Home > रिपोर्ट > पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????

पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????

पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????
X

27 ला शुक्रवारी ग्रहण आहे, चंद्रग्रहण ग्रहण म्हंटलं की माझ्या तर पोटात खूप मोठा गोळा येतो, कारण त्या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि माझ्या मुली 'शिक्षित'होताहेत या समजावरही सावली पडते गेल्या वर्षी पाटण मधली एक बातमी वाचली आणि हादरून गेले. एक आठ महिन्याची गर्भवती,ग्रहण आहे म्हणून 20 एक तास एकाच जागी ,हातपाय न हलवता, काहीही न खाता पिता बसून राहिली,खूप खूप तहान लागली,घरी खूप विनवण्या केल्या ,माहेरून आईला बोलावून घेऊन पाणी देण्यासाठी विनंती केली पण गर्भाला काही प्रॉब्लेम उद्भवू शकतो म्हणून कुणीही तिला घोटभरही पाणी दिलं नाही, तडपडून तडपडून ,टाचा घासून घासून मरून गेली बिचारी शेवटी...

खूप रडले हो ही बातमी वाचून,आधी तिच्याभोवतालच्या मूर्ख बायकांचा खूप खूप राग आला,परत काही वेळानं त्यांची कीव आली आणि त्यानंतर काही वेळाने आपल्या समाजात ज्या प्रकारे रूढी रेटल्या जातात त्याचा विचार करून,आपण तरी 'कुठे कुठे' पुरे पडणार अश्या प्रकारचं औदासिन्य आलं.

Msc, BE, वगैरे असलं कॉलिफिकेशन असणाऱ्या मुली जेंव्हा विचारतात...

मॅडम, शुक्रवारी ग्रहण आहे,काय काय काळजी घ्यायची ?

तेंव्हा वाटतं अरे या भूगोल न शिकताच उच्चशिक्षित झाल्या की काय?

की आपली घोकंपट्टीवाली शिक्षणपद्धती त्यांना कुठे तर्क लावायला शिकवतंच नाही?

ग्रहण म्हणजे पृथ्वीचीं चंद्रावर पडणारी सावली,त्याच्यामुळे आपल्या पोटातील गर्भाला कसा काय प्रॉब्लेम होईल विचार करायची तसदी सुध्धा घ्यायची नाही, आम्ही डॉक्टर्स सांगतो की ग्रहण पाळण्याची वगैरे काही गरज नाही,बाळामधील व्यंगाचा आणि ग्रहणाचा दुरून दुरून सुदधा संबंध नाही तरी ,तरीही विषाची परीक्षा नको म्हणून ,घरातील पन्नाशी साठीतील ज्येष्ठ स्त्रिया दुखावल्या जातील ,आकांड तांडव करतील म्हणून या बिचाऱ्या गर्भवती ते पाळतात.

ग्रहण पाळतात म्हणजे काय तर ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत खुर्चीवरती बसून राहायचं, हातपाय हलवायची नाहीत ,मांडी घालून बसायचं नाही,काहीही खायचं प्यायचं नाही, काही चिरायचं नाही ,बोलायचं सुध्धा नाही म्हणे नाहीतर काय होईल हे यांचे तर्क ऐकून चाटच पडते मी तर, त्यांच्यामते हे असं ग्रहण नाही पाळल्यास ,बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, म्हणजे गर्भवतीने त्या काळात भाजी चिरली तर बाळाचा ओठ आतल्याआत चिरला जाणार ,तिने मांडी घातली तर बाळाचे पाय वाकडे होणार,तिने काही खाल्लं पिलं तर बाळाच्या नरड्याला छिद्र पडणार(हा ,हा,हा..)

किती किती हास्यास्पद आहे हे,या अश्या समजुती 30 एक वर्षांपूर्वी एकवेळ मानुनही घेतल्या असत्या, पण आता गर्भवती माता साक्षर असतात,त्यांना बेसिक science तर माहिती असतंच की,त्या कशा काय अश्या खुळचट तर्कांबाबतीत प्रश्न विचारत नाहीत याचं आश्चर्य वाटतं. अरे पोरीनो,गर्भामध्ये व्यंग होणे याची कारणे वेगळी आहेत,

म्हणजे फॉलीक असिडच्या कमतरतेने बाळाला मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग होते,अनुवंशिकतेने,गुणसूत्रांच्या दोषाने, काही व्यंग होतात, आपल्याकडे नात्यात ,समाजात लग्न होत असल्याने जोडप्याची खराब गुणसूत्र एकत्र येऊन त्यामुळे गर्भामध्ये व्यंग तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे,काही औषधे चुकून गर्भावस्थेत घेतल्याने,गर्भावस्थेतील uncontrolled मधुमेहामुळे अशी अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालेली कारणे आहेत.

पण ते आपण डॉक्टरांकडून कशाला समजून घ्यायचं हो? आपण आपलं आपल्या आजूबाजूच्या अडाणी बायका काय म्हणतात त्यावरच डोळे झाकून विश्वास ठेवायचा,होय ना?या त्याच बायका असतात ज्या गर्भावस्थेत झोपलं की बाळाचं डोकं मोठं होतं, डिलिव्हरी झाल्यावर जास्त पाणी प्यायचं नाही नाहीतर पोट सुटतं, कॉपर टी ने अंगाची झीज होते,पिशवी कुजते असले धादांत खोटे समज मुलींवर लादतात...जाऊ दे तो तर एक स्वतंत्रच लेखाचा विषय होईल.

या सर्व ग्रहण पाळण्याच्या ड्राम्यामुळं त्या गर्भवतीचे रक्ताभिसरण मंदावते,त्यामुळे रक्तामध्ये गुठळी होऊन ती फुफ्फुसात जाऊन अडकण्याची शक्यता वाढते,हातापायांवर सूज चढते बी पी वाढतो,रक्तातील साखर कमी होऊन तिला व तिच्या बाळाला जीवाला धोका उदभवतो,हे सगळं आम्ही डॉक्टर कानी कपाळी ओरडून सांगत असताना देखील या बायका काही आपला हेका सोडत नाहीत..हेतू प्रेमापोटीची काळजी हा असेलही कदाचित त्यांचा ,पण त्याला बळी नको पडायला.

कमीत कमी सुशिक्षित स्त्रियांनी तरी जरा तर्क वापरून आपापल्या आई, मावशी ,सासू ,आजेसासू ,शेजारीणी याना हे ग्रहण पाळण्याच्या अघोरी पद्धतींमधला फोलपणा आणि धोके स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजेत आणि तरीही त्या असे काही करायला भाग पाडत असतील तर थोडं बंड करायला हवं,

हो ना? मग काय ,तरीही पाळणार ग्रहण ?

डॉ. साधना पवार

Updated : 9 July 2019 1:35 PM GMT
Next Story
Share it
Top