Home > Max Woman Blog > एकमेकांना "pleasure" द्यावं लागतं हे कळणार तरी कधी ?

एकमेकांना "pleasure" द्यावं लागतं हे कळणार तरी कधी ?

एकमेकांना pleasure द्यावं लागतं हे कळणार तरी कधी ?
X

स्वतःच्या शरीराची धड ओळख नसलेले करोडो स्त्री, पुरुष, थर्ड जेंडर ह्या देशात आहेत. रात्री झोपतांना सुद्धा करकचून टाईट ब्रा ( Bra ) घालून झोपणाऱ्या लाखों स्त्रिया इथे आहेत. किमान झोपतांना तरी रिलॅक्स झोपा, हे त्यांना सांगावं- शिकवावं लागतं. स्वतःला कपड्यांच्या तुकड्यात बांधून घ्यायची सवय झाल्यानं असं न बांधता झोपणं त्यांना सवयीचं नाही. कोणी एरवी शिक्षित पण ह्याबाबत अर्धशिक्षित स्त्रिया रात्री ब्रा ( Bra) काढून झोपलं तर " shape " बिघडतो, असलं काही निर्बुद्ध बोलत असतात. हे बिघडलेले shape वगैरे त्यांचं sexual appeal कमी करत असावेत. त्यांचं त्यांना आणि त्यांच्या निर्बुद्धतेला माहीत!

अशा सगळ्या आनंदी आनंदात Sexual Pleasures वगैरे तर दूरची गोष्ट आहे. भारतातच काय जगभरात अनेक स्त्रिया आजही अशा आहेत की, त्यांना त्यांचा असा आनंद नेमका माहीत नाही. त्यांना उपलब्ध पुरुष देखील तसलेच कंडम असल्याने, त्यात पुरुष म्हणून त्यांच्या डोक्याचे वेगळेच कंडिशनिंग झाल्याने त्यांना ओरबाडून घेणं, अधिकार गाजवणं, शरीर मागणी करतं म्हणून ती भागवत बसणं ह्या पलीकडे pleasure कशाशी खातात. ह्याचा फार गंध नाही. हे बहुसंख्य पुरुष साधे "बघणेबल" देखील नाहीत.

पैसा असून नेटकं राहणं, नीट रंगसंगतीचे कपडे, आरोग्य ह्याचा त्यांना गंध नाही. ते जोडीदाराच्या शारीरिक गरजा काय समजून घेणार? पन्नाशीत असून स्वतःच्या शरीराचीही धड ओळख नसलेले अनेक पुरुष इथे frustrated आयुष्य जगत असतात. (अपवादांनी स्वतःला वगळून घ्यावे..) शाळांमध्ये लैंगिकतेबद्दल निव्वळ "माहिती" पास ऑन केल्याने ती कळतेच असं नाही. जिथे मूलभूत शिक्षण, संधीचाच अभाव आहे, तिथे ती कृती करणं आणि ती करतांना त्यातून स्वतःला आणि एकमेकांना pleasure देणं हे सगळं दूरचं.

नको असलेली पोरं जन्माला घालणं, पोरं जन्माला घालण्यासाठी एकमेव मार्ग म्हणून ह्याकडे बघणं, करायचं म्हणून करणं, दुसऱ्याला ओरबाडू देणं, नकोश्या जोडीदारासोबत रडत, खडत, कुढत जगणं, स्वतःची लैंगिकता अजिबातच न कळणं, समलिंगी आहोत की, भिन्नलिंगी की उभयलिंगी की आणखीन काही, हे काहीही समजून न घेता सामाजिक दबावाला बळी पडत राहणं. असे एक ना अनेक प्रकार आहेत. त्यात कोणी बाबा-बुवा टाईप गैरप्रकार करणारे आहेत.

पॉर्न साईट्सचा आधार घेऊन कोणत्यातरी अवास्तव कल्पनेत रमलेले लोक आहेत. लग्नाच्या जोडीदारावर ह्या मूलभूत गरजेसाठी अवलंबून असल्याने त्यात प्रचंड वैतागलेले/ वखवखलेले लोक आहेत. इतर नाती केवळ ह्या गरजेसाठी जवळ करून त्यात गुरफटून गेलेले, त्यातही लपवाछपवी करत बसलेले लोक आहेत.

अशा देशात शारीरिक गरजेसाठी रस्त्यावर दिसणाऱ्या कोणत्याही वयाच्या कोणत्याही स्त्रीला सावज म्हणून बघणारे आणि नंतर तिला जाळून टाकणारे पुरुष निपजले नाहीत, तर नवलच.

पन्नास साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत आपल्या लॅब मध्ये लोकांना सेक्स (sex) करण्यासाठी volunteer म्हणून बोलवून त्यांचा अभ्यास करणारे विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन इथे तयार होऊ शकत नाहीत. त्या काळात स्त्री, पुरुषांना orgasm शिकवण्यासाठी थेट क्लबच काढणारी बेटी डॉडसन इथे निर्माण होऊ शकत नाही. आम्ही आमची संस्कृती किती महान, हे सोयीस्करपणे त्यांनी निर्माण केलेली साधनं वापरून सांगत राहणार. स्वतःच्या शरीराची ओळख नसलेले लोक कामसूत्र ( Kamasutra ) आणि खजुराहोचा Kamasutra उल्लेख करून कधीकाळच्या संस्कृतीच्या नावाने pleasure मिळवत असावेत. मूलभूत गरजा अनेक प्रकारे दाबून, कोंडून घुसमटणाऱ्या बहुसंख्य निर्बुद्ध लोकांचा हा देश आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार इथे अनेकांगी आहेत, ह्यात नवल ते काय?

-प्राची पाठक

Updated : 7 Feb 2020 12:54 PM GMT
Next Story
Share it
Top