महापौर मुक्ता टिळक झाल्या आमदार
Max Woman | 10 Nov 2019 4:53 PM IST
X
X
पुण्यातील मध्यवर्ती असलेला ‘कसबा मतदारसंघ’हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळताच त्या आमदार होणार हे जवळपास निश्चित होते आणि घडलेही तसेच. या मतदार संघावर दिर्घकाळ आपली आमदार म्हणून आपली पाटी लावणारे गिरीश बापट यांनी लोकसभेचा मार्ग निवडल्याने कसबा मतदारसंघातून भाजपने महापालिकेच्या महापौरपदी काम केलेल्या मुक्ता टिळक यांना विधानसभेसाठी पहिल्यांदा संधी दिली. यासंधीचे सोने करत त्यांनी आमदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या अरविंद शिंदे आणि मनसेचे अजय शिंदे यांचा पराभव केला. तब्बल २८ हजार मतांनी त्या विजयी झाल्या. महापौरपदी उत्तम काम करून मुक्ता टिळक यांनी कसबा मतदारसंघातून आपण विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचे आपल्या कामातून दाखवून दिले होते. भाजपच्या राजकीय वर्तुळात देखील त्यांचीच जोरदार चर्चा चालू होती. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मते ही मुक्ता टिळक यांनाच मिळाली होती.
लोकमान्य टिळकांचा वारसा असणाऱ्या मुक्ता टिळक या जयंतराव टिळक यांचे पुतणे शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. उच्च विद्याविभूषित असणाऱ्या आमदार मुक्ता टिळकयांनी विमलाबाई गरवारे प्रशाला आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून आपले शिक्षण पुर्ण केले. मानसशास्त्र विषयातून त्यांनी एम.ए पुर्ण केले असुन सावित्रीबाई विद्यापीठातून परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण पुर्ण केले आहे. एवढेच नाही तर मार्केटिंग मधून एम.बी.ए ही पुर्ण केले आहे.
महापालिकेपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केलेल्या मुक्ता टिळक या सदाशिव –नारायण पेठ या प्रभागातून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. पुणे महापालिकेच्या भाजपच्या गटनेत्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी साभांळली होती. त्याचबरोबर स्थायी समितीच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. नगसेविका, महापौर ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
मुक्ता टिळक यांनी पाणी प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका तसेच महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे वाखण्ण्याजोगी आहेत. आधुनिकतेची कास धरत पुण्यामध्ये नवनवीन उपक्रम त्यांनी राबविले. स्मार्ट ई बस असो किंवा प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प अशा अनेक कार्यक्रम त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू केले. वाहतुक कोंडीचा पुण्यातील मोठा प्रश्न टाळण्यासाठी पर्यायी पुल बांधून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ड्रेनेज, पाणी, क्रिडा, शहराचे सुशोभिकरण, रस्ते अशा पायाभूत मुलभूत सोयी सुविधांवर भर देत त्यांनी आपली दमदार कामगिरी आजवर दाखविली आहे.
महापौरपदानंतर आमदारपदी विराजमान झालेल्या मुक्ता टिळक आपल्या मतदारसंघात आणखीन कोणत्या नवनवीन योजना राबवतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करतील हे येत्या काळात पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
Updated : 10 Nov 2019 4:53 PM IST
Tags: maharashtra marathi marathi news mayor mayor mukta tilak mukta tilak mukta tilak news mukta tilak pune mukta tilak pune maharashtra mukta tilak pune mayor pune pune mayor mukta tilak
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire