Home > रिपोर्ट > बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!
X

राष्ट्रीय कीर्तनकार आणि सप्तखंजेरीवादक प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या आई श्रीमती सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे दीर्घ आजाराने २० फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या वयाच्या ९२ व्या वर्षांच्या होत्या. अकोटमधील रहात्या घरी सायंकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्याच दिवशी सत्यपाल महाराज हे दुपारी ३ वाजता अकोटवरून वर्धा जिल्हात तरोडा या गावी कीर्तनाला गेले होते. सायं ७:१० मिनिटांनी कीर्तनाच्या गावात पोहोचल्याबरोबर आपल्या आईच्या निधनाची वार्ता त्यांचा मुलगा डॉ. धर्मपाल यांनी महाराजांना दिली. पण या कीर्तनाच्या कार्यक्रमाची तारीख आयोजकांनी एक-दीड वर्षाआधी घेतलेली होती. या जाहीर प्रबोधनाच्या कीर्तनाला दररोजसारखीच हजारोंची उपस्थिती होती. इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही महाराजांनी स्वतःला सावरत आयोजक आणि उपस्थित हजारो मायबाप जनता जनार्दन यांचा सर्वस्व विचार केला.

मी इतक्या लवकर घरी पोहचू शकणार नाही, तरी तुम्ही आईची मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाची इच्छा पूर्ण करावी. मी कीर्तनाचा कार्यक्रम करून निघतो, अशा सूचना दिल्या. यावेळी डॉ. धर्मपाल यांनी वडील सत्यपाल यांच्या सुचनेचे पालन करत तात्काळ रात्री ८.३० वाजता आपल्या आजीचे पार्थिव नेत्रदान आणि देहदानाकरिता अकोला मेडिकल कॉलेजला येथे नेण्याची तयारी केली. त्याआधी अंत्यदर्शनाकरिता रात्री ७.१५ ते ८.३० वाजेपर्यंत अकोटच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते.

आई सुशीला यांचे पार्थिव अकोटवरून अकोल्याकरिता निघाले आणि सत्यपाल महाराजांनी कीर्तनाला दररोजसारखी सुरवात केली. अकोला येथे मेडिकल कॉलेजला रात्री १०.३० वाजता परिवारातील सदस्य तसेच शेकडो हितचिंतक मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्गवासी आई सुशीला यांचे नेत्रदान आणि देहदान संपन्न झाले. तिकडे तरोडा जिल्हा वर्धा येथे सत्यपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा संपन्न झाला.

सप्तखंजेरीचा जादूगर प्रबोधनसम्राट ज्याचे पाळण्यातील नाव सत्यपाल ठेवणारी आई आज आपल्यातून निघून गेली.

भावपूर्ण आदरांजली!

Updated : 23 Feb 2020 6:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top