'त्या' जातपंचांना तात्काळ अटक करा; नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Max Woman | 5 Jun 2019 12:35 PM IST
X
X
पुरोगामी महाराष्ट्रात सातत्याने जातपंचायतीच्या अनेक घटना घडल्याचे समोर येत आहेत. मागील महिन्यात कंजारभाट जातपंचाने पीडित कुटूंबाला वाळीत टाकले होते. या घटनेत कारवाई होते की नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जातपंचायतीने एका १५ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला कुटुंबासह वाळित टाकले आहे. तरी या जातपंचांना तात्काळ अटक करा अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडितेचे आई-वडील मोलमजुरीसाठी गुजरातला गेले होते. एप्रिलमध्ये ते परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपली मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. जातपंचायत सदस्याच्या नातेवाईकाने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांचा आहे. या मुलीच्या गर्भात वाढणारे अर्भक गोळ्या घेऊन पाडावे, असा पंचायतीचा आदेश पीडित कुटुंबाला दिला होता. परंतु, आरोग्यासाठी गर्भपात करणे घातक असल्याने पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनीही यास नकार दिला. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या जात पंचायतीने पीडित कुटुंबावर ११ हजार रुपयांचा दंड ही आकारला होता. याबाबत १९ मे, २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला. यानंतर जात पंचायत अधिकच भडकली. तक्रार परत घ्या किंवा ११ हजार दंड भरा, असे नवे फर्मान पंचायतीने काढला आहे. सध्या ही अल्पवयीन मुलगी धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात आहे. ३० मे रोजी तिने एका मुलीला जन्म दिला.
कुटुंब जातपंचायतीच्या दहशतीखाली
दरम्यान पीडित कुटुंबाला मोबाइलवर धमक्या ही दिल्या जात आहेत. कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहेत.
नीलम गोऱ्हेंनी पीडितेसाठी केलेल्या मागण्या
१. पीडित मुलीला मनोधैर्य योजने अंतर्गत मदत देण्यात यावी.
२. पॉक्सो कायद्यानुसार आरोपींवर
गुन्हा नोंद करण्यात यावा.
३. संशयित आरोपींचे डीएनए तपासणी करण्यात यावा.
४. भिल्ल जातपंचायतीच्या सदस्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी.
५. ज्या जातपंचायत सदस्यांवर असे अनेक गुन्हे असतील त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा.
वरील सर्व मागण्या आणि प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे असणारेय.
Updated : 5 Jun 2019 12:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire