कॅन्सरच्या संघर्षाची तिची प्रेरक कहाणी…
X
जिवघेण्या कॅन्सरचे निदान वेळीच होणे गरजेचं असल्यानं त्याविषयी व्यापक जनजागृती होणं अतिशय आवश्यक असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. कॅन्सरवर मात केलेल्या अलका भुजबळ यांच्या जीवनावर आधारित “कॉमा” माहितीपटाचे प्रकाशन राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, त्वरित निदान व उपचार झाल्यास काही बाबतीत कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येवू शकते. अलका भुजबळ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या ‘कॉमा’ या पुस्तकातून तसेच माहितीपटातून लोक प्रेरणा घेतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
कॉमा पुस्तक पाहून कोश्यारी म्हणाले, या पुस्तकामध्ये अलकाने स्वत:च्या संघर्षाची प्रेरक कहाणी मांडल्याने या पुस्तकाचा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अलका भुजबळ म्हणाल्या, कॅन्सरवर मात करताना, मला कुटुंबाचा खुप मोठा आधार मिळाला. माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी मला प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. आपण डॉक्टर रेखा डावर यांच्याकडून उपचार घेताना, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला.
कॅन्सरला घाबरु नका, तर त्यावर मात करा, असे आवाहनही भुजबळ यांनी यावेळी केले.
स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून डॉ. रेखा डावर यांनी चाळीशीनंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी ठराविक तपासण्या करुन घेण्याचे महत्व विशद केले.
माहितीपट पाहिल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे म्हणाले, अलका भुजबळ यांनी कॅन्सरवर जी मात केली, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. त्या स्वत: एक आदर्श आहेत. त्यांनी या माहितीपटामध्ये स्वत:च्या संघर्षाची मांडलेली कहाणी अत्यंत प्रभावी आहे. त्यांचा लढा केवळ कॅन्सरग्रस्त यांच्या साठीच नाही तर जनतेसाठी देखील प्रेरणादायी आहे.
कॅन्सर विषयी समाजात आजही असलेला भितीचा दृष्टीकोन बदलुन त्यावर मात करता येऊ शकते असे उदाहरण असलेल्या स्वत: भुजबळ आपल्यासमोर आहेत. कॅन्सरशी कशाप्रकारे सामना केला जातो, हे ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असल्याचेही पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन देवेंद्र भुजबळ यांनी तर आभार अलका भुजबळ यांनी मानले. प्रारंभी डॉ.गुस्ताद डावर यांनी राज्यपालांना शाल, पुष्पगुच्छ देऊन तर डॉ. रेखा डावर यांनी स्मृतीचिन्ह देऊन गौरविले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायन्स फौंडेशनचे वैद्यकीय सल्लागार डॉ. गुस्ताद डावर, जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेखा डावर, कॅन्सर वर मात करून इतरांना जगण्याची उमेद देणाऱ्या, कॉमा पुस्तकाच्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ, कॉमा माहितीपटाचे निर्देशक आशिष निनगुरकर उपस्थित होते.