Home > रिपोर्ट > डेझी : घरातील मुक्या प्राण्यांबरोबर आपलं काय नातं असतं?

डेझी : घरातील मुक्या प्राण्यांबरोबर आपलं काय नातं असतं?

डेझी : घरातील मुक्या प्राण्यांबरोबर आपलं काय नातं असतं?
X

एकतर माझे डोळे उघडतां उघडत नाहीत, आणि मी नक्की आहे कुठे? अरे केवढ्या जोराने माझा पार माने वर पोहोचणारा कान ओढतेय ही.. खरतर हे लांब लचक कान म्हणजे मला मिळालेला शापच आहे? उठता बसता मम्मा, दादा, युगा दादा माझे लांबलचक कान ओढतात आणि किती क्यूट आमची डेझी म्हणतात, अस्स वाटतं त्यांच्या छोट्याछोट्या कानांवर एक पंजा लावायला हवा. अर्थात नेहमीच कान दूखत नाहीत म्हणा कधी कधी दादा कान गोल गोल फिरवीतात तेंव्हा मजा वाटते. मम्मा जेव्हा यथासांग घासून पूसून अंघोळ घालते आणि कानात टॉवेल घालते. तेंव्हा खूप मस्त वाटतं. खूप गुदगुल्या होतात. पण आत्ता तर मम्मा कान खेचतेयच.

शेवटी ना इलाजाने मी एक डोळा उघडलाच. मम्मा चांगलीच संतापलेली होती. उठतेस का गधडे? नुसती लाडाने वेडी झालीय, मला बेड आवरायचीय, अख्ख्या बेड वर लोळतेय रूस्तम ची पेंड आहे का? By the way रूस्तम म्हणजे माझा बाप मी त्याला कधी पाहीला नाही. मला तर या घराशिवाय काही म्हणजे काहीच आठवत नाही. पण एकदा मम्मा आलेल्या पाहूण्यांना (जे मला बिलकूल आवडले नव्हते म्हणून मी भूंकून भूंकून घर डोक्यावर घेतले होते) त्यांना कौतूकाने सांगताना ऐकले होते. एकदम प्यूअर बिगल आहे ही.

तिच्या वडिलांचं नाव रूस्तम आणि आईचं नाव मारिया ते मी ऐकले होते. अर्थात रूस्तम आणि मारिया म्हणजे इंटरकास्ट का? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण जो पाहील तो मला म्हणतो की, एकदम खानदानी बिगल आहे ही. असो, तेव्हा मला कळलं की माझ्या बापाचे नाव रुस्तम आहे. आणि मम्मा चिडली की हमखास माझ्या बापाचा उद्धार करते. पण माझ्या आई चे नाव मात्र चूकून घेत नाही. या बाबतीत ती पक्की स्त्रीवादी आहे. तिचा माझ्या बापावरच एवढा राग का? हे काही मला समजत नाही ती रागावली की रूस्तम येईल का आवरायला. बीन वळणाची कुत्री अशा ठेवणीतल्या शिव्या देते. आणि लाडात आली की, मला मांडीवर बसवून माझे कान ओढत तू माझी सिंड्रेला खरं सांग तू मागच्या जन्मात प्रिंसेस होती ना? असं काही बाही मला विचारत राहाते. मग मी पण हूं हूं असं करीत राहाते.

आता, मात्र तिने मला एक धपाटाच मारला. मी पण, मग बेडवरून खाली उडी मारली. उडी मारल्या मारल्या मला सू करायची इच्छा झाली करून टाकू का इथेच? नुसत्या कल्पनेने मला हसू आले. मग तर माझे काहीच खरे नाही. मी सरळ दरवाजातून पळत आंगणात आले आणि मनोसोक्त सू करून घेतली. परत रूम चा कानोसा घ्यावा म्हणून आत आले. मम्मा ने बेड आवरून टाकली होती. कल्पेश दादाने मला हाक मारली. डेझी चला फिरायला. अरे बापरे आज काय भानगड इतक्या सकाळी सकाळी मला फिरायला नेतात. त्याने तोंडात बिस्कीट टाकले आणि माझ्या गळ्यात पट्टा घातला. बिस्किट दिले म्हणजे काही तरी भानगड आहे लालूच आहे ही. घरामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. वेगवेगळे वास येत आहेत काहीतरी मस्त बेत दिसतोय. ओहो म्हणून हे मला बाहेर हकलत आहेत. मी प्रत्येकावर भूंकते म्हणून, भूंकू नाहीतर काय करू? कोणी ही डायरेक्ट घरात घूसतो. मला ते बिलकूल नाही पटत. शिस्त म्हणजे शिस्त, आणि माझी ही शिस्त पसंत नसल्याने मला आज बळेबळे घरातून बाहेर काढत आहेत.

खरतर मला बिलकूल बाहेर नाही जायचंय.

पण बिस्किट खाण्याच्या नादात बेल्ट तर गळ्याभोवती आवळलाय. किचनमध्ये कूकर मध्ये नक्की चिकनच आहे. आणि Microwave मध्ये मस्त फिश भाजतोय. मी रागाने माझा निषेध नोंदविला भू भू भू

दादा लगेच माझ्याकडे आले. सोन्या फिरून ये आपल्याकडे पाहूणे येणार आहेत. आमच्या घरातला हा सगळ्यात सेंसिबल माणूस सहसा माझ्याशी खोट नाही बोलत. जे आहे ते खर सांगतात. शेवटी काय मला काढलंच घरा बाहेर. एकदा का बाहेर पडले की मला मग फिरायला आवडतं. सगळ्या कॉलनीतून मी फिरते. आजूबाजूची पोरे डेझी डेझी करत ओरडतात. तसा माझा फॅन क्लब फार मोठा आहे. अरे बापरे या काकूंनी कल्पेश दादाला थांबवले. आता या नक्की म्हणणार

‘अरे हिला खायला कमी देत जा, खूप जाड झाली ही’.

हे एक वाक्य सारखं माझ्या बाबतीत सगळे ऐकवतात. मग दादा मम्मा वर ओरडतात आणि मम्मा हळूच चहात बूडवून एक टेस्ट मला देते. आणि म्हणते असू देत... खात्या पित्या घरची आहे माझी लेक. तर काय माझ्या जाडी वर सगळ्यांचा आक्षेप पण मला माहीत आहे, मी beauty queen आहे. अरे हा कोशिरेंचा लॅब आज लवकर फिरायला आला मला तर हा जाम आवडतो. पुढे गेले की आहूजां चे अल्सेशियन सगळे तसे माझे चांगले मित्र च आहेत.

आज काही फिरण्यात मन लागत नाही. कूकर च्या किती शिट्या झाल्या असतील? फिश माझ्या वाट्याला येईल का? कोंबडी ची हाडे माणूस खात नाही हे किती बर आहे ना? पण फिश च काहीच शिल्लक रहात नाही.

शेवटी एकदाचा कल्पेश दादा ला आला फोन. तो आलो म्हणाला. सुटले बाबा एकदाची, हाडे झिंदाबाद. घरा जवळ आलो तर एक एक गाडी परत निघाली होती. मी भूंकून माझा निषेध नोंदवला. एकदाचा बेल्ट निघाला मी डायरेक्ट किचन गाठलं नुसता पसारा आणी वैतागलेली मम्मा. मी काही ही न करता माझ्या वर कशाला वैतागलीय? पण माझ्या खाण्याच्या भांड्यात हाडे आणी पिसेस पण. मी माशाला मनातून काढून टाकले तर काय यूगा दादा ने व्यवस्थित सोललेला हाडे काढलेला मासा माझ्या पूढे केला माझा दादा तो गुणाचा, अगदी पिझ्झा देताना पण कंजूशी नाही करत, नाही तर मम्मा ते टेस्टलेस डॉग फ़ूड आणी वरतून नैवेद्य दाखवतता तसा एखादा micro पिझ्झा पिस.

मी मासा खाण्या आधी यूगा दादाचा हात चाटून घेतला, दादा ने मला हलकेच थोपटले. माझ्या दादाला बरोबर कळते माझा जीव या माश्यात अडकला ते, पण या या दादाच्या एका गोष्टीचा मला एवढा राग येतो तो म्हणतो डॉगी चे ब्रेन ‘पिनट’ एवढं असत. अरे बाबा गुगल वरची सगळी माहीती खरी नसते. आमच ब्रेन खूप शार्प असतो. अगदी मला सगळं सगळं आठवत. एकदा नाही का तू पूण्याला जाताना तुझं जॅकेट बेड वर विसरून गेला काय लूसलूसीत होत ते लॅम्बस्किन च जॅकेट, माझी तर मेजवानी झाली. मी अगदी मनलाऊन चाऊन चाऊन खाल्लं होतं. ते.

ऑफिस मधून दादा घरी आले केवढ मारलं होत मला. अगदी लाथ बूक्क्याने, किती लहान होते मी. खूप महाग होत म्हणे ते केवढे चिडले होते. मला तर काहीच नव्हत कळतं. मी टेबलाखाली लपून बसले सगळं अंग ठणकत होते. रूस्तम कुठे आणि मारिया कुठे मला तर काहीच माहीत नव्हते. हेच माझे पप्पा मम्मी मला पण खूप राग आला घरामध्ये कोणी नाही माझा. यूगा दादा तर पूण्याला मम्मा पण घाबरून निघून गेली, दादा तर ओरडत निघून गेले ही मला संध्याकाळी घरात दिसली नाही पाहीजे. असं सांगून गेले मला ही नाही रहायचं इथे मला पाठवा रूस्तम कडे. पण खूप वेळ गेला कोणीच येईना मग स्कूटर चा आवाज आला. दादा आले वाटले आता काय कराव हे आपल्याला रूस्तम कडे पाठविणार. घरातल्या लाईट लागल्या मम्मा चा पत्ता नाही. आणि माझ्या कानावर हाक आली डे…झी. मी पटकन बाहेर आले. दादानी मला मांडीवर घेतले आणि किती तर वेळ तेच रडत होते. सॉरी सोन्या असं काहीस म्हणून होते मी पण त्यांचा हात चाटत राहीले.

नंतर किती चपला, टॉवेल,पिशव्या मला आवडल्या मी चाऊन चाऊन खाल्ल्या पण दादांनी कधीच मला मारले नाही. उलट तेच मम्मा ला ओरडायचे तूला अक्कल नाही का वरती उचलून का ठेवत नाहीस? मग मी पण शहाण व्हायचं ठरवलं ही तोडफोड बंद करायची. पण काय आहे मी आहे short tempered मला हे सगळे एकटी ला सोडून गेले की माझे डोके फिरते. त्यांना ही आता ते लक्षात आलेय. तर सांगायचा मुद्दा हा की माझा ब्रेन “पिनट”एवढा नाही मला सगळं आठवत पण काही मनात ठेऊन मी खुन्नस नाही. काढत मला त म्हणजे ताकभाक हे समजत. या घरातल्या सगळ्यांच्याच खोडी मला माहीत आहेत. पण मंदा मावशी, सुरजदादा, लक्ष्मण दादा, पाटील काका, जयसिंग, इस्रिवाले काका, दूधवाला दादा, कल्पेश दादा, मम्मा, दादा, यूगी दादा या सगळ्यांचा दिवस माझ्या शिवाय सुरू होत नाही. आणि संपत नाही, भरीस भर आख्खी कॉलनी(सगळ्या कुत्र्यां सहीत) सगळे नुसते डेझी डेझी करीत रहातात. त्या मुळे मी खूप मस्तीत रहाते माझ्या सगळ्या माणसां सोबत…..

हेमलता पाटील

Updated : 5 May 2019 8:54 AM GMT
Next Story
Share it
Top