Home > रिपोर्ट > सोमवारला का म्हणतात ‘मंडे ब्लुज’ ?

सोमवारला का म्हणतात ‘मंडे ब्लुज’ ?

सोमवारला का म्हणतात ‘मंडे ब्लुज’ ?
X

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर येणारा सोमवार फारच आळसावलेला असतो. डोळ्यावर झापड, कामाचा डोंगर आणि वेळेचं गणित बसवताना जी तारांबळ उडते, पुछो मत! शाळकरी, कॉलेजकरी, कामकरी मंडळी कधी एकदा घराबाहेर निघातातेत असं होऊन जातं. ती गेली म्हणून कामं संपतात असं नाही, पण त्यांच्यामागे होणारी धावपळ थांबते.

सगळे गेले, की पसाऱ्यातून जागा करत सोफ्यावर पाच मिनिटं पाठ टेकायची, मान मागे कलती टाकायची आणि पाय स्टुलावर अलगद टाकून झटपट शवासन करून घ्यायचं. अं हं! अलार्म लावायची गरज नाही. दूधवाला, पेपरवाला, कचरा नेणारा हे आपण सेट न केलेले अलार्म आपल्याला उठवायला हाजीर असतात. पण त्या दोन क्षणांत लागणारी डुलकी...स्वर्गसुख!

सबंध आठवड्याचा भार खांद्यावर घेऊन येणारा सोमवार आळसावलेला असतो, म्हणून त्याला मंडे ब्लुज असं म्हणतात. खरं तर त्याची सुरुवात उत्साहाने व्हायला हवी, क्यूँकी शुरुवात अच्छि तो अंत भला! पण एवढा उत्साह सतत आणायचा कुठून असा प्रश्न पडतो. मनात असे द्वंद्व सुरू असताना आळसावलेल्या मनाचं पारडं जड होतं. छोडो यार, थोडा आराम करलो, असं म्हणत मोबाईल हातात येतो. दुनिया फिरवून आणतो. घड्याळाच्या का(र)ट्याला वेग येतो, तो भराभर चालू लागतो. सोशल मीडिया भ्रमंती करून, पेपरमधलं कोडं सोडवून आणि जगभरातल्या ताज्या घडामोडी वाचून नजर घड्याळाकडे न्यावी तर बारा वाजले असतात. त्याचे आणि आपलेही!

मंडे ब्लुज चा पारा झटकन खाली उतरतो. मधले दोन तास कधी निघून गेले, हे न कळल्यामुळे आपली चिडचिड होते. जाता जाता राशी भविष्यावर नजर फिरवावी, तर तिथेही 'आळस झटका, कामाला लागा' अशी सूचना केलेली असते. मन:स्तापात अधिकच भर पडते. अशा वेळी दीर्घ उसासा टाकावा, स्वतःलाच चिअर्स करावं आणि दिवसभराच्या कामाची आखणी करून कामाला सज्ज व्हावं, म्हणजे मंडे ब्लुज चा प्रभाव फार काळ टिकत नाही.

-भैरवी.

Updated : 8 April 2019 5:56 AM GMT
Next Story
Share it
Top