Home > रिपोर्ट > जातपंचायतीला न जुमानता तिने दिला बाळाला जन्म

जातपंचायतीला न जुमानता तिने दिला बाळाला जन्म

जातपंचायतीला न जुमानता तिने दिला बाळाला जन्म
X

जातपंचायतीच्या सदस्याच्या नातेवाईकानं अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीस स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. झालेल्या अन्यायाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीला गर्भपात करण्याचा सल्ला देत ११ हजार रूपये दंड भरण्याची शिक्षा जात पंचायतीनं ठोठावलीय. मात्र, जातपंचायतीच्या आदेशाला न जुमानणाऱ्या पीडित कुटुंबालाच वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आलाय.

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील धोंगडीपाडा गावातल्या एका पंधरा वर्षीय मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. या मुलीचे पालक हे शेजारील गुजरात राज्यात रोजगारासाठी गेले होते. गेल्या एप्रिल महिन्यात तिचे पालक गावी परतले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. यावेळी ही अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांची गरोदर होती. याबाबत मुलीला तिच्या पालकांनी विचारलं असता तिनं घडलेला प्रकार सांगितला. जात पंचायतीमधल्या एका सदस्याच्या नातेवाईकानंच या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं मुलीनं आई-वडिलांना सांगितलं.

जातपंचायतीलाच तुरूंगात टाका

मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी तिच्या पालकांनी जातपंचायतीकडे धाव घेतली. त्यावर जातपंचायतीनं मुलीला गर्भपात करण्याचा सल्ला दिला आणि ११ हजार रूपये दंड भरण्याची शिक्षाही सुनावली. मात्र, जातपंचायतीचा हा निर्णय धुडकावून लावत पीडित मुलीनं गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं जातपंचायतीनं या कुटुंबालाच वाळीत टाकलंय. पीडित मुलीनं धुळे जिल्हा रूग्णालयात एका मुलीला जन्म दिलाय.

पोलिसांची भूमिकाही संशयास्पद

पीडित मुलीच्या पालकांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. सुरुवातीला पोलिसांनीही याप्रकरणी टाळाटाळ केली. उलट "गावातील प्रकरण गावातच मिटवा" असा अजब सल्ला दिला. मात्र, मुलीचे पालक गुन्हा नोंदवण्यावर ठाम राहिल्यानं अखेर पोलीसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

पीडित कुटुंबियांवर दबाव

गुन्हा दाखल झाल्यानंतर जात पंचायतीने तक्रार परत घ्या किंवा ११ हजार रुपये दंड भरा असे फर्मान काढले. मागील २ महिन्यांपासून या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत असून गावात पाणी भरू दिले जात नाही, तसेच गिरणीवर दळण दळू दिले जात नाही. आम्हांला सारख्या धमक्या दिल्या जात असून आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या पीडित मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

सौजन्य - मॅक्समहाराष्ट्र

https://youtu.be/5CPEJQEz-4A

Updated : 5 Jun 2019 6:27 AM GMT
Next Story
Share it
Top