Home > पर्सनॅलिटी > माधुरी मिसाळांची विजयाची हॅट्रिक

माधुरी मिसाळांची विजयाची हॅट्रिक

माधुरी मिसाळांची विजयाची हॅट्रिक
X

पर्वतीमधून दहावर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर आमदारपदाची करत माधुरी मिसाळ या तिसऱ्यांदा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा ३६ हजार ७६७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला .पुण्यातील भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते, म्हणूनच निवड प्रक्रिया डावलून प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शहराध्यक्षपद देऊ केले . शहराध्यक्ष या नात्याने सभांचे नियोजन करणे प्रचाराची धुरा सांभाळणे तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागणार आहे यासाठी पुर्णवेळ शहराध्यक्षाची गरज पुणे शहराला आहे. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांना तिकीट मिळणार की नाही असे अनेक कयास बांधले जात होते. असे असले तरी माधुरी मिसाळ याच उमेदवारीसाठी मुख्य दावेदार समजल्या जात होत्या. आपल्या विजयाने त्यांनी हे सिध्द करून दाखवले.

सुरूवातीच्‍या काळात राजकारणापासून अलिप्त राहून आपल्या तीन मुलांच्या संगोपनाकडेच पुर्णत: लक्ष दिलेल्या माधुरी मिसाळ यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. नगरसेवक सतिश मिसाळ यांची पत्नी असलेल्या माधुरी मिसाळ यांनी राजकारणात यायचे असे काही ठरवलेच नव्हते. तसं तर आजोबा जेष्ठ क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांचा वारसा होताच, मात्र पती सतिश यांची हत्या झाल्यानंतर राजकारणापासून दूरच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या कठीण काळात त्यांचा पक्ष मिसाळ कुटूंबामागे भक्कम उभा राहिला. भाजपचे जेष्‍ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मिसाळ कुटूंबियांना केवळ धीरच दिला नाही, तर माधुरी मिसाळ यांना राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी प्रयत्नही केले. २००७ ला महापालिकेचे तिकीट दिल्यानंतर दोनच वर्षात विधानसभेचे तिकीट दिले.

२००७ ला महात्मा फुले मंडई वार्डातून नगरसेविका झाल्यानंतर २००९ ला त्यांना पहिल्यांदा पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत आजवर त्यांनी आपली यशस्वी घोडदौड अखंड चालूच ठेवली आहे. आजवर त्यांनी पक्षाच्या चिटणीसपदाचे तसेच महाराष्ट्र प्रदेशाच्या संयोजिका म्हणून काम पाहिले आहे. सध्या शहराध्यक्षपदाची धुरा सार्थपणे पार पाडीत आहे.

शहरातील नागरीकांना एकाच छताखाली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एक हजार सहाशे कोटी रूपये खर्च करून स्वारगेटला ‘मल्टिमोडल हब ’ उभारण्यासाठी माधुरी मिसाळ सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यामुळे स्वारगेटचा काया पालट होईल असा विश्वास त्यांना आहे.

मेट्रो प्रकल्प, पीएमआरडीएची ची स्थापना, स्मार्ट सिटी, नदीसुधार प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुर्नवसन, आंतररराष्ट्रीय विमानतळ अशी अनेक विकासात्मक कामे करत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तर वाढते प्रदुषण, वाढती गुन्हेगारी, वाहतुक कोंडी, कारखाने बंद पडू लागल्याने वाढणारी बेरोजगारी असे अनेक प्रश्नांचा मागोवा विरोधी पक्ष घेत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ आता कोणत्या विकास कामांना अग्रकम देतात हे येत्या काळात पहावे लागेल.

Updated : 12 Nov 2019 6:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top