Home > रिपोर्ट > काजुबाई - गावाची आई ते आजी

काजुबाई - गावाची आई ते आजी

काजुबाई - गावाची आई ते आजी
X

सर्च (SEARCH)च्या घरोघरी नवजात बाळसेवा(HBNC) या प्रकल्पात २५ ते ३० वर्षांपासून प्रशिक्षित स्त्री आरोग्यदूत म्हणून कार्य करणाऱ्या काजुबाई उंदिरवाडे या बिनीच्या कार्यकर्त्या. त्यामुळे या प्रकल्पाचे वर्तुळ त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आज वय वर्षे ६५. पण कामाची धडाडी अगदी तारुण्यात. त्यामुळे महिला दिनी त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा मॅक्सवूमनचा विशेष रिपोर्ट...

काजुबाई उंदिरवाडे, वय वर्षे ६५. उंची पाच फुटापेक्षा जरा कमीच. पण बोलणं आणि त्यांची पाठराखण करणारी नजर मात्र तेजतर्रार. म्हातारपण अंगावर हळूहळू पसरत असलं तरी उत्साह मात्र अजूनही तारुण्यातच. बाळाला इंजेक्शन देणारी सर्च या संस्थेची पहिली प्रशिक्षित स्त्री आरोग्यदूत. त्यामुळे काजुबाई शिवाय सर्च च्या एचबीएनसी (घरोघरी नवजात बाळसेवा) प्रकल्पाचे वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही.

काजुबाई या गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणीच्या आरोग्यदूत म्हणून जवळपास २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील विहीरगावच्या. शिक्षण १९६८ मध्ये सातवी पास. १९७१ मध्ये लग्न होऊन त्या आंबेशिवणीला सासरी आल्या. गावात दलित समाज मोठ्या संख्येने. काजुबाई सातवी झालेल्या.(त्या काळी दलित मुलींनी एवढं शिक्षण घेणं ही मोठीच गोष्ट) गावात महिला मंडळ स्थापन करायचे होते. काजुबाई शिकलेल्या आणि बोलणाऱ्या असल्याने मंडळाच्या अध्यक्ष झाल्या. या माध्यमातून महिलांमध्ये शिक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे काम त्यांनी १९८५ ते ८६ या काळात केले. ८७ ते ९० पर्यंत त्यांनी गावातील महिलांचे प्रौढशिक्षणही केले. अनेक बाया वाचायला शिकल्या. सह्या करायला शिकल्या.

याच दरम्यान धानोरा तालुक्यातील चातगाव जवळ सर्च(शोधग्राम) येथे दवाखान्याचे बांधकाम सुरु झाले होते. ते पूर्ण झाल्यानंतर ९४ मध्ये एचबीएनसी(घरोघरी नवजात बाळसेवा) प्रकल्पासाठी सर्च चे कार्यकर्ते गावागावात फिरून शिकलेल्या महिलांची माहिती घेत होते. आंबेशिवणी गावातून सात महिला निवडल्यात आल्या. यातून काजुबाईची निवड झाली. सुरुवातीला त्यांना केवळ सुईणीसोबत बाळंतपणासाठी जाणे आणि पाहणे एवढेच काम देण्यात आले. पण त्यात एक पेच निर्माण झाला. सुईणींना वाटायचं की या आपलं काम शिकून घेतील आणि आपल्या पोटावर पाय बसेल. पण सुईणी काय काम करतात आणि स्त्री आरोग्यदूत केवळ बाळाची काळजी घेणार समजावल्यावर गैरसमज दूर झाला. मिळून मिसळून काम सुरु झालं. सोबतच वर्षभराचे प्रशिक्षणही. बाळाची तपासणी, उपचार, रोगनिदान हे सर्व शिकून झालं तरी अजून त्यांना औषधं मिळालेली नव्हती.

बाळ गुदमरलं तर गाच पीस द्वारे तोंडाने श्वास देणे शिकविण्यात आले होते. याच दरम्यानची घटना. शीतल देवाजी चंद्रगीरे याच दरम्यान बाळंत झाली. पण बाळ गुदमरलं. सुईण म्हणाली, बाळ मृतपिंड आहे. पण काजुबाईने बाळाला तोंडाने श्वास देणं सुरु केलं. ‘मेलेल्या बाळाला तू काय करत आहे’, असे घरचेही काजुबाई यांना म्हणू लागले. पण काजुबाई म्हणाल्या, मला माझे प्रयत्न करू द्या. श्वास देता देता बाळाने हालचाल केली आणि काहीच वेळात ते रडायला लागलं. स्वतःचा श्वास देऊन बाळ जिवंत करण्याची ही काजुबाईची पहिलीच वेळ होती. बाळ जन्मल्याबरोबर ते न रडल्यास ३० सेकंदात श्वास द्यावा लागायचा. त्याच्या अंगावरील चिकटा, रक्त पूर्णपणे पुसलं गेलं नसायचं. म्हणून घाणपणा वाटायचा. पण किळस येत असल्याने उपचार केले नाही असं कधीच झालं नाही. काही काळाने बिल्टा पंप आल्याने या प्रकारातून त्यांची सुटका झाली.

सर्वात जास्त बाळ जन्तुदोषाने दगावायचे. जन्तुदोष कसा ओळखायचा, त्यावर कसा इलाज करायचा हे शिकविण्यात आले होते. त्यासाठी आंब्यावर, वांग्यावर इंजेक्शनचे प्रशिक्षणही देण्यात आले. पण प्रत्यक्ष इलाज अद्याप हाती देण्यात आला नव्हता. त्यामुळे बाळाला जन्तुदोष झाला हे माहिती असूनही आरोग्यदूत इलाज करू शकत नव्हते. इंजेक्शनची जोखीम कशी घ्यायची हा प्रश्न सर्च च्या टीम ला पडला होता. त्यातच या गावंढळ महिला काय इंजेक्शन देतील, उलट मुलांना मारतील असाच गैरसमज होता. तो दूर करण्यासाठी १९९६ मध्ये आरोग्यदूतांना नागपूर येथे मातृ सेवा संघात इंजेक्शनचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठविण्यात आले. त्याच वेळी काजुबाई यांची मुलगी बाळंतपणासाठी घरी आली होती. तिच्या अंगावर सूज होती. पण नवऱ्याने काजुबाईला याही स्थितीत प्रशिक्षणासाठी पाठवलं. ‘आम्ही हिला दवाखान्यात घेऊन जाऊ पण तू प्रशिक्षण पूर्ण कर’, असे ते म्हणाले. त्या प्रशिक्षण पूर्ण करून आल्या. तोपर्यंत डिलेव्हरी झालेली नव्हती. काजुबाई आल्यानंतर काहीच दिवसांत त्यांची मुलगी बाळंत झाली. पण बाळाची तब्येत एकदम खालावली. दूधही ओढत नसल्याने सुस्त पडला होता. बाळाला जन्तुदोष झाल्याचे काजुबाईने ओळखले. पण उपचार माहिती असूनही औषध नसल्याने त्या काहीही करू शकत नव्हत्या. कठाणी नदीवर तेव्हा पूलही नव्हता. बाळाला छातीशी कवटाळत छाती भर पाण्यातून नदी पार करत त्या सर्चमध्ये पोहोचल्या. डॉ. अभय बंग काजुबाईला म्हणाले, ‘तुला जन्तुदोषावरील उपचार शिकविला आहे. तुझाच नातू आहे. तू आमच्यादेखत इंजेक्शन लावून पाहा’. हे धाडस करणं काजुबाईसाठी सोप नव्हतं. त्यांच्याही मनात त्या वेळी अनेक आंदोलन उभी राहिली. त्या निकराने तयार झाल्या. दवाखान्याचा सर्व स्टाफ गोळा झाला होता. डॉ. राणी बंग, डॉ. बैतुले हेदेखील उपस्थित होते. हात धुणे, इंजेक्शन मध्ये औषध भरणे, अशा २१ पायऱ्या पार करून सर्वांसमक्ष काजुबाई यांनी नातवाला जंतूदोषाचे इंजेक्शन दिले. काजुबाईची सहजता पाहून डॉ. बंग म्हणाले, ‘काजुबाई आता तुम्ही बाळाला बिनधास्त इंजेक्शन लावू शकता. काही इन्फेक्शन झालंच तर आम्ही त्याची जबाबदारी घेतो.’ सायंकाळी नातवाचा तापही उतरला. दुसऱ्या दिवशी नातू आणि इंजेक्शनचा साठा घेऊनच त्या घरी आल्या. त्यानंतरची १३ इंजेक्शन त्यांनी घरीच दिली. कसलंही इन्फेक्शन झालं नाही. गावांमध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. तो पर्यंत बाळाला के विटामिन हे इंजेक्शनही लावले जात नव्हते. पण मग डॉ. बैतुले यांच्या समोर प्रत्येक आरोग्यदूताने के विटामिनचे औषध लावले. सर्च च्या आरोयदूत चांगल्या प्रकारे इंजेक्शन देतात ही गोष्ट सर्वत्र पसरली. पण त्याची मुहूर्तमेढ रोवली ती काजुबाईने. ती देखील आपल्या नातवाला इंजेक्शन देऊन. कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतः पासून करा या गांधीजींच्या वचना प्रमाणेच ही गोष्ट घडली...

आरोग्यदूत म्हणून काम करताना काजुबाई यांना अनेक चांगल्या-वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. आपण जीव तोडून काम करून बाळाला वाचवित असताना शासकीय औदासिन्यही त्यांनी अनुभवले. अशा अनेक प्रसंगाची मालिकाच त्या सांगतात. गावातील प्रेमिला ब्राह्मणवाडे या महिलेला जुळी मुले झाली. प्रेमिला या सुखवस्तू कुटुंबातील. त्यामुळे गडचिरोली येथे जाऊन नियमित सोनोग्राफी देखील त्यांनी केली. तरीही त्यांना जुळी मुले आहेत हे एकदाही सांगण्यात आले नाही. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात त्या बाळंत झाल्यावर हे लक्षात आलं. शासकीय औदासिन्य काय असतं याचं हे उदाहरण. वरून बाळाचे वजन अडीच किलो पेक्षा कमी. बाळ धोक्याचे असतानाच त्यांना सुटी देण्यात आली. सहाव्याच दिवशी यातील एका बाळाला जन्तुदोष झाला. आपलं बाळ मरणार या विचारानेच प्रेमिला खूप रडायची. ‘तुझ्या दोन्ही बाळाला काहीही होणार नाही’ असे म्हणत काजुबाईने बाळाचा ताबा घेतला. खूप काळजी घेतली. घर एक किलोमीटर दूर. तरीही दररोज दोन ते तीन भेटी त्या द्यायच्या... आज दोघेही पाच वर्षांचे झाले. आजी आजी करत काजुबाईला हाका मारीत असतात.

भारती बाजीराव भोयर ही काजुबाईच्या माहेरची. त्यामुळे जिव्हाळा जास्त. पहिला मुलगा झाला. पण नंतर दर बाळंतपणाला ती माहेरी गेली की बाळ दगावायचं. दोनदा असंच झालं. काजुबाई च्या हे लक्षात आलं. तेथे बाळावर इलाज होत नव्हता. आठ वर्षांनी २०१७ मध्ये ती पुन्हा गरोदर होती. आपलं हे बाळही दगावणारच असं ती म्हणायची. पण काजुबाई म्हणाल्या, ‘तुझं बाळ वाचवण्याची जबाबदारी माझी. हे बाळ वाचणारच. पण तू आंबेटोल्यातच सासरी राहा’. सासरच्यांनाही काजुबाई ने समजावलं आणि घरचे तयार झाले. भारती बाळंत झाली. मुलगी झाली. वजनही चांगलं होतं. पण दररोज ते कमी होत चाललं होतं. दोन वेळा आठ आठ दिवस गडचिरोली येथील रुग्णालयात ठेवलं. पण काहीच फरक पडला नाही. रुग्णालयात उपचार सुरु असल्याने काजुबाई काहीच करू शकत नव्हत्या. तीन किलोची मुलगी दीड किलोवर आली. आई ला दुध होतं पण ती ओढून पीत नसल्याने हा प्रकार होत असल्याचे दुसऱ्यांदा घरी आणल्यावर काजुबाई ने ओळखलं. तिला अंगावरचं दुध वाटीत काढून पाजायला लावलं. फरक जाणवायला लागला. वजन वाढलं. ‘आता पोरगी वाचली तुझी’ असं काजुबाई म्हणायच्या. भारती देखील आनंदात होती. पण दोन महिन्यांनी बाळाला निमोनिया झाला. त्या वेळी काजुबाई शेतात गेल्या होत्या. त्यांना निरोप मिळाला पण यायला वेळ लागणार होता. त्यामुळे गावातील नर्स कडे नेण्याचा सल्ला काजुबाई ने दिला. पण काजुबाई नाही आता बाळ मरणार असंच भारती बडबडायला लागली. काजुबाई देखील अस्वस्थ झाल्या होत्या. कारण तुझं मुल मी वाचविणारच, असं वचन त्यांनी आपल्या गावाच्या लेकी ला दिलं होतं. धावत पळत त्या मुली ला तपासायला पोहोचल्या. उपचार केला. एकाच दिवसात आराम पडला.

रात्री अपरात्री सायकल वर बाळंतपणासाठी जाणे, बाळाला खूपच धोका असल्यावर सर्च मध्ये जाऊन गाडी आणणे हा प्रकार तर नित्याचाच. त्या वेळी आंबेटोला या गावी कांता तुलावी ही आरोग्यदूत कार्यरत होती. येथे गीता रोहणकर ही बाळंत झाली. मुलगी झाली. सुईणीने नाळेवर कापड बांधल्याने मुलगा झटके देत होता. पण तू इंजेक्शन दिल्याने बाळ असं करीत असल्याचा आरोप सुईण करीत होती. कांता ने लगेच काजुबाई ला बोलावलं. काजुबाई ने बाळाला पाहिलं. त्यांना शिकविलेल्या लक्षणांपैकी ही लक्षणं नव्हती. आपण डॉक्टर नाही हे काजुबाई जाणून होत्या. रात्रीची वेळ होती. बाहेर किर्र अंधार आणि भयाण वादळ. याही स्थितीत त्या घरच्या माणसाबरोबर सायकलने सर्च मध्ये गाडी मागण्यासाठी गेल्या. वाटेत हवेचा जोर वाढून सायकल नदीत कोसळली. पण थोडक्यात दोघेही बचावले. तरीही मोडकी सायकल घेत धावत पळत काजुबाई सर्च मध्ये पोहोचल्या, गाडी घेऊन आल्या आणि बाळाला शासकीय रुग्णालयात हलविलं. तेथे गेल्यावर सुईणीच्या कापड बांधण्याच्या पराक्रमामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

शासकीय रुग्णालय गरिबांसाठी आहे का ? हा प्रश्न काजुबाईला नेहमी पडतो. रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस खूप हयगय करतात. कित्येकदा तर बाळंतीणीला इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून जातात आणि डॉक्टर गेले की नर्स निश्चिंत होतात. त्यामुळे बाई बाळंत होऊन जाते तरी देखील त्यांना पत्ता नसतो. काजुबाई आहे म्हणून आमची ठाकूरकी, असं गावकरी म्हणत असतात.

देशविदेशातली कितीतरी माणसं त्यांना भेटून गेली आहेत. चार विजिट बुक आतापर्यंत भरल्याचे त्या अभिमानाने सांगतात. आज गुगलवरही काजुबाई उंदिरवाडे नाव टाकताच त्यांच्यावरील इंग्रजी लेखांची मालिका सापडते. डॉ. राणी बंग यांनी आईसारखा जिव्हाळा लावून सर्व उपचार शिकविले म्हणून आज हे काम करू शकलो असं त्या गर्वाने म्हणतात. गावात डॉ. अभय बंग यांच्यासोबत बसायला मिळालं. स्टेजवर भाषण दिलं. स्वतःचा अभिमान वाटावा असे कितीतरी प्रसंग घडले. एकदा ग्रा. पं. सदस्य म्हणूनही त्या निवडून आल्या. पण आपल्या कामाकडे दुर्लक्ष नको म्हणून नंतर त्यांनी उभं राहणं नाकारलं.

२५ ते ३० वर्षांत गावातील शेकडो बाळांचेप्राण काजुबाईने वाचविले आहेत. त्यातील अनेक मुलींची आज लग्न होऊन त्यांच्या मुलांची काळजीही काजुबाईने घेतली आहे. एवढेच नाही तर अनेक आरोग्यदुतांनाही त्यांनी प्रशिक्षित केले आहे. गावाची आई असलेल्या काजुबाई आता गावाच्या आजी झालेल्या आहेत. घरावर असलेली आरोग्यदुताची पाटी आजही दिमाखात उभी आहे.

-पराग मगर

Updated : 8 March 2019 11:41 AM IST
Next Story
Share it
Top