Home > रिपोर्ट > मंगेश पाडगांवकर : कविता जगायला शिकवणारा शब्दगंध

मंगेश पाडगांवकर : कविता जगायला शिकवणारा शब्दगंध

मंगेश पाडगांवकर : कविता जगायला शिकवणारा शब्दगंध
X

दहशतीच्या सर्व या येथे खुणा

भिडत का नाहीत इथली माणसे

कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या या ओळी सद्यस्थितीत ढासळत जाणाऱ्या समाजव्यवस्थेवर या ओळी ताशेरे ओढणाताना दिसतात. समाजाचं प्रतिबिंब दाखवताना विचारप्रवण करणारी पाडगावकरांची कविता

१९४५ मध्ये मर्ढेकरांच्या कवितेने ‘नवकविते’ची आरोळी दिली. ‘नवकाव्य’ही संज्ञा तिच्या वैशिष्ट्यांसह समोर आली. माणसाचं यंत्रवत जगणं, त्यातून आलेली अस्तित्वशून्यता, भयाकूलता, एकटेपणा, जीवनाप्रती अनास्था यातून निर्माण झालेली संभ्रमता हे नवकाव्याने अधोरेखित केलं होतं. माणूसपणाचं विडंबन नवकाव्याने केलं. या पार्श्वभूमीवर १९५० साली ‘धारानृत्य’ हा पाडगावकरांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या कवितेच्या आगमनाने जणूकाही मराठी कविता ‘आनंदयात्रेत’ सहभागी झाली.

निसर्गावर प्रचंड प्रेम करणारा, जीवनाला मिठीत घेऊन जगणं जोजवणारा, कवितेत प्राण ओतणारा नव्हे प्राणाचीच कविता करणारा, तरल, ह्रदयस्पर्शी, अलवार, ‘पिंपळपानावर विश्व’ तारण्याची इच्छा व्यक्त करणारा हा कवी म्हणजे खरंच ‘आनंदयात्री’. पाडगावकरांच्या आरंभीच्या कवितेवर कवी बोरकर, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा संस्कार जाणवत असला तरी ही कविता नंतर मात्र स्वतःचा ‘अंतर्यामी सूर’ आळवते. पाडगावकरांच्या कवितांनी, गाण्यांनी इथल्या मरगळलेल्या मराठी मनाला नवसंजीवनी दिली. ‘या जन्मावर, जगण्यावर शतदा प्रेम करण्याची’ चेतना दिली. पाडगावकरांच्या भावगीतांनी प्रेमभाषेचं नवं रूप तरूण मनाला दिलं. प्रेम, विरह, आतुरता, लडिवाळपणा यातील कोवळ्या छटा तितक्याच उत्कटपणे या भावगीतांतून आविष्कृत झाल्या. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता ही मराठी कवितेचं अतिशय सालस, सोज्ज्वळ, देखणं असं संचित आहे.

‘धारानृत्य’ नंतर ‘जिप्सी’, ‘उत्सव’, ‘शर्मिष्ठा’ प्रकाशित झाले. यांतून नवनवे निसर्गाविष्कार व्यक्त होतात. याकाळात एकीकडे वसंत बापट, विंदा करंदीकर यांच्या कवितेतला सामाजिक प्रहार बदलत असताना पाडगावकरांच्या कवितेने स्वतःच्या शैलीत आपल्या कवितेचा आवाज घुमवला. स्वातंत्र्योत्तर काळातल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक टीका पाडगावकरांची कविता करते.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश

म्हटलं तर डोकं फोडतील

हलकट लाचारांचा देश म्हटलं

तर रस्त्यावर झोडतील

आणि खरीदले जाणाऱ्याचा देश म्हटलं

तर वाटा रोखतील.

केवळ समाजचित्र रेखाटन नाही तर इथे नागवला जाणारा माणूस चिडत नाही, गांगरत नाही, एवढंच काय तर बोलतही नाही. अशा निष्क्रिय मानवी प्रवृत्तीचा समाचार पाडगावकर त्यांच्या कवितेतून घेतात.

लागलेले फास हे यांच्या गळा

पडत का नाहीत इथली माणसे

पाडगावकरांच्या कवितेत एक गीत आहे तर गीतात कविता ! त्यांचं प्रत्येक गाणं काव्यमूल्य घेऊन साकार होतं. पाडगावकरांची भावगीते रसिकमनाला भावनेच्या तरल हिंदोळ्यावर घेऊन झुलत राहतात. प्रेयसीच्या बटांना मुजोर वारा स्पर्श करतो तेव्हा रसिकही गीतातल्या प्रियकरासोबत हरवून जातो. भातुकलीच्या खेळामधली राजा-राणी अगदी आजही कितीतरी वेळ अस्वस्थ करत राहते. गाण्यातल्या राजासोबत रसिकाचाही श्वास राणीच्या गीतांत अडकून राहतो. पाडगावकरांच्या शब्दांत सूर आपसूप मिसळून जातात किंबहुना सुरांनी पाडगावकरांचे शब्द कायमच आपलेसे केले असतील. भावगीतांचा आस्वाद घेताना शब्द-सुरांची एवढी एकरूपता क्वचितच कुठे आढळते.

पाडगावकरांच्या कवितेतला अणखी एक निरागस भाव म्हणजे बालकविता ‘आठवड्यातून रविवार तीनदा येतील का रे’ असं ‘भोलानाथ’ला लाडीगोडीत याआधी तरी मराठी कवितेने कधी विचारलं नाही. हे गाणं आजही बालजगतावर अधिराज्य करून आहे.

‘बोलगाणी’ हे पाडगावकरांच्या कवितेचं खासच जे बोलतो त्याचीच तर ही गाणी-

त्यामुळे कसं जगायचं ते तुम्ही ठरवा,

कण्हत कण्हत की गाणं म्हणत…

पाडगावकर हे सर्वस्वी रसिक-वाचकांवर सोपवतात. पाडगावकरांची बोलगाणी म्हणजे ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असंच म्हणावं लागेल.

पाडगावकरांची कविता म्हणजे आनंद! हा आनंद गाण्यात साठवला. तो रसिकांच्या चेहऱ्यावर आजही तरळताना दिसतो. पाडगावकरांची कविता आजही रसिकांना हवीहवीशी वाटते, कारण ती कुठलाही अभिनिवेश न घेता प्रकटते, पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं तर,

गाण्यात सर्व माझ्या माझे ईमान आहे

ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे

संपूर्ण महाराष्ट्राला कविता ऐकायला नव्हे कविता जगायला शिकवणाऱ्या या शब्दगंधाचा आज जन्मदिवस. ‘सलाम’ पाडगावकर

– वृषाली विनायक

Updated : 10 March 2020 12:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top