भाग्य उजळलं : एका रात्रीत नगरच्या रस्त्याचं रूप बदललं....
Max Woman | 13 Sept 2019 1:32 PM IST
X
X
रात्रीतून रस्त्यांची डागडुजी होते, बंद पडलेले पथदिवे दुरुस्त होतात, रस्त्यांची साफसफाई होते, कचऱ्याचे व्यवस्थापन होतं. आपल्यालाच विश्वास बसत नाही की आपण आपल्याच शहरात आहोत आणि हा विचार डोक्यातून जातो न जातो रस्ता बदलतो आणि मी खऱ्या शहरात पोहोचतो. मग लक्षात येतं की 'हा रस्ता कुण्या साहेबांच्या यात्रेच्या मार्गात आल्यामुळे त्याचं आजच्यापुरत नशीब उजळलं आहे.'
तमाम साहेबांना विनंती आहे की, त्यांनी असंच महिना-पंधरा दिवसातून आमच्या शहरातून वेगवेगळ्या रस्त्यांनी, वेगवेगळ्या दौरे, यात्रा मार्गस्थ कराव्यात. त्या निमित्ताने आमच्या शहरातील कचरा, रस्त्यांची दुरावस्था यांच्याकडे कोणाचं लक्ष तरी जाईल.
कारण, शहरातील राजकीय मंडळी आणि प्रशासन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना येथील सामान्य नागरिकांच्या समस्यांशी संबंध असण्याचं काही कारण येत नाही. त्यांचा संबंध फक्त साहेबांची गाडी या रस्त्याने जाणार आहे. त्या रस्त्याने त्यांची गाडी खड्डयात आदळून त्यांना झटका बसू नये आणि त्याचा आपल्याला झटका बसू नये. रस्त्याच्या बाजूंनी साफसफाई झालेली असायला पाहिजे, साहेबांना कसं प्रसन्न वाटलं पाहिजे. कारण त्यांचा मूड खराब झाला तर त्याचे पडसाद आपल्यावर उमटतील आणि अजून एक महत्वाचं साहेबांच्या निमित्ताने चार-दोन माध्यमांचे प्रतिनिधी पण आलेले असतील तर त्यांच्या कॅमेऱ्यात पण आपलं शहर बरं दिसलंच पाहिजे ना? याच्या पलीकडे तुमचा अजून काय संबंध असायला पाहिजे शहारासोबत ?
अहो कळू द्या ना तुमच्या साहेबांना पण कोणत्या रस्त्यावरील कोणत्या खड्डयाची खोली किती आहे. त्याच्यातून गाडी कशी जाते, गाडीच्या काचा खाली असतील तर कळेल दुर्गंधी काय असते. अंधाऱ्या रस्त्यावरून शोधू द्या की त्यांना पण वाट, ते पण याचं देशाचे नागरिक आहेत ना? मग ही स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी?
मी नगरकर म्हणून राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी आणि जनतेला टाकाऊ समजणाऱ्या राजकीय मंडळी आणि प्रशासनाचा नगरकरांच्या वतीनं निषेध करते.
योगिता सुर्य़वंशी
Updated : 13 Sept 2019 1:32 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire