Fact Check | ‘या’ फोटोतील महिला खरंच तृप्ती देसाई आहेत का?
X
सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नावाने काही माहिती सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. ज्यामध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक बाबींचाही समावेश आहे. या सर्व व्हायरल माहिती ‘मॅक्स महाराष्ट्र’ने पडताळणी केली.
या सर्व माहितीमध्ये प्रमुख्याने एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. ज्यात एक महिला आणि एक पुरूष किस करत आहेत. व्हायरल पोस्टच्या दाव्यानुसार या महिला तृप्ती देसाई आहेत.
हा फोटो गुगल इमेजमध्ये सर्च केल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती समजली. नोव्हेंबर २०१४ मध्ये तथाकथिक संस्कृती रक्षकांच्या विरोधात देशभरात मोठं कॅम्पेन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून दिल्ली, कोचीसारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘किस ऑफ लव्ह’ ही मोहीम राबवण्यात आली होती. व्हायरल होत असलेला फोटो या मोहिमेतला आहे.
बातमीचा स्क्रीनशॉट –
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या ११ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त देण्यात आलं आहे.
या व्हायरल फोटोतील महिलेचा चेहरा ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या बातमीमध्ये दिसत आहे. या महिला तृप्ती देसाई नाहीत.
याच आशयाने आणखी एक फोटो व्हायरल आहे.
या फोटोची सत्यता पडताळी असता समोर आलं की, १७ नोव्हेंबर २०१५ ला ‘न्यूज १८’ ने ‘किस ऑफ लव्ह’ या मोहिमेच्या आयोजकासंबंधी बातमी देताना हा फोटो ट्विट केलेला आहे. या फोटोतील महिलाही तृप्ती देसाई नाहीत.
न्यूज १८ चे ट्विट –
#BREAKING | Kiss of love protest organizer, Rahul Pashupalan & his wife arrested for alleged online sex trafficking
व्हायरल स्क्रिनशॉट्स –
यासंदर्भात ‘मॅक्स महाराष्ट्र’ने तृप्ती देसाईं यांची बाजू जाणून घेतली.
“कोणीतरी माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर करुन अशा पद्धतीचा संदेश पसरवत आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या नावाने पोस्ट सगळीकडे पाठवा असं सांगतेय. असा कोणताही संदेश मी कोणत्याही कार्यकर्त्याला केलेला नाही. सोबतच मी खिश्चन आहे, माझी २०० कोटींची मालमत्ता आहे, असेही मेसेजही व्हायरल होत आहेत. मी ख्रिश्चन असून विनाकरण हिंदुच्या भावना दुखावत आहे असं म्हटलं जातंय. काही हिंदूत्ववादी संघटनांनी मुद्दाम ही अफवा पसरवली आहे. . परंतु माझा आणि ख्रिश्चन धर्माचा काही संबंध नाही, असं तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. २ फेब्रुवारीला माझा मृत्यू झाला अशी माहिती मराठी विकीपीडीयावर एडीट करण्यात आली आहे. ही विकृती असल्याची प्रतिक्रीयाही देसाई यांनी दिली.
ठळक मुद्दे –
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आपल्या किर्तनात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभरातून प्रतिक्रीया आल्या. या वक्तव्यातून महिलांचा अनादर झाला आहे असं म्हणत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज समर्थक आणि तृप्ती देसाई समर्थक असं ‘सोशल वॉर’ सुरू झालं. या सर्व व्हायरल पोस्ट याच ‘सोशल वॉर’मधून तयार झाल्या आहेत. काही पोस्ट्स या देसाई यांच्या शनी शिंगणापूर मंदीर आंदोलनावेळेसच्याही आहेत.
निष्कर्ष –
व्हायरल असेलेले हे दोन्ही फोटो तृप्ती देसाई यांचे नाहीत. यासोबत त्यांचा धर्म, मालमत्ता याविषयी व्हायरल अससेल्या माहितीतही कसलंच तथ्य नाही. केवळ चारित्र्यहनन करण्यासाठी ही सर्व माहिती व्हायरल केली जात आहे.