Home > रिपोर्ट > पावसाच्या ओल्या गळ्यात गळा घालून येते जराशी...

पावसाच्या ओल्या गळ्यात गळा घालून येते जराशी...

पावसाच्या ओल्या गळ्यात गळा घालून येते जराशी...
X

ऐन पावसात आम्ही आस्वलीहून निघून बार्डाचा डोंगर पार करून वेवजीला जायचो आणि परतही त्याच वाटेने यायचो. त्याची आठवण येतेय आज. छत्रीबित्री, रेनकोटफिनकोट काहीही नसे. मी साडी नेसून डोंगर चढायचे, उतरायचे, चपला पाठीवरच्या पिशवीत टाकायच्या नि अनवाणी डोंगर पार चालायचं हे तेव्हा दिव्यबिव्य वाटत नसे. सहजच होत होतं सारं.

चढताना दम लागला, तहान लागली तर वाटेत पावसात आ करून हाहाहाहाहा करत उभं रहायचं किंवा वरून खाली खळाळत उड्या मारत, दगडाधोंड्यांवर टक्कर घेत जाणाऱ्या धबाब्यातून पाणी प्यायचं..

एकदा तर आम्ही तिघं म्हणजे मी, धन्या आणि प्रताप नावाचा एक मित्र त्या ओहोळातूनच घसरत खाली आलो होतो. शेवाळाने मऊ गुळगुळीत झालेल्या दगडांवर पाय न ठरण्याचे निमित्त झालं, आणि मग सरळ तिथून घसरतच जायची आयडिया निघाली.

पाठ ठेचकाळून निघालेली- पण फार नाही.

चिंब भिजून थंडी वाजलेली- पण फार नाही...

सगळंच सोपं वाटायचे पावसाचे दिवस.आणि मग शेतांतून मऊशार आवणीच्या चिखलात घोटाघोटा पावलं बुडवत तुडवत घरी गेल्यावर गवती चहाची पात ढकललेला गोड कोरा चहा घेऊन, चुलीवर भात चढवायचा, डाळ शिजवायची किंवा बटाट्याचा रस्सा टाकायचा... ते जेवून थकल्या जिवाने, तरतरीत मनाने, डोळ्यात कसली कसली स्वप्नं घेऊन झोपून जायचं.

आता हे सगळं आपण केलं, हेसुद्धा खरं वाटेनासं होतंय.

हा पाऊस बळेच गळ्यात हात घालतो आठवणींचे.

गच्चीतल्या बागेत गवती चहा नि पुदिना भरपूर आहे...

त्याच्यावर आठवणींची तहान भागवून घेईन म्हणते.

गोड कोरा चहा सुद्धा नाही आता...

अगोड.

पावसाच्या ओल्या गळ्यात गळा घालून येते जराशी...

(लेखिका मुग्धा कर्णिक यांनी 1979 साली अनुभवलेल्या गंमतीशीर पावसाची आठवण फेसबुकवर शेअर केली आहे)

Updated : 1 July 2019 8:33 AM GMT
Next Story
Share it
Top