाल्ल्या घोणं अन् चाव्हडीत होते पन्नास जणं (खाली मुंडी अन पाताळ धुंडी)

एखादी बाई,मुलगी तिच्यावर कितीही बंधणं घातली संस्कार शिकवले बाईचं आयुष्य ‘चूल अन मुलं’ एवढंच आयुष्य असं कितीही शिकवलं तरी ती आजुबाजुला काय चाललयं? हे जाणुन घेते. माहिती घेत असते. या अर्थाने (आजच्या परिस्थितीत) काशा उपटून बावच्या पेरणारी म्हणजे एखादी स्त्री जी मुळातच अगुचर स्वभावाची (स्वतःच्या हक्क मिळवण्यासाठी तत्पर असणारी) तिच्यावर घरात अन्याय होत असेल तर ती घरातल्या त्या सर्वाना पुरून उरत असते.

‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी म्हटली जाते.

जी बाई दिसताना कशी साधी भोळी वचवच नाही. पचपच नाही. शांत स्वभाव वगैरे असं असतं. पण अचानक कळतं की, तिला एखाद्या पुरुषासोबत ऊसाच्या फडात, तुरीच्या कापसाच्या पाट्या लागवत आणताना, डागवनात सरपण आणायला गेल्यावर परक्या पुरुषाबरोबर एका वर एक धरलं जातं. तेव्हा असं बोललं जातं.

बड बडीचा बोभाटा अन झिपरी मारी झपाटा

ही म्हण या अर्थाने बोलली जाते. जेव्हा एखादी बाई भंडग असते. मोकळं खरं बोलणारी असते. ती चुकीला चुक खऱ्याला खरं खोट्याला खोटं ओळखुन ते स्पष्टपणे बोलुन दाखवण्याची तिच्यात धमक असते. पण तिच्या नावाचा वाईट स्त्री म्हणूनच गावभर बोभाटा होत असतो. पण जिच्यावर विश्वास असतो किंवा हिला कोण इचारील? असं जिच्याबद्दल वाटत असतं ती मात्र, कार्यक्रम उरकुन येत असते.

खाय माझी भाकर अन् भोक माझं उखर

ही म्हण एखादी बाई जी विधवा परित्यक्ता असते. तरुणपणात एकटीला आयुष्य जगायचं असतं. अशा वेळी ती तिला जो पुरूष हवा असतो. ती त्याला कसलाही पैसा धन न मागता जवळची सर्व संपत्ती लावत असते. या अर्थाने ही म्हण बोलली जाते.

झवुन झवून मेली अनन थनाही झाली

ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी बोलली जाते. जी एकत्र अनेक पुरूषांसोबत प्रेमसंबध, एक दोन लग्न करते किंवा वेश्याव्यवसाय करते आणि हे सगळं करूनही तिची परिस्थिती अतिशय हालबेहाल पुर्वीसारखीच राहाते.

घालून घोरायचं अन उठुन बोम्ब मारायचं

ही म्हण या अर्थाने वापरली जाते. जेव्हा बाई गडी सहमतीने संबंध ठेवतात. पण जेव्हा त्यांना कुणीतरी पकडलं की मग बाईला लोक नावं ठेवतील म्हणुन यातुन सहिसलामत बाहेर पडण्यासाठी बाई मग त्या गड्यावर आळ घेते. की, ह्याने मला धरलं किंवा जबरदस्ती केली वगैरे...

आली अंगावर तर घेतली शिंगावर.

ही म्हण या अर्थाने वापरली जाते. जेव्हा एखादी स्त्री स्वतःहुन एखाद्या पुरुषासोबत झोपण्यासाठी पुढाकार घेत असते आणि जेव्हा ह्या गोष्टीचा बोभाटा गावात होतो. तेव्हा बाईला दोष देत गड्याला चहात पडलेल्या माशी सारखं अलगद बाहेर काढलं जातं. तेव्हा, त्यो गडी हाय त्याच काय, बाईचं बळच मागं लागल्यास गडी थोडाच नाही म्हणेल! या अर्थाने ती म्हण वापरली जाते. सिंदळकी लादली तर लादत असत नाही.

तर..

मग वाळुत मुतलं फेस ना पाणी अशी गत होत असते. असं म्हणतेत की,चोरी अन सिंदळकी झाकता झाकत नसते नाहीत. तर मग आंधळं उरावर घ्या अनभवताली बघत...

गरगर फिरे अन आपुन आपला कंड आपो आपजिरे

अशी गत होते अन मग इच्च्याचं बिऱ्हाड पाठीवर म्हणल्यासारखं बाईला लेकरांबाळासहित घराबाहीर हाकलून दिलं जातं. अशा बऱ्याच म्हणी आमच्या वस्ती मध्ये बोलताना वापरलेल्या जायच्या. ज्या मी काही विसरले पण मी बोलताना काही म्हणीचा वापर करते. अर्थात या म्हणी वापर महिलांचं दमन करण्यात मोठी भुमिका निभावतात. या म्हणी आधारेच महिलांना बंधनात ठेवलं जातं. कारण या म्हणीतुन बायांनी सिंदळकी केली तर लोक काय म्हणतील? याचा अर्थबोध होतो. बाकी महिलांच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही आजही खेडेगावात महिलांच्या कानावर या म्हणी शब्दाच्या कमी शिव्यांच्या स्वरुपात जास्त पडतात....

सत्यभामा सौंदरमल

निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था

बीड

दिनांक 16/9/2020

Updated : 18 Sep 2020 9:12 AM GMT
Next Story
Share it
Top