डॉ हेमलता पाटील यांचा अनोखा निषेध
X
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम असून नाशिक जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. यासंदर्भात काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी अनोख्या पद्दतीने नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना फुल देऊन प्रतिकात्मक निषेध केला. शहरामध्ये खूप पाऊस होत असल्याने पूर रेषेमध्ये जी बांधकामे झाली आहेत, त्याचबरोबर शहरात विनापरवानगी होणारे बांधकाम याची चौकशी करून ही अतिक्रमणे त्वरित थांबवावी ही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शहराच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन पूर्ण शहरांमध्ये पावसाळी गटार योजना राबवावी असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये असणाऱ्या अनधिकृत सर्व बांधकामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करणे गरजेचं आहे . त्यामुळे भविष्यात अशा घटना शहरांमध्ये घडणार नाहीत यासाठी तातडीने मोहीम हाती घेणे गरजेचं आहे.
काय आहे पत्रात ?
प्रति ,
मा आयुक्त सो.
नाशिक महानगरपालिका नाशिक
विषय :- नाशिक मधील नैसर्गिक नाले व अतिक्रमण बाबत....
स महोदय ,
संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातलेले आहे सांगली कोल्हापूर या भागाचे तर अतोनात नुकसान झालेले आहे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात दिसून येते नाशिक शहरापुरते बोलायचे तर पूर्वी एक एक महिना शहरांमध्ये संततधार पाऊस पडायचा परंतु अशी यातायात परिस्थिती निर्माण व्हायची नाही सद्यस्थितीमध्ये दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडला तर संपूर्ण शहर पाण्याखाली जाते ही परिस्थिती पाहायला मिळते यामागचे कारण शोधायचे झाले तर शहराला हे बकाल स्वरूप आणण्यामध्ये सर्वांचाच पापाचा वाटा आहे हे मान्यच करावे लागेल
महोदय मी प्रश्न उत्तरांमध्ये नाशिक मधील नैसर्गिक नाल्यांची परिस्थिती विचारली असता 22 नाले उपलब्ध आहे असे उत्तर मिळाले होते त्या नाल्यांचा शोध घेतल्यानंतर सर्व नाले बुजवून टाकून त्यावर टोलेजंग इमारती उभे असल्याचे कटू वास्तव समोर आले.
शहरामधून वाहणाऱ्या नंदिनी नदीला गटारगंगा चे स्वरूप प्राप्त झाले आहे याबाबतीत आंदोलन केल्यानंतर त्यामधील होर्डिंग व मिसळणाऱ्या गटारीचे पाणी थोड्याफार प्रमाणात कमी झाले परंतु नदीच्या काठाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे काही अज्ञात व्यक्तींनी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकल्याने यावर्षी माझ्या प्रभागातील मिलिंद नगर स्लॅम पूर्ण पाण्याखाली गेला सदरचा भराव कोणी व का टाकला याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही
शहरांमध्ये चुकीच्या पद्धतीने परवानग्या घेऊन अनेक इमारती उभ्या आहेत त्यांच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी जाण्यास वाट मिळत नाही पर्यायाने सर्व इमारती पाण्याखाली जाऊन त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो त्याचप्रमाणे शहरांमध्ये पावसाळी पाण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही बऱ्याच ठिकाणी पावसाळी गटारीच्या काही लाईन भुयारी गटारी ला जोडलेल्या आहे ड्रेनेज चे चेंबर्स हे डांबराखाली दबले असल्यामुळे नक्की कोठे चेंबर्स आहे हे लक्षात येत नाही अशाच पद्धतीची परिस्थिती भविष्यात राहिल्यास शहरांमध्ये अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
शहराच्या प्रश्नांची जाण असणारे असे आपण आयुक्त आहात माझी आपणास नम्र विनंती आहे , पूर रेषेमध्ये जी बांधकामे झाली आहे , शहरामध्ये काही ठिकाणी नगर रचना खात्याने सर्व नियमांची पायमल्ली करून या बांधकामांना परवानगी दिलेली आहे या सर्व गोष्टींची तातडीने चौकशी करून ही अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी.
नंदिनी नदीवरील अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी गॅबियन वॉल व वृक्षारोपण करण्यात यावे व संपूर्ण शहरांमध्ये पावसाळी गटार योजना राबवावी ही विनंती
शहरांमध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबद्दल एखादी थर्ड पार्टी एजन्सी नेमून या सर्व बांधकामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरती कार्यवाही केली तरच शहर मोकळा श्वास घेईल व भविष्यात अशा घटना शहरांमध्ये घडणार नाहीत कृपया आपण तातडीने ही मोहीम हाती घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
आपली विश्वासू ,
डॉ सौ हेमलता निनाद पाटील
नगरसेविका प्रभाग क्र 12
नाशिक महानगरपालिका नाशिक