Home > रिपोर्ट > माझ्या आईचं माहेर गेलं…

माझ्या आईचं माहेर गेलं…

माझ्या आईचं माहेर गेलं…
X

सकाळी साधारण पावणेअकराची वेळ. मला आधीच बरं वाटत नव्हतं. आई हॉलमध्ये आली ती पाणावलेल्या डोळ्यांनी. तिला हुंदका आवरेना. ‘विद्याताई गेल्या.’ ती बोलली आणि क्षणभर काय बोलावं ते कळेना.

विद्या बाळ नावासोबत जोडलेल्या अनेक आठवणी. अशा शेकडो आठवणी एकदम गाठून आल्या. एका पाठोपाठ एक. कित्येक कार्यक्रमात विद्याताईंना ऐकलेलं. त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या. त्यांच्या सूचना. गमतीजमती. असं बरंच काही आठवत राहिलं.

अगदी अलीकडेच विद्याताईंनी मिळून सा-याजणी युवा वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल, यासाठी मला फोन केला. ‘काय म्हणतोय युवा लेखक?’ विद्याताई त्यांच्या खास गोड आवाजात म्हणाल्या. तुझे इनपुट्स मला हवेत. पत्र कुरियरपण केलं आहे वगैरे तपशील त्यांनी सांगितले. गेल्यावर त्यांनी स्त्रियांना गजरे दिले आणि आम्हा काही पुरुषांना फुलं दिली. ‘अर्थात तुम्हा पुरुषांनाही गजरे आवडत असतील तर हरकत नाही’ असं अगदी हसत म्हणाल्याही. दिवस सुगंधित व्हायला एवढा छोटा प्रसंगही पुरेसा असतो.

२०१५ साली नागराजच्या संग्रहाच्या प्रकाशनाला त्या आल्या तेव्हा कवितासंग्रहाविषयी नेमकं बोलल्या. बाबांचं बोलणं ऐकून म्हणाल्या, ‘तुम्ही मेडिकल डॉक्टर आहात की साहित्यातले डॉक्टर?’ कार्यक्रमानंतरही कितीतरी वेळ आडवीतिडवी चर्चा सुरु राहिली. जेवण झालं तरीही गप्पा आटपत नव्हत्या. सा-यांनाच मनसोक्त बोलायचं होतं. ती चर्चाही अशीच मनाच्या कोप-यात कुठंतरी दडून बसली आहे. त्यांच्यात सतत मला प्रेमळ आजी दिसत असायची.

बाबा रामरहीम प्रकरणानंतर लॉच्या विद्यार्थ्यांनी एक निषेध सभा आयोजित केली होती. कोणाला बोलवायचं,असं मला एका विद्यार्थ्याने विचारलं. ‘शांत संयत आणि सम्यक’ मांडणी करणारं कुणी हवं, आत्यंतिक आक्रमक बटबटीत नको, असं काहीसं बोलणं सुरु होतं. दुस-याच क्षणाला माझ्या डोळ्यासमोर विद्याताईंचं नाव आलं. मी फोन केला. एका कॉलवर त्या तयार झाल्या. कार्यक्रमाला आल्याही. नेमकं, सूत्रबद्ध,मुद्देसूद बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातच हे आखीव रेखीवपण होतं. राज्यसंस्था पुरस्कृत हिंसेविषयी त्या बोलल्या आणि आपली पुढची दिशा काय असावी,हेही सांगितलं.

त्याच आसपास एकदा त्यांचा लॅन्डलाइनवरुन फोन आला. ‘सिंगल मिंगल’ आवडली हे सांगण्यासाठी त्यांनी सविस्तर कॉल केलेला. अगदी सविस्तर बोलल्या. त्यांच्या वेळचे नात्यांमधले गुंते आणि आताचे यावरही त्यांचं मत सांगितलं. हे बोलताना आजच्या पिढीविषयी कुठेही टिपीकल निराशावादी सूर नव्हता;उलटपक्षी आमच्या पिढीपेक्षा तुमची पिढी किती कॉम्प्लेक्सिटीजला निडरपणे तोंड देते आहे, असं त्या म्हणत होत्या. त्याच दरम्यान प्राचीचंही त्यांच्याशी याबाबत बोलणं झालं होतं.

विद्याताईंनी माझं कौतुक केलं,याचं आईला खूप विशेष वाटायचं. इव्हन कधीकधी काही गोष्टी आईला पटवून देताना मी म्हणायचो, अग विद्याताईंनीच 'असं' ( मला हवं आहे ते !) म्हटलेलं आहे. असं विद्याताईंच्या नावे काहीबाही खपवण्याचा माझा वेडा प्रयत्न. आईसाठी विद्याताई अगदी कुटुंबातल्या सदस्य असाव्यात इतक्या जवळच्या होत्या. तिच्या वैचारिक घडणीत विद्याताईंचा मोठा वाटा आहे. अगदी करमाळा सोलापूर भागातील तिच्या मैत्रिणींनी 'मिळून सा-याजणी' सुरु करावं म्हणून ती प्रयत्नशील होती.

पुढे सावित्रीज्योती उत्सवाच्या संदर्भाने भेटी होत राहिल्या. अगदी धुळ्यामध्ये वंदना महाजन आणि रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी आयोजित केलेल्या परिषदेसाठी त्यांना निमंत्रित केलं होतं. मी पुण्याहून धुळ्याला पहाटं ५ लाच पोहोचलो. आणि इतक्या पहाटे कुणाला उठवायचं म्हणून मी शोधत शोधत परिषदेच्या ठिकाणी पोहोचलो आणि एका दरवाजावर टकटक केली तर तिथे दरवाजा उघडणा-या बाई म्हणजे विद्याताई. ‘अरे तू इकडं कसा काय आलास गर्ल्स होस्टेलमध्ये?’ असं गमतीने म्हणाल्या आणि म्हणाल्या ‘ये आत.

तुमची व्यवस्था बाजूच्याच इमारतीत आहे. थोडा वेळ विश्रांती घेणार की चहा करु?’ तोवर आतून छाया दातार आणि विजया चौहान आल्या. सुनीती मावशीसोबत माझं व्हाटसअपवर बोलणं सुरु होतं. इतक्या पहाटं मी रिप्लाय दिलेला पाहून तिनं मला विचारलं. मी सारं सांगितल्यावर म्हणाली, ‘तीन तरुणींसोबत तुझ्यासारखा ज्येष्ठ !’

पहाटं आम्ही निरंजन टकलेंनी समोर आणलेल्या लोया केसविषयी बोलत होतो. सारं ऐकून विद्याताईंचा चेहरा चिंताक्रांत झाला होता. या प्रकरणाची चौकशी व्हावी, याकरिता आम्ही पुण्यातल्या बालगंधर्व चौकात केलेल्या आंदोलनात अगदी मोजके लोक होते. विद्याताई आवर्जून या आंदोलनाला उपस्थित होत्या. त्यांचं बोलणं कितीही कर्णमधुर आणि मृदू असलं तरी भूमिका मात्र ठाम, निश्चित होती. या प्रकरणाविषयी देशभरात अगदी मोजके लोक थेट भूमिका घेण्यास समर्थ ठरले, विद्याताई त्यातील एक होत्या.

Updated : 1 Feb 2020 8:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top