Home > रिपोर्ट > हेडलाईन लिहीणाऱ्यांनो "आई" एकटी मुलांना पैदा करत नाही...

हेडलाईन लिहीणाऱ्यांनो "आई" एकटी मुलांना पैदा करत नाही...

हेडलाईन लिहीणाऱ्यांनो आई एकटी मुलांना पैदा करत नाही...
X

पुणे परिसरात घडलेली घटना. दोन अर्भकांना कचऱ्यात टाकून दिलं आणि ते सापडले.

या घटनेची बातमी देणाऱ्या पेपरने लिहिलं होतं, ‘आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी.’ त्यातच पुढे लिहिलं होतं की मुलगी असल्यामुळे अर्भकांना टाकून देण्याचा प्रकार या परिसरात वाढला होता. पण येथे एका मुलीसोबत एक मुलगाही होता त्यामुळे या परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.’

दुसऱ्या पेपरने लिहिलं, ‘जन्मदातीने तोडलं मातृत्वाचं नातं’.

बातमी लिहणारे दादा, ताई नसाव्या ही अपेक्षा... तुम्हाला काय म्हणायचं आहे? अर्भक अशी कचऱ्यात सापडतात, तेव्हा फक्त जन्म देणाऱ्या आईचा दोष असतो? आपण त्या देशात राहातो जिथे बलात्कारानंतर 12 वर्षांच्या मुलीला बाळाला जन्म द्यावा लागतो, कारण कोर्ट गर्भपाताची परवानगी नाकारतं. बलात्कार, वेश्याव्यवसाय, दारिद्र्य, अनिच्छेने केलेल्या संबंधातून राहिलेला गर्भ, आपल्या उपभोगासाठी ठेवलेल्या महिलेला झालेली मुलं आणि लोढणं नको म्हणून टाकून देणं, आजारीपण किंवा आईचा झालेला मृत्यू यातलं काहीही कारण असू शकतं. आणि यातल्या बऱ्याच कारणांमध्ये ती बाई व्हीक्टीम असते लक्षात घ्या. पण नाही, आपल्याला व्हीक्टीम शेमिंग करायचंच असतं. जसं तिच्यावर होणाऱ्या बलात्काराला बाई जबाबदार असते, तसंच कचऱ्यात फेकून दिलेल्या बाळांनाही आईच जबाबदार असते.

प्रश्न या दोन पेपरचा नाहीये, या घटनेच्या बातम्या इतर पेपरमध्येही, चॅनलवरही कमी अधिक प्रमाणात अशाच आशयाच्या, हेडलाईनच्या असतील. जेंडर सेंसेटायझेशन प्रकार मीडियात अभावानेच आढळतो. अनेकदा अशा घटनांच्या बातम्या येतात, आणि हेडलाईन काय असते? ‘जन्मदात्या आईनेच फेकले अर्भकांना कचऱ्यात’, ‘माता न तु वैरिणी’, ‘चिमुकले रडतात आईसाठी, पण आईचा ठावठिकाणा नाही.’

हवेतून राख काढावी तसं आई पैदा करत नाही ना बाळाला. त्यात बाप नावाचा फॅक्टर असतो की नाही कुठे? मग जन्मदात्या वडिलांनीच मुलांना टाकून दिलं कचऱ्यात ही हेडलाईन का नाही दिसत? माध्यमं म्हणून आपण सगळेच जरा शांतपणे विचार करूयात. स्त्री हक्काच्या बाता करायच्या आणि अशा बातम्या लिहायच्या, मग आपल्यासारखे ढोंगी आपणच.

निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी झाली म्हणून टाळ्या पिटणारे पण गर्दीत बाई सापडली की सगळीकडे हात लावणारे लोक आणि आपण, यांच्यात काहीतर फरक ठेवूयात.

ता.क : मुलगी असल्यामुळे अर्भकांना टाकून देण्याचा प्रकार या परिसरात वाढला होता. पण येथे एका मुलीसोबत एक मुलगाही होता त्यामुळे या परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मुलगा असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे? What the hell? सॉरी बॉस, यावर तर मी बोलणारच नाही. तुमचं तुम्ही ठरवा.

-अनघा पाठक (बिबीसी मराठी पत्रकार)

Updated : 16 Jan 2020 12:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top