Home > Max Woman Blog > लग्नाशिवाय आई झालेल्या स्त्रीला मानसन्मान मिळतो का?

लग्नाशिवाय आई झालेल्या स्त्रीला मानसन्मान मिळतो का?

लग्नाशिवाय आई झालेल्या स्त्रीला मानसन्मान मिळतो का?
X

मला काही मैत्रिणींनी 'Motherhood Dare' मध्ये tag केलं आहे. मी अनेकवेळा अशा चॅलेंजकडे दुर्लक्ष करते आणि त्यात भाग घेणं टाळते, पण ह्या नव्या चॅलेंजकडे दुर्लक्ष करणं मला अशक्य वाटतंय.

मला असं वाटतं की मातृत्वाचा गौरव करणं ही अत्यंत पितृसत्तावादी कल्पना आहे. बहुसंख्य बायकांसाठी ‘आई’ होणं किंवा न होणं यामध्ये निवडीला वावदेखील नसतो. लग्न झालेल्या बाईवर ‘आई’ होण्याची सक्ती असते आणि लग्न न झालेल्या बाईवर मूल होऊ न देण्याची सक्ती असते. किमान आपल्या देशात तरी मूल केव्हा होऊ द्यायचं, होऊ द्यायचं की नाही, किती मुलं व्हावीत हे ठरवायचा अधिकार लग्न झालेल्या बहुसंख्य बायकांना मिळू दिला जात नाही. शक्यतो मुलगाच जन्माला घालावा किंवा किमान एकतरी मुलगा झालाच पाहिजे अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते.

मुलगा नसलेल्या बायांना असंख्य वेळा हेटाळणी सोसावी लागते, कधीकधी तर वंशाला दिवा दिला नाही म्हणून घरातून हाकलून लावलं जातं किंवा जीवदेखील गमवावा लागतो. नवर्‍यातल्या शारीरिक कमतरतेमुळे मूल होत नसेल तरी दोष बाईलाच दिला जातो, तिला अनेक सणसमारंभातून वगळलं जातं! अशा सामाजिक परिस्थितीत मूल होऊ देण्याच्या निर्णयापेक्षा मूल नको असल्याचा निर्णय घ्यायलाच मोठं धाडस लागतं.

पण एखाद्या बाईने जर लग्नशिवाय आई व्हायचं ठरवलं तर तिला समाजात मानसन्मान मिळतो का? डोहाळेजेवणासारखे लाडकोड तिच्या वाट्याला येतात का? एवढंच नाही तर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत अशा कुठल्याही प्रकारच्या एकल आईला समाजातून कसलीही मदत किंवा सहानुभूती मिळत नाही. एकल मातांना समाजाच्या पाठिंब्याची जास्त गरज असते, पण त्याऐवजी तिची आणि तिच्या मुलांची सुद्धा कुचेष्टा केली जाते, अडवणूक केली जाते आणि शक्य तितका त्रासच दिला जातो. कारण ‘चांगली आई’ आणि ‘वाईट आई’ असण्याचे निकष बाईच्या पुरुषाशी असलेल्या नात्यावर अवलंबून असतात.

एका विशिष्ट चौकटीच्या आत असलेल्या मातृत्वालाच समाजात मान मिळू शकतो. 'मातृत्व' ही सध्या तरी Patriarchal construct आहे. त्याबद्दल सोशल मीडियावर glorification करावं असं मला वाटत नाही. एरवी माझ्या मुलीसोबत मी अनेकदा निष्कारण फोटो लावेन, पण Motherhood Dare साठी लावायची इच्छा नाही!

- वंदना खरे

Updated : 1 March 2020 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top