महिला सुरक्षेसाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा- मुंबई पोलिस
X
महिलांच्या बाबतीतले गुन्हे रोखण्यासाठी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सराईत गुंडांची यादी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. वेळ आलीच तर गुंडांना स्थानबद्ध करण्याचे आदेश परमवीर सिंग यांनी दिले आहेत. अन्यायाविरोधात बोला, असं आवाहन पोलिस आयुक्तांनी मुंबईकरांना केलंय.
पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर परमवीर सिंग यांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे.
एक रिक्षाचालक महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ समोर येताच गोरेगाव पोलीसांनी त्याला त्वरित अटक केली. त्याच्यावर योग्य ती कारवाई करून या पुढे ही असेच महिला सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलंय.
ते रिट्वीट करून, यासारख्या घटनांना कठोरपणे आणि वेगाने हाताळणे आवश्यक आहे. मी मुंबईला आश्वासन देतो की महिलांची सुरक्षा मुंबई पोलिसांच्या सर्वोच्च प्राथमिकतांपैकी एक आहे. शहर सर्व नागरिकांसाठी सुरक्षित आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी, मुंबईकरांनी असल्या घटनांबद्दल तक्रार करावी असे मी आवाहन करतो, असं उत्तर पोलिस आयुक्तांनी दिलं आहे.
यासारख्या घटनांना कठोरपणे हाताळणे आवश्यक आहे. मी मुंबईला आश्वासन देतो की महिलांची सुरक्षा @MumbaiPolice च्या सर्वोच्च प्राथमिकतांपैकी एक आहे. शहर सर्व नागरिकांसाठी सुरक्षित आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, मुंबईकरांनी असल्या घटनांबद्दल तक्रार करावी असे मी आवाहन करतो.#WomenSafety https://t.co/063vdgVpuX
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 2, 2020
सदैव तत्पर, सदैव मदतीस...या शीर्षकाखाली महिला, मुलांशी संवाद साधतानाचे फोटो मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवरून प्रसारित करण्यात आले आहेत. त्याला जोरदार प्रतिसाद ट्विटरवर मिळतो आहे.
परमवीर सिंग यांच्या आदेशानुसार, मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वागत कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक केली जाणार असून, प्रत्येक तक्रारदाराशी सौजन्याने बोलण्याचे व उचित मार्गदर्शन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.