Home > रिपोर्ट > नाव घेणं, एक पांचट मध्यमवर्गीय प्रकार!

नाव घेणं, एक पांचट मध्यमवर्गीय प्रकार!

नाव घेणं, एक पांचट मध्यमवर्गीय प्रकार!
X

मराठी माणसांचा काही कार्यक्रम असेल, कोणते समारंभ असतील, तर हमखास मजेमजेत सुरु होणारा प्रकार म्हणजे 'नाव घेणे'. सादर करण्यासारखं, दुसऱ्यांना मजेत छेडण्यासारखं नवीन काहीच हाती नसलं की लोकांच्या घोळक्यात "गुण दर्शन" म्हणून नांव घेणे प्रकार सुरू होतो. लटक्या लाजत-लाजत त्यात सहभागी होणाऱ्या स्त्रियांची संख्या खूपच जास्त आहे मराठी मध्यमवर्गात. शिकल्या सवरल्या, कमावत्या असल्या तरी आत्मभानाकडे जाऊ शकणाऱ्या फारच थोड्या स्त्रिया असतात. बाकी सगळ्या एकाच साच्यात निघाल्यासारख्या वाटतात. असा साचा आवडून घेणारे, ह्या स्त्रियांना उपलब्ध असलेले पुरुष सुद्धा किती गुळमुळीत असतील, असं वाटतं!

आपली मजेची व्याख्या थोडी तरी रिफ्रेश कशी होत नाही? ती कालसुसंगत कशी होत नाही? तेच ते उखाणे आणि नांव घेणे. कोणी वेळ लावला नांव घ्यायला की खोटा खोटा मस्का मारणे अत्यंत पांचटपणे सुरु असते. ज्यांना ह्या प्रकारात रस नसतो, त्यांना बळंच ह्या लटक्या मनोरंजनात सामील व्हावं लागतं. चार लोक एकत्र जमले की नवीन, दमदार, सृजनशील, सर्वांना सामावून घेणारं असं काहीच सुचत नाही का लोकांना? ह्या नांव घेण्यात नावीन्य देखील नसतं. उगाच ट ला ट जोडलेला असतो. पुन्हा, हे केवळ भिन्न लिंगी जोडप्यांना डोक्यावर घेण्याचे, त्यांनाच समाजमान्यता देण्याचे प्रकार आहेत. घटस्फोटित, विधवा, विधुर, अविवाहित, समलिंगी नात्यांमध्ये असलेली मंडळी, लिव्ह इन नाती, थर्ड जेंडर ह्यांना ह्यात काहीच स्थान नाही. आपला टिपिकल मराठी मध्यमवर्गीय गुळमुळीत बाणा जपून हे प्रकार नकोसे असलेतरी सुरु असतात. कदाचित चार लोक जमल्यावर त्याहून बरं काही करायला न सुचल्याने असं सुरु असतं.

बहुसंख्य लोक जे सतत करत असतात, त्याच्यातले खडे वेचून फेकायला किंवा किमान ते प्रकार काही अल्पसंख्य लोकांना अजिबात आवडत नाहीत, ह्याची जाणीव करून देण्यासाठी हे मांडणे महत्वाचे ठरते. बहुसंख्य लोक जेंव्हा बहुतकरून अंगावरच येत असतात, तेंव्हा अशीही झलक देणे गरजेचे असते. काळ बदलला आहे. ह्या गोष्टींना काही संदर्भ उरलेला नाही. उरला प्रश्न साहित्याचा... ते ही "साहित्य" जुनं होतं बाबा, इतकं नोंदलं तरी पुरेसं आहे. त्याचे कढ काढत बसण्यात अर्थ नाही. वर्षानुवर्षे नांव घेण्यात मनोरंजन शोधणे हे सृजनशीलता खुंटल्याचं आणि इतिहासात विकृती स्वरूप रमल्याचं लक्षण आहे.

- प्राची पाठक

Updated : 21 Feb 2020 12:15 PM GMT
Next Story
Share it
Top