Home > रिपोर्ट > Nirbhaya Case : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!

Nirbhaya Case : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!

Nirbhaya Case : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!
X

निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर

देशाची राजधानी दिल्लीत २०१३ मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार नराधमांना अखेर आज पहाटे फासावर लटकवण्यात आले आहे. ही फाशी टाळण्यासाठी आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत शर्थीचे प्रयत्न केले. अनेकदा फाशी पुढे ढकलण्यात आली; परंतु फाशी रोखण्यासाठीचे कोणत्याही न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याने त्यामुळे आज पहाटे आरोपींना फाशी दिली गेली. तिहार जेलमध्ये या चौघांना फासावर चढवण्यात आले. संपूर्ण देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेतील दोषींना फासावर चढवण्यात आल्याने निर्भयाच्या आईने आपल्या मुलीला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

९ फेब्रुवारी, २०१३ रोजी तिहार कारागृहात अफझल गुरूला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा फाशीची अंमलबजावणी झालीय निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात !!! चौघांना एकाच वेळी फाशी देण्याची तिहारमधली ही पहिलीच घटना होती.

१६ डिसेंबर, २०१२ रोजी घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्याकांडाने अवघा देश हादरला होता. अत्यंत क्रूर पद्धतीची ही घटना होती. न्यायालयाने या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना म्हटलं होतं. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित होऊनही आरोपी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश सिंग, अक्षय कुमार सिंग यांची फाशी वकीलांमार्फत विविध कायदेशीर क्लृप्त्या अवलंबल्यामुळे वाॅरंट निघाल्यानंतरही वारंवार टळत होती. पीडीतेची आई या साऱ्या घटनांनी व्यथित होती. प्रत्येक टप्प्यावर त्या माऊलीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची पराकाष्ठा केली. अखेर एका आईचा लढा जिंकलात आणि आरोपी फासावर गेले.

तुरूंग नियमांप्रमाणे अधिकारी फाशीपूर्वी आरोपींना भेटले. कागदपत्रांची पूर्तता केली. त्यावेळी आरोपीचं सगळं अवसान गळून पडलं होतं. नियमाप्रमाणे आरोपींच्या कुटुंबियांना फाशीच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. कोठडीतून फाशीच्या ठिकाणाजवळ पोचण्यापूर्वी आरोपींना चेहऱ्यावर बुरखे चढवण्यात आले. पवन जल्लाद मंगळवारपासूनच तिहारमध्ये होता. गेले दोन दिवस फाशीची तयारी सुरू होती. काल डमी फाशी देऊन सरावही करण्यात आला होता. आज पहाटेच फाशीची अंमलबजावणी झाली व गेली आठ वर्षे सुरू असलेल्या बहुचर्चित प्रकरणाचा अध्याय संपुष्टात आला.

Updated : 20 March 2020 12:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top