चला रणरागिनींनो... शौर्य दाखवा आणि लष्करात सामील व्हा
X
1992 पासून भारतीय सैन्यदलात महिलांची फक्त अधिकारी पदावरच भरती करण्यात येत होती. मात्र आता महिलांची भारतीय सैन्यात जवानांच्या समकक्ष पदावर 100 जागांवर भर्ती होणार आहे. यासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रियाही सुरु झाली आहे. यामुळे भारतीय सैन्यदलात रणरागिनी आपले शौर्य दाखवू शकणार आहेत. तसेच देशसेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.
जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. यानुसार ही भरती आयोजित करण्यात आली असून आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. महिलांसाठी वेगळी बटालियन असण्याची शक्यता आहे. महिला लष्करी पोलीस असे या पदाचे नाव आहे.
सैन्यात भरतीसाठी या अटी लागू
भरतीसाठी अटीं आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांचे शिक्षण कमीतकमी 10 वी पास, वय 17 ते 21, उंची 142 सेमी असायला हवी. तसेच महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत, विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशा महिलाच अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्रच लिहून द्यावे लागणार आहेत.