Home > रिपोर्ट > मी बांगड्या भरल्या ..!

मी बांगड्या भरल्या ..!

मी बांगड्या भरल्या ..!
X

(कमाल आहे आपली मर्दुमकी किंवा दुसऱ्याची कमजोरी दाखविण्यासाठी आम्हाला आजही महिलाचं आभूषण असलेल्या बांगडीचचं उदाहरण द्यावं लागतं असेल तर पुरुष म्हणून आमच्याकडे काहीच नाहीय का...?)

-आज जागतिक महिला दिन, महिलांचे गोडवे गावे लागणारा दिवस, गावे लागणारा यासाठी म्हणालो की आमची पुरुषी मानसिकता अजूनही बदलली नाहीय, ती आपल्या खांद्याला खांदा लावून काम करते किंवा आपल्या एक पाऊल पुढे जाते हे मनापासून मेंदूपर्यंत आम्ही स्वीकारलंच नाहीय त्यामुळे आजच्या दिवशी पुरुषांकडून दाखवलं जाणार प्रेम बेगडीच आहे, एकीकडे तिचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे बांगडी सारख्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उल्लेख करत ती अबला असल्याचं स्थान अबाधीत ठेवायचं हा आमचा उद्योग अजूनही सुरूच आहे

स्त्रियांसाठी बांगडी जसे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तसचं बांगड्या त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असल्याचेही अनेक संदर्भ आहेत, आई मॉलिश करतांना बाळाच्या कानावर पडणारा पहिला ध्वनी बांगड्यांचाच असतो, आपल्या किणकिणाटाने मनात अनेक भाव निर्माण करणाऱ्या आणि घट्ट मिठीचा गोड घात करत पाठीवर रक्ताने माखणाऱ्या ह्या बांगड्या उगाचचं स्मशानातल्या दगडावर फोडल्या जातात. अशा ह्या बांगड्या महिलांच्या मनगटावर कधी म्हणजे कोणत्या युगात चढल्या हे सांगता येणार पण बायकांच्या मनाचं प्रतीक असलेल्या नाजूक म्हणविणाऱ्या या आभूषणाने बायकांचा मनगट कधीच कमजोर होऊ दिलं नाही..

तिने बांगड्या घालूनच राक्षसांचा वध केला, बांगड्या घालूनच ती युद्ध भूमीवर उतरली, सडा, सारवण ,दळण ,धूण आणि बांगड्या घालूनच स्वयंपाक करत राहिली, कधीतरी एखादी बांगडी टिचली तर ती काढून दुसरी घालत तिने हे आभूषण जपलं ,पुढे फुटलेली किंवा टिचलेली बांगडी जशी जोडता येत नाही तशी बायकांची इज्जत असते म्हणून लोकं बांगडी आणि इज्जतची सांगड घालू लागले तेही मान्य करत ति बांगडी घालत राहिली .

काळ बदलला आणि महिलांच्या कामाच्या पध्द्ती बदलल्या, महिला डॉक्टरांना ऑपरेशन करतांना, महिला पोलिसांना सराव करतांना, वकील महिलांना न्यायाची बाजू लढतांना आपल्या बांगड्याच्या आवाजाने लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपल्या बांगड्या काढल्या पण कायमच्या नाही लग्न समारंभात त्याही महिला बांगड्या घालतातच

पण यापुढची पिढी बांगड्या घालेल असं वाटत नाही कारण बांगडी म्हणजे कमजोरी अस समीकरण मांडणा-यांची गर्दी जास्त झालीय. बांगडी घातलेले मनगट दिसलं की ते नाजूक समजून मुरगाळन्यासाठी सरसावणारे हातही वाढले आणि त्यांनीच नाजूक बांगडीला डायलॉग आणि शिवीपुरते मर्यादित केलं.त्यामुळे कधी काळी सोंदर्याच प्रतीक असलेली बांगडी आज जर अशी शिवी बनली असेल तर अशा शिव्यांचा साज कोण करणार न ..?

पण तिने तिचा साज सोडू नये ,बांगडयासह शृंगार करणं तिचाच अधिकार आहे , ह्या दागिन्यांमुळे तीच्या अस्तित्वाच वर्तुळ पूर्ण होतं आणि ते कायम पूर्ण असायला हवं म्हणून तिच्या मनाच्या बांगडीला जो पुरुषी अहंकार कायम तडा देत राहिला त्या अहंकाराचा चुरा करण्यासाठी आणि तिच्याकडे दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशीच काही काळ का होईना मी बांगड्या घातल्या ...!!!

या निमित्तानेच बांगड्या भरण्यावरुन काही राजकीय वक्तव्य..

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे- (20 aug 2012)

अरुप पटनायक हे बांगड्या भरलेलं पोलीस आयुक्त

-राज ठाकरे- (23 aug 2013 )

कायदा सुव्यवस्था बिघडली आर आर पाटलांना बांगड्या पाठवा

उद्धव ठाकरे-(19 sep 2016)

हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नाही भिमाची गदा आहे पाकिस्तानला दाखवा

संजय राऊत-(22 मे 2017 )

बेळगाव प्रश्नी इतर पक्षांनी काय बांगड्या भरल्या का

छ. उदयन राजे -(14 मे 2018)

लोकसभेची उमेदवारी दिली नाही तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाही

शरद पवार-(17 oct 2019 )

मंत्री असून काम करता आलं नाही म्हणता, हातात बांगड्या भरा-

अजित पवार-(14 oct 19)

आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, कर्जत सभा

शिवाजीराव आढळराव-(2 मार्च 19 )

विमानतळ मी नेलं तुम्ही काय बांगड्या भरल्या होत्या का?

नवज्योत सिंग सिद्धू -(मे 2019)

मोदी नव्या नवरी सारखे काम कमी आणि बांगड्या जास्त वाजवतात

देवेंद्र फडणवीस -(25 feb 2020 )

शिवसेनेने बांगड्या भरल्या का?

-गोविंद वाकडे

Updated : 8 March 2020 4:40 PM GMT
Next Story
Share it
Top