हिंगणघाट आरोपीला शिक्षा देण्यासाठी राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
X
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना तातडीनं शिक्षा मिळावी यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केलाय. महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासाठी लवकरच स्वत:गृहमंत्री आणि राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आंध्रप्रदेशचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
हिंगणघाटमध्ये दोन दिवसांपूर्वी प्राध्यापक असलेल्या एका तरुणीला भररस्त्यात एका तरुणानं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर औरंगाबादमध्ये एका ५० वर्षांच्या महिलेला एका पुरूषानं घरात घुसून रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्यानं राज्यात सध्या खळबळ उडालीये. या दोन्ही प्रकरणानंतर राज्य सरकारनं तातडीनं काही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: हिंगणघाट येथे जाऊन जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या पालकांची भेट घेतली आहे. यावेळी नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी देखील त्यांच्या सोबत होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी डॉक्टर केसवानी यांच्यासोबत रुग्णालयात जाऊन तरुणीच्या डॉक्टरशी चर्चा केली.
साधारण पाऊण तास अनिल देशमुख आणि डॉ. केसवानी या रुग्णालयात होते. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे. सध्या तरुणीवर योग्य उपचार सुरु असून तरुणीला कुठंही हलवण्याची गरज नसल्याची माहिती डॉ. केसवाणी यांनी माध्यमांना दिली आहे.