उर्मिलाच्या प्रचारात भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा
X
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार सुरु असून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचाराची किमया ही निराळी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतेय. मात्र आता याच प्रचारात भाजप कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळतेय. एकीकडे राजकारणात सक्रीय झालेल्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरं जावं लागतेय तर दुसरीकडे उर्मिला मातोंडकर यांना भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या गोंधळात एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसने चोप दिला.
बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच अश्लील नाच करून दाखवत 'मोदी मोदी'च्या घोषणा दिल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. यामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.