Home > Max Woman Blog > एका लग्नाची कोर्टातली गोष्ट...

एका लग्नाची कोर्टातली गोष्ट...

एका लग्नाची कोर्टातली गोष्ट...
X

रखमा तुला आठवताना...

काही नावे अशी असतात की त्यांच्या कार्यामुळे त्या पूर्ण नावालाच एक वलय प्राप्त होते. सावित्रीवाली आजादी, फातिमावाली आजादी या घोषणा गेले काही आठवडे देशभरात सर्वत्र दिल्या जाताना आपण ऐकल्या आहेत. सावित्री हे नाव त्यापैकीच एक. काहींना अर्थात पुराणकथेतली सावित्री आठवेल तर काहींना सावित्री फुले. सावित्री तर तशी आता अनेक दशके अनेकांना माहित झाली आहे पण फातिमाचे नाव हल्लीहल्लीच एकू येतेय. उशीरा का होईना पण फातिमाबदद्लची उत्सुकता वाढीस लागली आहे हेही नसे थोडके. आजच्या लेखात मला असाच आणखी एका नावाची आठवण जागवायची आहे. फातिमा -सावित्री जशा आताच्या आंदोलनांमुळे एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञात झाल्या तसे हे नाव देखील एकोणिसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय झाले आणि मग काही काळाने विस्मरणात गेले जणू. हे नाव आहे रखमाचे. देवभक्ती करणाऱ्या भाविकांसाठी ते नाव विठ्ठल रखुमाईतल्या रखुमाईचं आहे. पण माझ्या मनात वेगळी रखमा आहे.

माझा लेखविषय असलेली रखमा देवपातळीवर नेऊन बसवलेली पुराणातली नाही. ती खरीखुरी, या महाराष्ट्राच्या मातीतली लेक होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेली आणि वयाच्या विशीतच एकदम आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय झालेली होती.

काय केले होते रखमाने? कशामुळे तिचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर गेले? तर रखमाने आपला बालविवाह नाकारून ते रद्द व्हावे यासाठी कोर्टात लढा देण्याचे धाडस दाखवले होते. त्यानंतर तिने डॉक्टर होऊन मुंबईला परतून प्रॅक्टिसही केली होती. हा कोर्टातला खटला, त्याचे निकाल आणि रखमाला सुनावलेली सजा हे सारे तेव्हाच्या राष्ट्रीय वर्तमानपत्रांमुळे इतके गाजले की देशभरातच नाही तर इंग्लंडमध्येही तिला ओळख मिळाली होती. एवढेच नाही तर आज आपण ज्याला solidarity (एकता) म्हणतो तशी solidarity म्हणून रखमासाठी इंग्लंड-स्कॉटलंडमधल्या स्त्रियांनी एक छोटी माहीमदेखील चालवली होती.

अर्थात त्या काळातच नाही तर आजच्या काळातही जे धाडस करायला अनेक जण कचरतील असे धाडस डॉक्टर रखमाने केले होते. तेही १८८४ सालात. अर्थात तेव्हा ती डॉक्टर नव्हती तर केवळ विशीची तरूणी होती. डॉ. रखमाची बहुतांश वैद्यकीय कारकीर्द घडली ती तेव्हाच्या मुंबई प्रांतात आणि आजच्या गुजरातमध्ये. सुरतमध्ये रखमाच्या नावाचे हॉस्पिटल आहे पण आपल्याकडे मात्र मोजक्या अभ्यासकांखेरीज डॉ. रखमा हे नाव फारसे कोणाला माहित नाही. हं, नाही म्हणायला आजकाल समाजमाध्यमांतून तिच्याविषयी माहिती देणारी एक पोस्ट फिरते. पण जेव्हा मी तिच्या लढ्याची कथा लोकांसमोर मांडणारा कार्यक्रम करायचा म्हणून तिचे चरित्र वाचले तेव्हा समाजमाध्यमांत फिरणाऱ्या पोस्टमध्ये काही बाबी अगदीच झाकल्या आहेत आणि काही विचित्र प्रकारे मांडल्या आहेत हे माझ्या लक्षात आले.

बंडखोरी करणाऱ्यांच्या वाट्याला अर्थात निंदा येते, विरोध होतो. हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्य आहे. रखमाने तिचे लग्न नाकारण्याचे बंड केले आणि त्यासाठी कोर्टात लढा दिला. १८८४ सालात कोर्टाला निवेदन देणारी, आपले लग्न रद्दबातल करावे अशी विनंती कऱणारी तरूणी माझ्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरली नसती तरच नवल. तिचा केवळ लढाच नाही तर त्या लढ्याआधीची तिची घडण, त्या लढ्याच्या अनुषंगाने समाजात झालेले मंथन असे सारेच मला महत्वाचे वाटले. विस्मृतीत गेलेल्या एका नायिकेची कथा एवढेच त्याच्याकडे पाहू नये तर त्याकाळी ज्या प्रकारचे विचार मांडले गेले त्या मनोवृत्तींच्या किंवा सामाजिक धारणांच्या किती पुढे आपण आलो आहोत, अजून काय बदलायला हवे असा विचार त्यातून सुरू व्हावा या उद्देशाने तिची कथा सांगण्याचा हा कार्यक्रम मी करत असते. प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळचा तो पाऊण तास मला रखमाची नव्याने ओळख करून देत राहतो. प्रत्येक कार्यक्रमानंतर प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा प्रश्नांतून काहीतरी नवीनच सापडते.

विवाहसंस्थेचे पावित्र्य, आदर्श सून किंवा आदर्श पत्नी कशी असावी वगैरेवर बोलणाऱ्या तथाकथित प्रवचनकारांना रखमाने मांडलेले विचार ऐकवावेत असे एका कार्यक्रमानंतर एकीने जाहीरपणे सुचवले. अर्थात त्यांनाच नाही तर समाजातल्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरूषालाही ही कथा ऐकवावी असे मला वाटते हे मात्र खरे.

कधी या कथेनंतर पालकांनी मुलांना कसे घडवले पाहिजे यावर बोलता येते. आपल्या मुलींना समाजभयास्तव कोमेजू देऊ नका हे सांगण्यासाठी तर रखमा आणि तिच्या पालकांशी असलेले तिचे नाते हे अगदी आदर्श मानावे. आपला बालविवाह झाला असल्यामुळे ते लग्न संमतीने झालेले नाही असे कोर्टात निवेदन देणारी रखमा एका अर्थी आपल्या आईवडीलांनाही त्यात दोषी धरत आहे हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे पण तरी तिचे आईवडील तिच्या बाजूने उभे राहिले हे तर मला फारच भावते. नाहीतर आताच्या काळात केवळ राजकीय मते भिन्न आहेत म्हणून सर्वसामान्य घरांमध्ये भावाभावांचे, पालक मुलांचे एवढेच काय शालेय मित्रमैत्रिणींचे बिनसलेले नातेसंबंध काय कमी दिसतात? सावत्रपणाचे शिक्के पुसून टाकायला आणि जोडीदार निवडीतल्या अनुरूपतेच्या ( compatibility) मुद्याची चर्चा छेडायलाही ही कथा अगदी समर्पक आहे.

भारतातली पहिली डॉक्टर आनंदी आणि रखमा अगदी समवयस्क. पण अर्थात दोघींच्या डॉक्टर होण्याचा प्रवास वेगळा झाला आणि पहिली डॉक्टर म्हणून आनंदीचे समाजात, सरकारदरबारी जितके नाव झाले तसे रखमाच्या बाबतीत पहिली सेवारत डॉक्टर म्हणून झाले नाही ही खंतावणारी बाब आहे.

आनंदीला नवऱ्याने डॉक्टरकी शिकण्याच्या मार्गावर चालायला लावले तर रखमा लग्नबंधनांतून सुटका झाल्यानंतर डॉक्टर बनू शकली.दोघींचा डॉक्टर बनण्याचा प्रवास खडतर तर खराच पण आनंदीला कष्टाचे फळ पदवी रूपाने जरी मिळाले असले तरी रूढी/परंपरापालन किंवा संस्कृतीरक्षणाच्या अतिरेकी कल्पनांनी तिचा जीवच घेतला. तर रखमा मात्र रूढीपालनाच्या नियमांना धाब्यावर बसवूनच डॉक्टर झाली. आनंदी डॉक्टरकीचे शिक्षण घेत होती तेव्हा रखमा मात्र कोर्टकेसच्या तारखा आणि निकालाच्या प्रतिक्षेत शिक्षणापासून वंचित राहिली.

तारूण्यातली महत्वाची ४ वर्षे कायदेशीर लढाई आणि लोकापवादाला तोंड देऊन रखमा ऊभी राहिली ती मात्र मग मागे वळून न पाहण्यासाठी. इंग्लंडला जाऊन शिक्षण घेणे असो की परतून नोकरी कऱणे, तिने तिचा दुःखद भूतकाळ मागे सारून कष्ट केले. हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्या कष्टांचा उच्चार केला नाही की त्या कष्टांच्या झालेल्या कौतुकाचा सोहळाही मांडला नाही.सुखदुःख समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ हे वाक्य तर रखमाच्याबाबतीत सततच आठवत राहते.

मुंबईच्या प्रसिद्ध कामा हॉस्पिटलच्या कर्मचारी नोंदवहीत रखमाबाईंचे नाव आहे. १८९५ मध्ये त्या तिथे काम करण्याआधी तिथे कोणीही भारतीय महिला डॉक्टर नव्हती म्हणजे त्या हॉस्पिटलमधल्या त्याच पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. पण तरी आजही अनेक डॉक्टर्सना, महिला डॉक्टर्सना डॉ. रखमा हे नाव माहित नाही. माझ्या कार्यक्रमाला आलेल्या, डॉक्टर म्हणून काम कऱणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या प्रेक्षकांनी मला अशी प्रतिक्रिया दिली आहे की रखमाबद्दल काही माहिती कधीच नव्हती. अगदी सरकारी आरोग्य खात्यातसुद्धा रखमाच्या नावे दिले जाणारे पारितोषिक आहे , एखादी शिष्यवृत्ती वा एखादी योजना आहे असेही ऐकिवात नाही.

रखमाबाईंच्या वैद्यकीय कारकीर्दीबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद हा किताब दिला होता, पहिल्या महायुद्धातल्या त्यांच्या कामाची दखल घेऊन रेडक्रॉस सोसायटीने त्यांना सन्मानित केले होते पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यातल्या कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून त्यांनी आपले गौरवीकरण करण्याचा एकही प्रयत्न केला नाही.

आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहणे एवढेच नाही तर त्यांचे नाव आणि काम विस्मृतीत जाणार नाही यासाठी आपण विशेष प्रयत्न कऱणे ही आपली जबाबदारी नाही का?

-अलका पावनगडकर

Updated : 3 March 2020 3:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top