Home > रिपोर्ट > प्रचार संपला... आता मतदानाची तैय्यारी

प्रचार संपला... आता मतदानाची तैय्यारी

प्रचार संपला... आता मतदानाची तैय्यारी
X

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफ आज सांयकाळी थंडावल्या आहेत. महाराष्ट्रात उर्वरित 17 लोकसभा मतदारसंघामध्ये 29 एप्रिलला मतदान होणार आहे.यात मुंबईतील सहा मतदारासंघांचा समावेश असणार आहे. दरम्यान चौथ्या टप्प्यात देशातील 71 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून 9 राज्यांमध्ये मतदान होईल. या मतदानाच्यादिवशी ३२३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

राज्यातील 'या' १७ मतदारसंघांत मतदान

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या १७ मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

अशी होणार लढत

उत्तर मुंबईत गेल्यावेळी विक्रमी मताधिक्क्याने निवडून येणारे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे यावेळी काँग्रेस उमेदवार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे जोरदार आव्हान आहे. त्यांच्या प्रचाराचा रंग पाहता येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहेत. दक्षिण मुंबईची लढतही लक्ष्यवेधी ठरली आहे. येथे काँग्रेसचे मिलींद देवरा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आमनेसामने उभे ठाकले आहेत. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे. उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात 'कांटे की टक्कर' होत आहे तर नाशिकमध्येही समीर भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हेमंत गोडसे (शिवसेना) यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत 29 एप्रिलला बंद होणार असून 23 मे ला कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

Updated : 27 April 2019 2:36 PM GMT
Next Story
Share it
Top