Home > पर्सनॅलिटी > #KingMaker : रुपाली चाकणकर

#KingMaker : रुपाली चाकणकर

#KingMaker : रुपाली चाकणकर
X

एखाद्या यशस्वी पुरूषामागे खंबीरपणे उभी असलेली स्त्री म्हणजे ‘किंगमेकर’. पण प्रत्येकवेळी किंगमेकर ‘ही’ त्या पुरूषाची पत्नीच असेल असं नाही. ती कोणीही असू शकते अगदी आई किंवा मानलेली बहीण सुद्धा. आज आपण अशाच एका रणरागिणी बद्दल जाणून घेणार आहोत, ‘जी’ फक्त एकाच नव्हे तर अनेक यशस्वी पुरूषांमागे निस्वार्थीपणे खंबीर उभी राहिली. ती म्हणजे ‘राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर’. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आणि त्यांचा राजकीय प्रवास.

पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या बबनराव बोराटे (वडील) आणि पार्वती बोराटे (आई) यांच्या घरी ३१ मे १९८२ साली रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. घरी एकत्र कुटूंब पद्धती असल्यानं १२ सख्खे चुलत बहीणभाऊ, ७ काका यांच्या सानिध्यात त्या वाढल्या. लहानपणापासून आपले विचार घरच्यांसमोर मांडण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळाले. रुपाली चाकणकर यांनी शालेय जिवनात खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. ५ वी ते १२ वी पर्यंत शाळेत मॉनीटर असल्याने पुढे नेतृत्व करण्याची कला त्यांच्यात अवगत झाली. BCS नंतर MBA पर्यंत शिक्षण पुर्ण झाल्यानंतर २००० साली निलेश चाकणकर यांच्याशी रूपाली चाकणकर यांचा विवाह झाला.

लग्नानंतर सासरी त्यांच्या सासू म्हणजेच रुक्मिणी चाकणकर या प्रभाग पद्धतीमध्ये निवडून आलेल्या पहिल्या महिला नगरसेविका होत्या. त्यांच्यासह रूपाली चाकणकर यांनी बचतगटांची कामे केली. २००८ मध्ये लोकसभा निवडणूकीच्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी सुळे यांचा प्रचार केला. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी रूपाली चाकणकर यांना प्रोत्साहन दिले आणि तेव्हापासून सुरू झाला रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास.

आता २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, राष्ट्रवादीनं महिला प्रदेशाध्यक्ष पद रूपाली चाकणकर यांना सोपवलं. त्यानंतर पुढे रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली. पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जवळ-जवळ दोन महिने शिवस्वराज्य यात्रेनिमीत्त त्यांनी दौरे केले. या सर्व राजकीय प्रवासात रुपाली चाकणकर यांच्या पतीनं दिलेली साथ आणि त्यांच्या प्रती दाखवलेला विश्वास यामुळे रुपाली चाकणकरांना जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली.

अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारापासून रुपाली चाकणकर यांनी सुरवात केली. या काळात जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचण्याचं ध्येय त्यांच्या समोर होतं आणि ते चाकणकर यांनी प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमसह पुर्ण केले. त्यांनी कंबर कसून पक्षाचा प्रचार केला. एवढ्यावरच त्या शांत बसल्या नाहीत. तर, विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकांना देखील चोख प्रत्युत्तर दिलं. परळी मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात पेटलेल्या राजकारणामुळे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या टीकांना सामोरे जाव लागलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाची ढाल रूपाली चाकणकर यांनी सर्वांना सडेतोड उत्तर देऊन आणि धनंजय मुंडे यांच्यामागे खंबीरपणे उभ्या होत्या आणि त्याच फलित आज राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निकालात उत्तम यश मिळाले.

Updated : 3 Nov 2019 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top