Home > रिपोर्ट > गुजगोष्टी

गुजगोष्टी

गुजगोष्टी
X

हुश्श! आता कुठे पाठ टेकवली तर बरं वाटतंय! सकाळपासून...नव्हे गेल्या कित्येक दिवसांपासून नुसती धावपळ सुरू होती. कसली? अहो, आजच्या शोभयात्रेची! लेझीम सराव, रांगोळी सराव, नऊवारी सराव, आमंत्रण, मिटिंग काही विचारू नका. भिंगरी लागली होती नुसती पायाला. पण सगळे श्रम सार्थकी लागल्यासारखे वाटतातेत आता. ग्रुपवर सगळे फोटो बघताना अजूनही शोभायात्रेतून चालतेय की काय, असाच फील येतोय.

पण धमाल येते खरंच! सगळी आवरासावर करताना धांदल उडते खरी, पण अशाच उत्सव प्रसंगी अंगात सुपर वुमन सिंड्रोम संचारलेला असतो. सगळी कामं पथ्यावर पाडायला तोच ऊर्जा देतो.

रात्रीच सगळी गुढीची तयारी करून ठेवली होती. श्रीखंड विकतच आणलेलं. घरी आल्यावर पुऱ्या, वरण-भात-भाजी केली की तासाभरात स्वयंपाक तय्यार! अर्थात त्याचीही पूर्वतयारी करून ठेवली होती. रात्री जागरणच झालं होतं म्हणा, त्यामुळे पहाटे लवकर उठले असं म्हणायची संधीच मिळाली नाही. पटापट आवरलं, झकास मेक-अप केला, चापून-चुपुन नऊवारी नेसली, स्वतःला आरशात न्याहाळलं आणि सगळे साखर झोपेत असतांना स्कुटीला किक मारून बाईक रॅलीत सहभागी झाले. खचाखच सेल्फी, मग ढोल-ताशे-लेझीम असा पदन्यास करून, कंठ शोष होईपर्यँत 'जय भवानी-जय शिवाजी' च्या घोषणा देऊन घरी परतले.

पाऊलं थोडी जडच झालेली. पण अजून गुढी उभारायची, स्वयंपाक करायचा, मग पाठ टेकायची, हे गणित डोक्यात फिट्ट बसल्यामुळे थोडं फ्रेश होऊन, हलकासा टच-अप करत नवऱ्यासोबत गुढी उभारली. तिच्या बरोबरही पारिवारिक सेल्फी काढला नि कपडे बदलून स्वयंपाक घरात घुसले. अहो आश्चर्यम...स्वयंपाक तय्यार...! नवरोबाने जेवण आयतं मागवून माझे श्रम वाचवले होते. म्हणून तर आता जेवून खाऊन तुमच्याशी शेअर करू शकले, आजचा नव वर्षाचा पहिला दिवस!

इथून पुढे रोजच आपली भेट होत राहील. कधी गुजगोष्टी, कधी गॉसिप. बायकांना का चर्चेला विषय लागतोय. आता पुरती रजा घेते. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रोज भेटूच. टाटा.

- भैरवी.

Updated : 6 April 2019 9:35 AM GMT
Next Story
Share it
Top