Home > रिपोर्ट > नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
X

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचले. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाताना त्यांना बोलतं करायचं काम केलं. “मिळून साऱ्याजणी” या मासिकाच्या माध्यमातून स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. असं ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

अतिशय अभ्यासपूर्ण परंतू संयमी विवेचन, महिलांविषयक कायद्यांचा व्यासंगी अभ्यास असलेल्या श्रीमती बाळ या राज्यातील अनेक अत्याचारग्रस्त महिलांच्या आधारस्तंभ बनल्या. मिळून साऱ्याजणी, नारी समता मंच, ग्रोईंग टुगेदर, बोलते व्हा, दोस्ती जिंदाबाद यासारख्या व्यासपीठावरून महिला हक्काचा आवाज अधिक गहिरा आणि संवेदनशीलपणे व्यक्त होत राहिला.

रात्रीच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत म्हणून हातात टॉर्च घेऊन काढलेली त्यांची “प्रकाश फेरी” कायम लक्षात राहिली.

सुशिक्षित, स्वावलंबी आणि आत्मभान जागलेल्या स्त्रियांनी एकत्र येऊन महिलांसाठी काम केलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच विविध क्षेत्रातील महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या. त्यांचा लढा हा पुरुष विरोधी कधीच नव्हता. स्त्री-पुरुष समानतेची वेगळी मांडणी करत असतांना त्यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला.स्त्रियांच्या प्रश्नाबाबत समाज मन जागवण्याचं आणि समाज मन हलवण्याचं काम केलं. आज असे लढवय्ये नेतृत्व आपल्या सर्वांमधून गेले आहे, मी त्यांना‍ विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Updated : 30 Jan 2020 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top