मर्द का दर्द
X
पुरुष, पुरुष अणि पुरुष... तू पुरुष आहेस ना? मग रडायला काय झाल?बाई आहेस का? रडणे हे तेवढंच साहजिक आहे जेवढं हसणं. या भावना व्यक्त न केल्यामुळेच दरवर्षी महिलांच्या कितीतरी अधिक पटीने पुरुष ह्र्दयविकार, आत्महत्या इ सारख्या अनेक कारणाने मृत्यू पावतात.
लहान असतांना मुलगा मुलगी दोन्ही सारखेच रडताना आपण पाहतो ना? मग तेव्हा ही तिथे सांगायचं ना अरे पुरुष आहेस पुरुष? रडायला काय झाले तुला?
भीती.. अरे तू याला घाबरतोस अरे मग तू कसला रे मर्द? घाबरणे ही सामान्य गोष्ट आहे आणि बऱ्याच मोठं-मोठ्या व्यक्तींना पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटतेच. काही उघड उघड सांगतात, काही नाही सांगत.
तो तर हळवा आहे. अहो डोळ्यात पाणी येणे ही काही त्याची कमजोरी नाही. ते त्याच्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे. तो चांगला गुण आहे. जगात जेवढे महापुरुष आणि महान व्यक्ती झाल्या त्या संवेदनशील होत्या म्हणून त्या मोठा बदल घडवू शकल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही फक्त तलवार हातात घेऊन घोड्यावर बसलेले वगैरे केली जाते. पण इतर राजांपेक्षा शिवरायांचे वेगळेपण काय होते ते दाखवलेच जात नाही.
राजे कनवाळू होते, मायाळू होते. सामान्य रयतेच्या गोर गरिबांच्या दुःखाने ही ते दुःखी होत होते आणि त्यांच्या न्यायाच्या दृष्टीने पाऊले उचलणारे ते राजे होते. म्हणून तर त्यांनी आपल्या सैन्याला शेतातून न जाण्याचे आदेश दिले.
तेच भगवान महावीर, बुद्ध, येशू, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, राजा राम मोहन रॉय आणि सर्वांचेच स्वतःच्या दुःखाने कोणीही दुःखी होईल दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होईल तो खरा माणूस आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर तो खरा पुरुष आणि या संवेदनशीलतेमुळेच ते एवढा मोठा बदल घडवू शकले.
पण त्यांची ती संवेदनशीलता आम्ही विसरून गेलो. आम्हाला पुरुष म्हणजे रांगडा , रागीट वगैरे पाहिजे. नाते टिकवूया या सामजिक चळवळीमध्ये आम्ही सगळ्या प्रकारची नाती समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात जसे नाते उत्तम असणारे लोक त्यांची नाती अधिक बळकट कशी करता येतील त्यासाठी किंवा त्यांच्या नात्याबद्दल च्या कल्पना शेयर करण्यासाठी संपर्क करतात. त्याचप्रकारे ज्यांचे नाते तुटत आहे पण टिकवायचे आहे असेही लोक ते नाते कसे टिकवता येईल त्यासाठी संपर्क करतात.
स्त्री असेल आणि तिला नाते टिकवायचे असेल तर आम्हाला बरीच मदत करता येते. समुपदेशननंतर कायदेशीर लढा ही देता येतो. पण नाते जर पुरुषाला टिकवायचे असेल आणि समजा स्त्री ने तोडायचे ठरवले तर?अश्या वेळी बऱ्याच मर्यादा येतात, समुपदेशन तर करता येते पण कायदेशीर लढ्याला मर्यादा येतात. आणि हो जसा स्त्रियांचा छळ होतो तसा पुरुषांचा ही होतो. फक्त तो तेवढा समोर येत नाही.
अशीच एक केस राजेशची. माझ्या पत्नीने मला लग्नापूर्वी खूप काय काय सांगून पटवलं पण माझ्यापेक्षा श्रीमंत मुलगा मिळू शकतो हे लग्नानंतर लक्षात येताच मला जीवनातून हटवलं. मी माझी परिस्थिती आणि सगळं काही स्पष्ट सांगितलं होतं. पण लग्नानंतर आमच्या घरात तिच्या घरच्यांचा प्रचंड हस्तक्षेप वाढला. घरात भाजी करण्यापासून ते रूममधल्या गोष्टींपर्यत सगळ्याच गोष्टीत.
मी बागेत गेल्यावर तिची चेष्टेने छेड काढण्याला ही तिच्या घरचे लोक विकृत चाळे वगैरे म्हणत. तिच्या आईला आणि तिच्या आईमुळे बाकीच्या माहेरच्यांना घरातील आणि बाहेरील सगळ्या गोष्टी अर्धवट माहित होत्या. प्रत्येक गोष्टीवर मीटिंग आणि नाते टिकवायचे म्हणून माझ्याकडून तिच्या चुका झाकून माफी मागणे
गैरसमज वाढत गेले आणि नाते तुटले.
मी तिला तिच्या गुणदोषांसह स्वीकारले. पण तिने कधी स्वीकारलेच नाही.
नाते तोडण्यासाठी सतत काहीतरी डावपेच करत राहिली. मला सांगा ना मी काय करू?
अशीच गोष्ट राहूलची
लग्न झाले. २ मुले झाली. पण पत्नीसोबत राहत नाही. २-३ वर्ष झाले चकरा मारतोय कोर्टात. अशीच अनेक मुले म्हणजे पुरुष. देतोस का परस्पर सहमतीने घटस्फोट नाहीतर पाठवते वेगवेगळी खोटी नाटी कारणे लावून नोटीस, तुला माहीतच असेल कायदे कुणाच्या बाजूने आहेत.
मग काय लिहून टाकायचं आम्ही ३० लाख लग्नाचा खर्च केला. ५० लाखांचे दागिने केले. मुलावर शारिरिक, मानसिक आजार असल्याचे आरोप करायचे. सोबत अत्याचार केला, बेजबाबदार आहे, नामर्द वगैरेंच्या अफवा आणि असलेच खोटे आरोप लावून त्याची फसवणूक करून त्यालाच उलटी नोटीस. कोर्टात केसेस, समाजात बदनामी. वगैरे प्रकार करायचे.
साहेब तिने तर आता नोकरी सोडून दिली. पण मी काय करू? मला तर घराची जबाबदारी सांभाळायची, नोकरी-व्यवसाय करायचा माझ्या बहिणींना छोट्या भावंडांना शिकवायचे आहे मला. मग माझे कितीही प्रेम असले तर नाते टिकवण्यासाठी कोर्टात चकरा मारू की? की स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळू? की पालकांची तब्येत सांभाळू? सांगा ना सर मी काय करू?
तिने माझ्यावर एवढे आरोप करून ही माझं तिच्यावरच प्रेम काही कमी होत नाहीये. सांगा मी काय करू? मी एक घास ही तिला सोडून घेतला नाही. ती मागेल ती गोष्ट आणून द्यायचो. तिला सर्वस्व मानले, तरी असे का घडले साहेब?
असाच राघव. सीमावर जीवापाड प्रेम करणारा. स्वतःची software इंजिनीअरची चांगली नोकरी सांभाळून सामजिक कार्यातही हातभार लावणारा गुणी मुलगा. समाजाप्रति संवेदनशील होऊन लोकांना विचारप्रवृत्त करणारे लिखाण करणारा.
त्याची ५-६ पुस्तकंही आलेली.
लग्नापूर्वीच त्याच्या लिखाणाबद्दल सामजिक कार्याबद्दल तिला सगळे माहीत होतं. माझ्या सामजिक कार्यामुळे तुला काही त्रास तर नाही ना? मी घर आणि नोकरीला प्राधान्य देऊन ते करत राहीन. तर सीमांचे उत्तर, अरे त्यामुळेच तर मला तू आवडलास, मी प्रोत्साहन देईल त्याला.
पण लग्नानंतर मात्र चित्रच बदलले. त्याने सार्वजनिक काही लिहले कि हे आमच्यावरच आहे असा तिच्या घरच्यांचा आरोप असायचा. त्यातून सतत राजेशचा मानसिक छळ होत. सीमाचा नेहमीचा प्रश्न तू हे सामजिक कार्य करतोस मग गाडी बंगल्याचे काय?
अगं त्यासाठी तर मी नोकरी करतोय ना? होईल हळूहळू तेही होईल. तु थोडी साथ दे ना. तुला तर नोकरी करण्याचे आणि नवीन काही शिकण्याचे सगळेच स्वातंत्र्य आहे.
पण नाही. तिला तिच्या घरच्यांनी स्वप्नीलशी ओळख करून दिली. बघ हा स्वप्नील, लाखो रुपये कमावतो. बघ परस्पर सहमतीने देतो का राजेश घटस्फोट, जमवून टाकू लगेच इथे. नसेल देत तर मग नोटीस पाठवू, समाजात बदनामी करून मानसीक छळ करू. मग द्यावाच लागेल त्याला मग घटस्फोट.
अहो पण त्याचे प्रेम, लग्न वगैरे? अगं ते गेले खड्ड्यात.
अशीच एक गोष्ट रुपेश आणि पूजाची.
रुपेशला जास्त राग येत नाही किंवा आलाच तर तो थोड्या वेगळ्याप्रकारे व्यक्त करतो. हे काय पूजाला आवडत नाही. जेव्हा दोघांचे नाते बिनसू लागले तेव्हा रुपेश घाबरला. नाते टिकवण्यासाठी काहीही करण्याची त्याने तयारी दाखवली.
पूजा म्हणाली मला माझा नवरा थोडा रागीट, धाक लावणारा असा हवा होता
तुझा तर घरातही दरारा नाही, तुला कुणी घाबरत नाही, कुठे काही कुणाचे दुःख पाहिले की तुला लगेच भरून येते. मग कसला रे पुरुष तू? be like a man
सुरवातीला तर रुपेशने नकार दिला "मला कुणाची भीती वाटत नाही आणि मला कोणी घाबरावे असे मला वाटत नाही मग कशाला उगाचच या गोष्टी" अस तो म्हणाला.
पण पूजावर जीवापाड प्रेम. मग नाते टिकवण्यासाठी या गोष्टी तो forcefully करू लागला आणि रुपेशचे बदललेले रूप पूजाला तर नाहीच पण इतरांनाही आवडले नाही आणि याचाच आधार घेऊन तिने घटस्फोटाची मागणी केली.
ज्यांना या गोष्टी खोट्या वाटतात त्यांनी कधीतरी कौटुंबिक न्यायालयात चक्कर मारावी आणि पुरुषांची परिस्थिती पहावी.
होय. अन्याय करणारे, दारू पिऊन मारणारे, बाहेर अफेअर करणारेही पुरुष असतीलच. पण वरीलपैकी एक ही त्यातील नाही. कुणाला कुठले व्यसन नाही की दुसरे प्रेमप्रकरण किंवा इतर काहीही नाही.
ते परिपूर्ण नाहीत हे मान्यच. पण जगात परिपूर्ण असे कोण आहे? जेवढे घटस्फोट होतात त्यात अधिकाधिक घटस्फोट मुलीच्या आईच्या आणि माहेरच्यांच्या त्यांच्या घरातील अतिहस्तक्षेपामुळे होतात असे अनेक विधिज्ञांचे, कौटूंबिक समुपदेशकांचे मत आपण नेहमीच वर्तमानपत्रात वाचत असतो. आसपास अनुभवतही असतो.
म्हणजे जसे तिकडून नको तसे मुलाच्या आई-वडिलांकडूनही नको. पण बऱ्याच ठिकाणी मुलाचे आई-वडील वेगळेही होतात आणि तुम्ही दोघे सुखी रहा पण आमच्यामुळे तुमच्या नात्यात बाधा नको म्हणतात.
संवाद असावाच पण प्रमाणात. मुलांनासुद्धा स्वतंत्र विचार करू द्यायला हवा. मुलगा असो वा मुलगी, दोघांना एकमेकांसाठी थोडे सकारात्मक बदल करू द्यायला हवे. (सकारात्मक म्हटलंय नकारात्मक नव्हे)
पुरुषांनीही स्वतःला या पुरुषसत्ताक कोषातून बाहेर काढायला हवे. आपण नेहमी ऐकतो की शेतकरी आत्महत्या होतात. पण शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे किती जणांनी ऐकले? आर्थिक, सामजिक कारणे असतीलच पण मुख्य कारण काय? ते म्हणजे पुरुष. तू पुरुष आहे म्हणजे तू सगळे सांभाळलेच पाहिजे. बायका-मुलांना नाही सांभाळता आले तर नैराश्यातून तो हा मार्ग स्वीकारतो.
नोकरदारांमध्येही मुलीची नोकरी गेली तर एवढे कोणी विचारत नाही पण मुलाची गेली तर किती दडपण टाकले जाते. कोणत्या दृष्टीने पाहिले जाते? लग्नाच्या बाजारात ही तेच. आपल्यापेक्षा कमी पगार असणारा, नुकताच सेटल होत असणारा किंवा सेटल न झालेला मुलगा नवरा म्हणून किती मुली स्वीकारतात?
आम्हाला मुलगा well settled स्वतःचे मोठे घर, चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी किंवा व्यवसाय वगैरे असणारा वगैरे हवा. आता आपण स्त्री -पुरुष समानतेच्या गोष्टी करता मग घर, नोकरी वगैरे दोघांच्या जबाबदाऱ्या नाहीत का? म्हणजे अधिकार सर्व हवेत पण कर्तव्य मात्र नकोत असा त्याचा अर्थ होतो.
असो हा लेख नुसता वाचला आणि सोडून दिला असे करू नका. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने पावले आपणा सर्वांनाच उचलावी लागतील. आपल्याला इथे स्त्रीचे अथवा पुरुषाचे असे कुणाचेही कुणावर वर्चस्व नको. सर्वांची एकमेकांशी निखळ मैत्री हवी. साथ हवी.
स्त्रिया स्वतः पीडित आणि शोषित असल्यामुळे त्यातील काही या व्यवस्थेविरोधात एकत्रित उभ्या राहिल्या आणि आज बऱ्याच प्रमाणात पुढे आल्या. पण पुरुष मात्र त्यापासून वंचित राहिला. जे थोडे बहुत प्रयत्न करू लागले त्यांच्यातील महापुरुष सोडले तर बाकीच्यांना be like a man वगैरे त्यांच्याच जवळच्या महिलांकडून आणि पुरुषांकडूनच हिणवलं गेलं.
पण खरंतर काय आवश्यक आहे? Don't be like a man or women. Just be like Human
यामुळे हिंसेकडे, व्यसनाकडे, अत्याचाराकडे, रागाकडे, द्वेषाकडे वळणे थांबेल. बरेच शारीरिक मानसिक अत्याचार कमी होतील. आत्महत्या, नैराश्य इ.चे प्रमाण कमी होईल आणि एका प्रगल्भ मानवतेकडे आपण वाटचाल करू.
तर जी हाँ,मर्द को दर्द होता है,
और जिसको दर्द होता है वही मर्द होता है!
चुकभुल क्षमस्व
-संकेत मुनोत