गांधी, गोडसे आणि निधी चौधरी
X
What an exceptional celebration of 150th Birth Anniversary is going on High time, we remove his face from our currency, his statues from across the world, rename institutions/roads named after him! That would be a real tribute from all of us !
ThankU #Godse for 30.01.1948
याचा मराठी आशय असा आहे.
१५० व्या जयंतीचा सोहळा साजरा करण्याची किती अनोखी ही पद्धत!
आता आमच्या नोटांवरचा त्यांचा तो फोटो काढून टाकावा. जगभरचे त्यांचे पुतळे उखडून टाकावेत. नावे बदलून टाकावीत सगळी त्यांच्या नावाच्या रस्त्यांची आणि संस्थांची. काळ तर असाच आलाय.तीच त्यांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल.
छान केलंस बाबा नथुरामा जानेवारी 1948 च्या त्या तीस तारखेला.आभारच मानायला हवेत तुझे!
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निधी चौधरी यांनी १७ मे रोजी केलेलं हे ट्विट आहे. त्यावरून सोशल मीडियावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्य प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या या ट्विटवरून बातम्या बनवल्या आहेत आणि निधी चौधरी यांना गांधीप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
खरंतर गेल्या काही आठवड्यांमध्ये देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या गांधी-गोडसे प्रकरणावरची उद्वेगाने व्यक्त केलेली ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर असेल किंवा तशाच आणखी काही लोकांनी गेल्या काही दिवसांमध्ये नथुराम गोडसेचे गौरवीकरण केले. त्या पार्श्वभूमीवर एका संवेदनशील मनाने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया आहे. नीट बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की एका सच्चा गांधीप्रेमी व्यक्तिच्या या भावना आहेत. परंतु अलीकडच्या काळात आपण उपरोध, उपहास समजून घेण्याच्या पलीकडं गेलो आहोत त्यामुळं तातडीनं निधी चौधरी यांना गोडसेवादी ठरवून मोकळे झालो.
या ट्विटवरून सोशल मीडियावर सध्या जो गदारोळ सुरू आहे तो आजच्या एकूण पर्यावरणाला साजेसा असाच आहे. कारण कोणत्याही बाबीच्या मूळ आशयापर्यंत न जाता केवळ वरवरच्या आकलनावरून प्रतिक्रिया देण्याचा हा काळ आहे. याच काळात सामान्य माणसांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. भयंकर मनस्तापाचे, उद्वेगाचे प्रसंग आले. हे सगळे प्रसंग माणसांनी सोशल मीडियावरील त्यासंदर्भातील विनोद, व्यंगचित्रे वाचून फॉरवर्ड करून साजरे केले. तरीसुद्धा एक मोठा वर्ग असा आहे की त्याला विनोदाचे वावडे आहे. (टवाळा आवडे विनौद, असे रामदासांनी म्हणूनच ठेवले आहे.) परंतु शहाण्या सुरत्या मानल्या जाणा-या किंवा स्वतःला तसे समजणा-या लोकांनीही याच प्रवाहात सामील होण्याचे ठरवलेले दिसते. निधी चौधरी यांच्या ट्विटवरून सुरू असलेला गोंधळ त्याचाच भाग आहे.
या ट्विटचा आशय समजून न घेता टीका सुरू केल्यामुळे निधी चौधरी यांनी ते डिलीट करून टाकले आहे. त्यासंदर्भात स्पष्टीकरणही केले आहे, तरीसुद्धा गदारोळ थांबायला तयार नाही.
त्यामुळं त्यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट टाकून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण गांधीविचारांचा किती आणि कसा आदर करतो, हे त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केले आहे.
( https://m.facebook.com/story.php?story_fbid=2222995611101551&id=100001734021435 )
त्याहीपलीकडे जाऊन निधी चौधरी यांची सोशल मीडिया अकाऊंट्स नीट पाहिली तर त्यांच्या सच्च्या गांधीप्रेमाची साक्ष पटल्यावाचून राहात नाही. जागतिक पुस्तक दिनी त्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांची जी यादी दिली आहे, त्यातही महात्मा गांधींच्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचा समावेश आहे. खूप बारीक सारीक गोष्टींचे तपशील त्यांनी या पोस्टमध्ये दिले आहेत. काही जुन्या पोस्ट्सचे स्क्रीनशॉट जोडले आहेत. खरंतर कुणा गांधीप्रेमीला अशा रितीनं खुलासे करण्याची वेळ यायला नको होती. दुर्दैवानं गांधींवर प्रेम करणा-या लोकांच्या चुकीच्या आकलनामुळं ही वेळ आली आहे.
माणसाकडून चूक होते. ती चूक मान्य करण्यात आणि दुरुस्त करण्यात कमीपणा मानण्याचे कारण नाही. निधी चौधरी यांच्या ट्विटवरून गैरसमज करून घेऊन टीका करणा-यांनीही आपली चूक मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे.
सॉरी निधी चौधरी मॅडम !
(विजय चोरमरे... हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे सीनियर असीस्टंट एडिटर आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवरुन वरील पोस्ट घेण्यात आली आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे)
https://www.facebook.com/vijay.chormare/posts/2252144084864424