Home > रिपोर्ट > राजकीय महिला पत्रकारांचा तुटवडा का?

राजकीय महिला पत्रकारांचा तुटवडा का?

राजकीय महिला पत्रकारांचा तुटवडा का?
X

विधानसभा आणि विधान परिषेतील महिलांचं प्रमाण आणि विधानभवनात येणाऱ्या महिला पत्रकारांच प्रमाण जेमतेम सारखच पाहायला मिळतेय. पत्रकार कक्षात पुरुष पत्रकारांच्या तुलनेत महिला पत्रकारांचे प्रमाण फारच कमी पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे मीडियास्टॅंडवर अनेक चॅनलचे मोठ-मोठे कॅमेरे लागले होते. मात्र त्यात सगळे व्हिडिओ जर्नालिस्टही पुरुषचं होते. खरंतर आज आपण पाहिलं तर अनेक महिला व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक बातम्याचं कव्हरेज करत असतात मात्र विधानभवनातलं हे चित्र काहीसं वेगळं होतं. या ठिकाणी ६ ते ७ महिला पत्रकार पाहायला मिळतात. का बरं असं चित्र असावं यासाठी आम्ही काही पत्रकारांशी आणि संपादकांशी चर्चा केली

राजकीय बातम्या कव्हर करणाऱ्या महिलांची संख्या कमी का ? पुरुष पत्रकार याबद्दल खरंतर खूप वेगळा विचार करतात याबद्दल बोलतांना टिव्ही ९ चे पत्रकार पंकज दळवी सांगतात....

माझ्या मते, जरी महिलांची संख्या कमी असली तरी ज्यापण मुली विधानसभा अधिवेशन कव्हर करतात त्या सॉलिड करतात. रश्मी पुराणिक, प्राजक्ता पोळ, सोनल, जया अशा अनेक मुली राजकीय बातम्या कव्हर करतात त्या आम्हा सगळयांना पुरून उरतात. अधिवेशन कव्हर करण्यासाठी महिलां चे प्रमाण वाढणे गरजेचं आहे मात्र सध्या ज्यापण आहेत त्या सगळ्यांना पुरून उरणारा आहेत. आणि बातमी कव्हर करताना त्याची सत्यता आणि पारदर्शकता तेवढीच असते. पुरुष पत्रकार जर असा सकारात्मक विचार करतात तर मग नक्की कोणाला महिला पत्रकार राजकीय बीट कव्हर करायला नको वाटतात.

यावर आपलं मत व्यक्त करतांना बीबीसी मराठीच्या पत्रकार प्राजक्ता पोळ म्हणतात की “ महिलांनाबद्दल कितीही सकारात्मक विचार केला तरी या मागील मानसिकता महत्वाची आहे. महिला पत्रकारांना पॉलिटिकल सोडून कुठल्याही बीट सहज मिळतात त्यांना आवर्जुन सांस्कृतिक बीट दिले जाते मात्र राजकीय बीट कव्हर करण्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं जात नाही. या मागच्या कारणांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येते की त्यांचा असा समज असतो की महिलांना राजकारण कळत नाही. अनेकदा महिला पत्रकारांना सांगितले जाते की “you are not politically Matured.” मराठी प्रमुख माध्यामांमध्ये पाहिलं तर बोटावर मोजण्या इतक्या ही महिला पत्रकार नाही. हीच मानसिकता बदली पाहिजे. याचा अनेकदा मलाही सामना करावा लागला आहे. राजकीय पत्रकारितेत महिलांची संख्या वाढणे गरजेचं आहे कारण महिलांचे प्रश्न अथवा महिलांनाही राजकीय समज आहे हे त्याशिवाय समाजाला समजणार नाही.

तर दुसरीकडे दूरदर्शन टिव्हीच्या सोनल चव्हाण सांगतात की, महिला पत्रकारांना राजकीय बीट कव्हर करण्यासाठी समज नसल्याच म्हंटल जात. आणि संपादकांमध्ये एक भितीही असते की, आपल्याला ज्या बातम्या हव्या त्या बातम्या महिला पत्रकारांकडून मिळणार नाही. कारण राजकीय बातम्यांच्या कव्हरेजसाठी रात्रीअपरात्री सुरु असणाऱ्या पार्ट्यामध्ये मुलींना जाता येत नाही. त्यात पुरुष पत्रकार असला की, तो रात्रीचा फिरुही शकतो आणि पार्ट्यांमधून ऑफ द रिकॉर्ड बातम्याही काढू शकतो असं संपादकांचं मत असावं. म्हणून महिलांना राजकीय बीट दिली जात नाही. मला देखील राजकीय बातम्यांचं कव्हरेज करताना असे अनेक अनुभव आले मात्र मी माझ्या कर्तुत्व आणि बुद्धीच्या जोरावर राजकीय कव्हरेज करते आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात राजकीय बातम्याचं कव्हरेज करावं आणि दाखून द्याव की आम्ही कमी नाही...

पत्रकारांचे म्हणणे हे सर्व संपादकांवर अवलंबून असते मात्र संपादकांच्या भूमिकेबद्दल बोलतांना दिव्य मराठी चे संपादक संजय आवटे सांगतात की बाईपणात महिलांना व्यवस्थेनं बांधून ठेवले आहे. त्यामुळे बायकांना आपलं घर मूलं हे प्राधान्य वाटतं.

माध्यामांच्या संपादकांना तसं पाहिल तर महिलांची भीती वाटत असते. त्यामुळे त्यांना राजकीय बातम्या कव्हर करू दिल्या जातं नाही. संसदेमध्ये महिलांची संख्या कमी आहे असं जे पत्रकार सांगत असतात तीच माध्यमं असा विचार करत नाही की पत्रकारितेत महिलांचं प्रमाण त्याहून ही कमी आहे. महिलांना राजकारणातलं काही कळत नाही पण सोनिया गांधी, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमन, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे अशा अनेक महिलांना राजकारण समजत असून त्या चांगल्या प्रकारे राजकारण घडू शकतात तरी सुधा महिलांना राजकारण समजत नाही असा समज आहे आपण सर्वांनीच करुन घेतला आहे.

घरगुती गोष्टीत अडकून महिलांना राजकारणापासून दूर ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे पूर्वी पासूनच सुरू आहे. याबरोबर घरात महिला नेहमी मालिका बघत असतात मात्र पुरूष हे बातम्या बघत असतात. ही जी वस्तुस्थिती ती खरंतर बदली पाहिजे. मुलींचं राजकीय आकलन वाढू नये अशी पुरुषांची मानसिकता आहे.

राजकारण समजणाऱ्या मुली मोठ्या प्रमाणात आहे तरी ही पुरूष संपादकांना भीती वाटते. कारण त्यांना बाईकी पद्धतीच्या मुली आवडतात त्यांना ठाम, कर्तुत्वान, आत्मविश्वासी महिला आवडत नाही. ठोस भूमिका घेणाऱ्या महिलांशी डील कशी करावी असा प्रश्न त्यांना पडत असावं. त्यांना बाईकी पद्धतीच्या महिला हव्या असाव्या जे त्यांच्या सांगण्यानुसार चालत असाव्या. खरंतर महिलांना राजकारण कळत नाही हा समजच चुकीचा आहे. महिलांना राजकीय आकलनापासून दूर ठेवायचं आणि त्यांना राजकीय समज नसल्याचं बोलायचं. यातून महिलांना नाही तर पुरुषांना शिकण्याची गरज आहे महिलांना समज नसल्याच न्यूनगंड नसून हा पुरुषांना असावा. महिला अनेक गुंतागुंतीची कामे सोडवत असते त्यामुळे राजकारण त्या खूप नीट आणि समजदारीने घेत करतात..

आपला स्वतःचा अनुभव पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे यावेळेस सांगतात "मी पत्रकारितेला सुरुवात केली ती १९८८ पासून आणि त्यावेळी हाच प्रश्न होता आणि आताही हाच प्रश्न आहे."

महिलांनी स्वतःला घरातल्या कामात बांधून घेतलं आहे. महिलांचा घरातल्या कामांमध्ये जास्त कल असतो म्हणून महिला राजकीय क्षेत्रात येत नाही. धाडसी काम महिलांना दिला जातं नाही कारण आपला समाज हा पुरुष प्रधान आहे. राजकारणाचा दर्जा घसरला तर तो दुरुस्त करण्यासाठी महिला तिथे पाहिजे ना. तसेच ज्यावेळी महिलांना सांगितलं जातं की तुम्हाला राजकीय समज नाही त्यावेळी महिलांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि आपल्याला जे हवे भांडून घेतलं पाहिजे कारण तुम्हाला कुणी सहज संधी देणार नाही. पत्रकारितेत जास्त महिला आल्या पाहिजे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. स्वतःतली भीती मारून संधी च सोन केलं पाहिजे.

सकाळच्या सर्वात तरुण महिला संपादिका शीतल पवार सांगतात की, राजकारण हे पावर सेंटर असल्यामुळे महिलांना यापासून दूर ठेवण्यात येते. आता राजकारणाची समज मुलींना नाही असं म्हटलं जरी जात असेल तरी मात्र राजकारण हे आपल्या सगळ्यात आहे. घरापासून दारापर्यंत राजकारण आपल्याला पाहायला मिळतेय. त्यामुळे मला असं वाटतं महिला पत्रकारांनी राजकारणाच्या बातम्या कराव्यात कारण पावर सेंटर पासून महिलांना दूर ठेवण्याचा हा प्रयत्न तो त्यांना धुडकावून लावला पाहिजे.

एकंदरीत अधिवेशन, राजकीय बातम्या कव्हर करणाऱ्या महिला पत्रकार कमी आहे. मात्र ज्या आहेत त्या धाडसाने आपलं काम करतात. महिलांनी राजकीय पत्रकारिता करण्यासाठी जोमाने पुढं यावं तसेच या पुरुषसत्ताक समाजाला दाखून द्यावं की आम्ही सर्व काही करू शकतो. हे सर्वांचेच मत आहे. यासाठी महिलांना संघर्ष करावा लागणार हे नक्की मात्र लोकसभेतल्या महिला प्रतिनीधीत्वावर बोलतांना पत्रकार ,संपादक यांनीही राजकीय पत्रकारीतेतल्या महिला संख्येवर नक्की विचार करावा.

प्रियंका आव्हाड

9969392653

awhad.priyanka11@gmail.com

Updated : 30 Jun 2019 2:04 PM GMT
Next Story
Share it
Top