हा पुरस्कार म्हणजे माझ्या देशाचा गौरव- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
X
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणूून आपली ओळख निर्माण करणाऱ्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारच्या प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला’ हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिया यांच्या हस्ते हा सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काय म्हणाल्या प्रतिभाताई पाटील...
पाटील म्हणाल्या, राष्ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत देशामध्ये विविध क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. हे सर्व करत असतांना मी देशाचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीचा गौरव आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी असतांना सन 2007मध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर मी 2008 मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते, अशी आठवण पाटील यांनी यावेळी सांगितली.
प्रतिभाताई त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्याच्या वेळी देशातील उच्चत्तम व्यापारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (फीक्की), अॅसोचॅम, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ बरोबर नेत असत, ते त्यांच्याच खर्चाने यायचे व त्यामुळे भारताचे दुसऱ्या देशांशी व्यापारी संबंध वाढले व ते फायद्याचे ठरले असे या उच्चतम व्यापारी संघटनांनी पुस्तिका प्रकाशित करून सांगितले.
राजदूत मेल्बा प्रिया काय म्हटल्या?
मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिया यांनी या राष्ट्रीय पुरस्कारामागची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो. असा पुरस्कार मिळवणा-या पाटील या पहिल्या भारतीय महिला असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, बिल गेट्स या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी तसेच त्यांच्या मेक्सिको भेटीवरील व्हिडीओ चित्रफीत दाखवण्यात आली.